आमदार अश्विनी जगतापांचा वारू सुसाट… | थर्ड आय – अविनाश चिलेकर

0
573

थर्ड आय, दि. २६ (पीसीबी) – `चूल आणि मूल हेच बाईचे आयुष्य` हे समिकरण आता इतिहास जमा झाले. राजकारण, समाजकारण, अर्थकारणात ज्या माता-भगिनींना संधी मिळाली त्यांनी अनेकदा पुरुषांपेक्षाही काकणभर सरसच कामगिरी केल्याचे अनेक दाखले देता येतील. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या धर्मपत्नी आणि चिंचवड विधानसभेच्या नवनिर्वीचीत आमदार अश्विनी जगताप यांचे उदाहरण ताजे आहे. गेल्या महिनाभरातील त्यांची राजकीय वाटचाल तशी लक्षवेधी राहिली. दिवंगत पती लक्ष्मण जगताप यांच्या कामाची पावती म्हणून आणि सहानुभूतीमुळे त्यांनी निवडणुकित तशी एतकर्फी बाजी मारली. विरोधकांच्या दुफळीचाही त्यांना फायदा झाला. मात्र, त्यानंतर त्यांची गाडी सुसाट सुटली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. विविध प्रश्नांवर पत्रव्यवहार, प्रकल्पांना भेटी, मतदारांच्या गाठीभेटी, दौरे हा त्यांचा फंडा असाच सुरू राहिला तर आगामी काळात पिंपरी चिंचवड शहराचे अवकाश त्या व्यापणार असे दिसते. आज त्या आमदार आहेत, उद्या त्या खासदार किंवा या शहराच्या नेत्या म्हणूनच उदयाला आल्या तरी आश्चर्य वाटू नये. कपाळाचे कुंकू पुसलेले असताना दुःखाचा डोंगर पचवून पदर खेचून ज्या पध्दतीने त्या उभ्या राहिल्या ते निश्चितच कौतुकास्पद आहे.

आमदार श्रीमती अश्विनी जगताप यांनी आमदारकीची शपथ घेऊन दोन आठवडे होत नाही, तोच विधीमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात अनुदानावरील चर्चेत त्यांनी सहभाग घेतला. मतदारसंघाच्या जोडीने लगतच्या मावळमधील विषयांवरही त्या बोलल्या. विधीमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसऱ्यांदा निवडूण आलेले पिंपरी राखीव मतदारसंघाचे आमदार अण्णा बनसोडे चकार शब्द काढत नाहीत आणि दुसरीकडे भाजपचे भोसरीकर आमदार प्रश्न मांडून रेकॉर्ड करू पाहतात. आता लांडगे यांच्या जोडीला आमदार श्रीमती जगताप यांनी पहिल्याच भाषणातून एक झलक दिली. कायदेमंडळाच्या सभागृहात बोलताना नवागतांचे पाय लटपटतात, मात्र जगताप ताईंनी महाराष्ट्राचे आणि पिंपरी चिंचवडकरांचे लक्ष वेधून घेतले. अवघ्या तीन मिनिटांचे निवेदनात जे मुद्दे होते तेच खूप महत्वाचे होते. शहराशिवाय मावळ तालुक्यातील काही मोठे विषयसुध्दा त्यांनी आपल्या भाषणातून मांडल्याने काही नेत्यांना धडकी भरली. श्रीमती जगताप यांचे सभागृहातील त्यांचे ते पहिलेच भाषण अनेक अर्थाने महत्वाचे आणि मोठा संदेश देणारे आहे.

खरे तर, २६ फेब्रुवारीला मतदान झालेल्या चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल २ मार्चला लागला. त्यात विजयी झालेल्या आमदार अश्विनी जगतापांचा आमदारकीचा शपथविधी ९ मार्चला झाला. मात्र, त्यापूर्वीच त्या कामाला लागल्या होत्या. ६ मार्चला त्यांनी सांगवी येथील पुणे जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन उपचाराविना रुग्णांना घरी पाठवणाऱ्या तेथील डॉक्टरांना फैलावर घेतले होते तर, आज त्यांनी आमदारकीला तीन आठवडे व्हायच्या आतच थेट विधानसभेतील चर्चेतच भाग घेऊन आपल्या कामाची चुणूक दाखवली.

