आर्ट ऑफ लिव्हिंग कडून “वोट कर पुणेकर” ह्या मोहिमेचा शुभारंभ!

0
185

पुणे आणि आसपासच्या मतदार संघातील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगने अँप आणि वेबसाईट चे उद्घाटन केले. महा एनजीओ फेडरेशन आणि पेट्रोल डीलर्स असोसिएशन, पुणे देखील ह्या प्रयत्नांमध्ये सामील!

आर्ट ऑफ लिव्हिंग (AOL) महाराष्ट्रातर्फे रविवारी सायंकाळी शहरात मतदार जनजागृती मोहीम राबवण्यात आली.

आर्ट ऑफ लिव्हिंगने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत विविध स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संस्था या मोहिमेला मोठे यश मिळवून देण्यासाठी सहभागी होत आहेत. महाएनजीओ फेडरेशन आणि पेट्रोल डीलर्स असोसिएशन पुणे (पीडीएपी) यांनी पाठिंब्याचे वचन दिले आहे आणि मोहिमेत सक्रियपणे सहभागी होणार आहे.

जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या समारंभासाठी ‘व्होट कर पुणेकर’ या मोहिमेचा शुभारंभ सेंट्रल पार्क, पुणे येथे करण्यात आला. स्वामी ब्रम्हचैतन्यजींच्या उपस्थितीत रुद्र पूजन आणि हनुमान चालिसाच्या जपामध्ये आर्ट ऑफ लिविंगच्या शिक्षक, स्वयंसेवक आणि भक्तांसह 700 हून अधिक नागरिकांनी भाग घेतला. ह्या कार्यक्रमासाठी पेट्रोल डीलर्स असोसिएशन पुणेचे श्री ध्रुव रुपारेल, प्रबोधन मंच चे श्री मनोज पोचट आणि सुधीर मेहता ह्यांच्या सोबत AOL महाराष्ट्र एपेक्स बॉडीचे सदस्य राजय शास्तारे आणि पांडुरंग शेळके, महा एनजीओ फेडरेशन चे अध्यक्ष शेखर मुंदडा हे उपस्थित होते.

पुणे लोकसभा मतदारसंघासाठी 13 मे रोजी मतदान होणार आहे, आणि त्याच दिवशी आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक आणि अध्यात्मिक नेते परमपूज्य श्री श्री रविशंकर जी यांचा वाढदिवस आहे. ह्या शुभ मुहूर्तावर विविध सेवा उपक्रमांचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

AOL परिवाराने इतर स्वयंसेवी संस्थांसह पुण्यातील मतदानाची टक्केवारी वाढवण्याचा संकल्प केला आहे. यासाठी खास मोबाइल फोन ॲप्लिकेशन आणि वेबसाइट सुरू करण्यात आली आहे. मतदार त्यांच्या मोबाईल फोनवर QR कोड स्कॅन करून किंवा वेबसाइटला भेट देऊन त्यांचे मतदान केंद्र सहज शोधू शकतात.

AOL स्वयंसेवक घरोघरी जाऊन नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करतील. ज्येष्ठ नागरिक आणि इतरांना त्यांच्या मतदान केंद्रावर मदत केली जाईल. ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना 20,000 हून अधिक पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात येणार आहे.

AOL प्रत्येक निवडणुकीदरम्यान ही सेवा करत आहे. यावेळी, ते मोठ्या प्रमाणात करण्याचा विचार आहे. यातून प्रेरित होऊन अनेक स्वयंसेवी संस्था या मोहिमेत सामील झाल्या आहेत आणि पुढील आठवड्यापर्यंत अजून सुमारे 10 संस्था समर्थन देतील.

मतदारांना क्यूआर कोडद्वारे त्यांच्या मतदान स्लिप डाउनलोड करण्यास मदत करण्यासाठी आणि पुण्यात सर्वाधिक मतदान व्हावे यासाठी स्वयंसेवक, शिक्षक आणि नागरिकांनी संकल्प केला.

मतदानाच्या दिवशी पेट्रोल डीलर्स असोसिएशन पुणे (PDAP) इंधन खरेदीवर सवलत देणार आहे. मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करणारे फ्लेक्स बोर्ड शहरातील 100 पेट्रोल पंपांवर लावण्यात येणार आहेत.

AOL ने नागरिकांना मोहिमेत सहभागी होऊन आणि मतदानाची टक्केवारी वाढवून विक्रमी मतदान करण्याचे आवाहन केले आहे.