पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (रॅपिडो) यांचा दुचाकी व तीनचाकी टॅक्सीसाठी ऍग्रिगेटर लायसन्स मिळण्यासाठीचा अर्ज नाकारण्यात आल्याने रॅपिडोला पिंपरी-चिंचवड शहरात बाइक टॅक्सी चालवता येणार नाही.
शहरातील बाइक टॅक्सी बंद करण्यासाठी रिक्षा संघटनांनी काही दिवसांपूर्वी चक्का जाम आंदोलन केले होते. तसेच बाइक टॅक्सी बंद होत नाही आणि रिक्षा चालकांवरील गुन्हे मागे घेत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा घेण्यात आला. काही संघटनांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवणार असल्याची भूमिका घेतली होती. दरम्यान, रॅपिडो कंपनीने ऍग्रिगेटर लायसन्स मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाला ऍग्रिगेटर लायसन्स अर्जाचा फेरविचार करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. यानंतर रॅपिडो कंपनीने 30 नोव्हेंबर रोजी आरटीओकडे पुन्हा अर्ज केला होता. यावर बुधवारी (दि. 21) जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आरटीओची बैठक पार पडली. या बैठकीला प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतूल आदे यांच्यासह प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत राज्याचा कायदा, यापूर्वी अशा प्रकारे कोणाला परवानगी दिली आहे का? तसेच रॅपिडो कंपनीचा अर्ज आणि कागदपत्रे याचा विचार करून त्यांची परवानगी नाकारण्यात आली. ही माहिती आरटीओने प्रशासनाने दिली. तसेच नागरिकांनी आपली वाहने रॅपिडो ऍपवर वापरास उपलब्ध करुन देऊ नयेत. शिवाय, प्रवाशांनी रॅपिडो ऍपचा वापर करू नये, असे आवाहन आरटीओने केले आहे.
राज्य शासनाने किंवा राज्य परिवहन प्राधिकरणाने बाइक टॅक्सी प्रकारची कोणतीही योजना अद्याप राबविलेली नाही. तसेच बाइक टॅक्सी प्रकारचे लायसन्स जारी केलेले नाही. बाइक टॅक्सीबाबत भाडेतत्त्वाचे धोरण अस्तितवात नाही. रॅपिडो कंपनीकडून कायदेशीर बाबींची पूर्तता होत नसल्यामुळे आणि कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यामुळे ऍग्रिगेटर लायसन्स देता येणार नाही, असे उपप्रादेशिक अधिकारी अतुल आदे यांनी सांगितले.