महापालिकेच्या यांत्रिक साफसफाई कामात तब्बल ५९ कोटींचे नुकसान करणारी निविदा रद्द करण्याची धाडशी मागणी अश्विनीताईंनी केली. गेल्याच आठवड्यात यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील कपडे धुण्याच्या मशिनशी संबंधीत कामात तब्बल २९ कोटींचा तोटा होणार असल्याचे प्रकरण अश्विनीताईंनी चव्हाट्यावर आणले. आता ती निविदाच रद्द करा आणि संबंधीत अधिकाऱ्यावर कारवाई करा, अशी रोखठोक मागणी अश्विनीताईंनी केली. अवघ्या तीन आठवड्यात अश्विनीताईंनी ही मोठी प्रकरणे मांडली आणि प्रशासनाच्या तोंडाला फेस आणला. खरे तर, या दोन्ही प्रकल्पांमध्ये कोणकोणत्या बड्या नेत्यांची अप्रत्यक्ष भागीदारी आहे ते त्यांनी उघड केले पाहिजे. महापालिकेतील ५९ कोटी आणि दुसरे २९ कोटी अशी दोनच मोठी प्रकरणे म्हणजे जवळपास ९० कोटींची होणारी लूट अश्विनीताईंनी रोखली. भाजपच्या काळातील अशा भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर स्वतः आमदार म्हणून अश्विनीताई जगताप वारंवार बोलत सुटल्या आणि त्या प्रकरणांचा निकाल लावला तर जनता त्यांना डोक्यावर घेईल. फक्त आवाज टाकून मांडवली करणारे अनेक नेते आहेत, पण आमदार अश्विनीताई त्यातल्या नाहीत. प्रशासनाला पत्र द्यायचे आणि कामात स्वतःची भागीदारी निश्चित करायची, असेही काही बडे नेते करतात. ताई, अशा नेत्यांचाही बंदोबस्त करतील, अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही.

खरे तर, गेली वर्षभर भाजपचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या इशाऱ्यावर काम करणाऱ्या महापालिका प्रशासनाला आमदारताईंची दोन पत्र ही सणसणीत चपराक आहे. `मी सांगेल ते धोरण आणि बांधेल तेच तोरण`, या आमदार लांडगे यांच्या एकाधिकारशाहीलासुध्दा अश्विनीताईंनी धक्का दिलाय. या प्रकरणात आमदार लांडगे यांच्या साथीला शिवसेनेचे शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे आहेत, म्हणजे बारणे यांनाही अश्विनीताईंचा हा सूचक इशारा आहे. एका दगडात अनेक पक्षी मारायचे तंत्र शरद पवार यांना अवगत होते. चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे तसे पवार यांच्या तालमित तयार झालेले म्हणून त्यांचाही तोच खाक्या होता. आता त्याच पावलावर पाऊल ठेवत अश्विनीताई पुढे चालल्यात.

महापालिकेच्या भामा आसखेड धरणातून पाणी उपसा करण्याच्या जॅकवेल निविदेत ३० कोटींचा भ्रष्टाचार असल्याचे दिवंग आमदार लक्ष्मण जगताप यांनी प्रशासनाला दिलेल्या पत्रात म्हटले होते. भोसरीकर आमदार लांडगे यांच्याशी संबंधीतच ते प्रकरण असल्याने अप्रत्यक्षपणे त्यांनाच तो इशारा होता. आपल्या पतीराजांनी ज्या पध्दतीने भाजपमध्येसुध्दा स्वतःचा अंकुश निर्माण केला होता, त्याच पायवाटेने आमदार अश्विनीताई निघाल्यात. आमदार जगताप हयात असेपर्यंत आमदार लांडगेंना भाजपचे शहराध्यक्ष असूनही भोसरीच्या बाहेर तोंड काढता आले नाही. जगताप निवर्तल्यावर लांडगे यांना रान मोकळे झाले असे वाटत होते, पण अश्विनीताईंची कार्यपध्दती पाहिल्यावर आता आमदार लांडगे यांचीही खैर नाही. भाऊंच्या म्हणजे लक्ष्मणराव यांच्यापेक्षाही अश्विनीताई दोन पावले पुढे आहेत. त्यामुळे संपूर्ण शहराचा लोकमान्य नेता होण्याचे आमदार लांडगे यांचे स्वप्न भंगनार आहे.

