आमदार अण्णा बनसोडे यांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी पेचात

0
361

चिंचवड, दि. २२ (पीसीबी) – चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक अंतिम टप्प्यात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या दुहेरी निष्ठेमुळे राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांची कोंडी झाली असून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. खुद्द अजित पवार यांनी दोन वेळा समज देऊनसुध्दा बनसोडे हे पक्षाच्या बैठकांना अनुपस्थित असतात आणि आता प्रचारातही दिसत नसल्याने ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

पिंपरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरले आहेत. अण्णा बनसोडे हे आपल्या पक्षाच्या कार्यक्रमाला आणि बैठकांना अनेकदा दांडी मारत असल्याने ते पक्षात नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. तर ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा यापूर्वी झाली होती. त्यावेळी बनसोडे यांनी पक्ष सोडण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला होता.

काही दिवसांपूर्वी बनसोडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीतून फिरल्यामुळे आणि मंत्रालय,मुंबई ते मुख्यमंत्र्यांचे खासगी निवासस्थान,ठाणे असा प्रवास केल्याने ते पुन्हा चर्चेत आले होते. त्यावर मतदारसंघातील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मुख्यमंत्र्य़ाबरोबर त्यांच्या गाडीतून प्रवास केल्याचा खुलासा आमदार अण्णा बनसोडेंनी केला होता.

आता चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचाराचा धुराळा उडत असतानाच पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. चर्चेला कारणही तसंच आहे. राष्ट्रवादीचे कट्टर प्रतिस्पर्धी भाजपच्या चिंचवडमधील उमेदवार अश्विनी जगताप यांचे पती आणि ज्यांच्या निधनाने ही पोटनिवडणूक लागली ते चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्याबरोबरचा फोटो त्यांनी आपल्या व्हॉटसअप डीपीवर ठेवला आहे.तर पहिल्यांदा नगरसेवक व आमदार होताना लक्ष्मणभाऊंनी मला मोठी मदत केली होती, असा कृतज्ञतापूर्वक उल्लेख त्यांनी केला आहे.