विधानसभेच्या भाषणात आमदार अश्विनीताईंनी मोरया गोसावी मंदिर आणि हुतात्मा चापेकर बंधुंच्या स्मारकाची विषय छेडून शहराच्या अस्मितेवरची जळमटे दूर केली. त्याचबरोबर मावळ तालुक्यातील एकवीरा देवी, कार्ला लेणी, लोणावळा- खंडाळा पर्यटन केंद्राचे विषय मांडला. खरे तर, चिंचवड सोडून मावळ तालुक्यातील मुद्दे त्यांनी मांडले तेव्हा सगळ्यांचे डोळे विस्फारले. आता पुढे अश्विनीताईंना मावळ लोकसभा लढायची आहे आणि त्याची ही तयारी आहे, अशी चर्चा सुरू झाली. दिवंगत आमदार जगताप यांचे स्वप्न होते की `एक दिवस तरी मी खासदार होणारच `. आता ते स्वप्न साकार करण्यासाठी तर अश्विनीताईंना मावळ तालुका सर केला नाही ना, असेही म्हटले गेले. दुसरे म्हणजे पोटनिवडणूक काळात मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनिल शेळके यांनी श्रीमती जगताप यांच्या पराभावासाठी जंग जंग पछाडले होते. तेच डोक्यात ठेवून अश्विनीताईंनी मावळचे विषय मांडले नाही ना, अशीही एक शक्यत आहे. मावळात भाजपचा आमदार नाही म्हणून माजी मंत्री बाळा भेगडे यांनी हा मसाला पुरवला आणि शेळके यांच्यावर नथितून बाण मारला, असेही राजकीय नेते सांगतात. तिसरे म्हणजे मावळचे खासदार श्रीरंग बारणे हे कितीही नाही म्हटले तरी दिवंगत आमदार जगताप यांचे हाडवैरी. बारणे हे आगामी निवडणूक शिंदे गटाच्या चिन्हावर नाही तर भाजपच्या कमळ चिंन्हावर लढणार, हे जवळपास निश्चित आहे. मग त्यांचे वर्चस्व नको किंवा त्यांच्या अंकीत रहायचे नाही म्हणूनसुध्दा जे विषय पूर्वी बारणे यांनी मांडले होते तेच पुन्हा अश्विनीताईंनी नव्याने विधीमंडळात घेतले असावेत. अश्विनीताईंचे शिक्षण, स्वाभिमानी स्वभाव, उच्च राहणीमान, खानदानी चाल आणि पडद्या मागे राहून अगदी घरात बसून घेतलेले राजकीय धडे यातून घडलेले त्यांचे व्यक्तीमत्व आहे. आता प्रात्यक्षिक सुरू झाले. विधीमंडळातील भाषण किंवा भ्रष्ट कारभाराची दोन पत्र सिर्फ झाकी है…

राष्ट्रवादी आमदार अण्णा बनसोडेंचा झाला मौनीबाबा –

उद्योगनगरीतील तीनपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनी पूर्ण अधिवेशनात तोंड उघडले नाही. नागपूरच्या गत हिवाळी अधिवेशनातही त्यांनी मौन बाळगणेच पसंत केले होते. बनसोडे हे राष्ट्रवादीच्या बैठकांनी, मेळाव्यांकडे फिरकत नाहीत. भोसरी आणि चिंचवड मतदरासंघाचा आवाज विधीमंडळात घुमत असतो, पण पिंपरीला वाली नाही. आमदार महेश लांडगे मुद्दे मांडतात आणि उत्तर घेतात, मात्र राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे कुठे प्रश्नोत्तरात, लक्षवेधीत, अल्पवेळच्या चर्चेत ना दीर्घ चर्चेत कधी दिसलेच नाहीत. अर्थसंकल्पात दोन शब्द आमदार बनसोडे बोललेत असे एकदाही घडले नाही. भाजपच्या विधान परिषदेतील आमदार उमाताई खापरे यांनीपण या अधिवेशनात जोरदार बॅटींग केली. आता अश्विनीताईंची साथ मिळाली. आमदार लांडगेंच्या पालिकेतील वर्चस्वाला या दोघी मिळून सुरुंग लावू शकतात. भाजपसुध्दा ताब्यात घेऊ शकतात. त्याच अर्थाने अश्विनीताईंचे वारू आता सुटले आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांची कमी त्या भरून काढतील अशी आज तरी अपेक्षा आहे. आमदारताईंच्या शांत, संयमी आणि धोरणीपणामुळे भाजपला कदाचित चांगले दिवस येतील. खरी अग्नीपरिक्षा आगामी महापालिका निवडणुकिला होणार आहे.