आमच्या ऑफिसमध्ये कोणीतरी १० कोटींचे बॉण्ड ठेवून गेलं.

0
196

नवी दिल्ली, दि. १८ (पीसीबी) – केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणूक रोख्यांसंदर्भात अपडेटेड माहिती जाहीर करण्यात आली आहे. याआधी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून बंद लिफाफ्यात ही माहिती सुप्रीम कोर्टात देण्यात आली होती. माहिती सार्वजनिक करण्याच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाने रविवारी काही नवी माहिती आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. यामध्ये निवडणूक रोख्यांसंदर्भातील डेटा समोर आणण्यात आला आहे. यात व्यक्तीने किंवा संस्थेने खरेदी केलेले रोखे आणि राजकीय पक्षांनी काढलेली रक्कम याची माहिती देण्यात आली आहे.

यादरम्यान नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जनता दल (युनायटेड) ने निवडणूक आयोगाला सांगितले आहे की, 2019 मध्ये कोणीतरी त्यांच्या कार्यालयात 10 कोटी रुपयांचे निवडणूक रोखे असलेला एक लिफाफा दिला होता, जो पक्षाने काही दिवसांतच कॅश केला, देणगीदाराबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. विविध राजकीय पक्षांनी सादर केलेल्या शेकडो सीलबंद लिफाफ्यांची माहिती निवडणूक आयोगाने रविवारी सार्वजनिक केली आहे.

बिहारच्या सत्ताधारी पक्षाने निवडणूक आयोगाकडे केलेल्या फाइलिंगमध्ये असे दिसून आले आहे की, त्यांना एकूण 24 कोटी रुपयांहून अधिकचे निवडणूक रोखे मिळाले आहेत.

निवडणूक आयोगाला सांगितले की त्यांना भारती एअरटेल आणि श्री सिमेंटकडून अनुक्रमे 1 कोटी आणि 2 कोटी रुपयांचे निवडणूक रोखे मिळाले आहेत. दुसऱ्या फाइलिंगमध्ये, जेडीयूने निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून एकूण 24.4 कोटी रुपयांची देणगी नोंदवली आहे. पक्षाच्या म्हणण्यानुसार, त्यांना मिळालेले अनेक निवडणूक रोखे हैदराबाद आणि कोलकाता येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखांमधून जारी करण्यात आले होते आणि काही पाटणा येथील एसबीआय शाखेतूनही जारी करण्यात आले होते.

निवडणूक आयोगाकडे दिलेल्या माहितीमध्ये जेडीयूच्या बिहार कार्यालयाने म्हटले आहे की, 3 एप्रिल 2019 रोजी पाटणा JDU कार्यालयात 10 कोटी रुपयांचे निवडणूक रोखे प्राप्त झाले. मात्र ही देणगी कोणी दिली याबाबत कोणताही तपशील पक्षाकडे उपलब्ध नाही, तसेच हे ते कोणी दिले याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्नही झाला नाही. कारण त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाचा असा कोणताही आदेश नव्हता. जेडीयूने निवडणूक आयोगाला सांगितले की, ’03-04-2019 रोजी पाटणा येथील आमच्या कार्यालयात कोणीतरी आले आणि त्यांनी सीलबंद लिफाफा दिला. जेव्हा ते उघडले तेव्हा आम्हाला प्रत्येकी 1 कोटी रुपयांचे 10 निवडणूक रोखे मिळाले’.

जेडीयूने पुढे म्हटलं आहे की, ‘भारत सरकारच्या राजपत्रातील अधिसूचनेनुसार, आम्ही पाटण्याच्या मुख्य एसबीआय शाखेत खाते उघडले आणि निवडणूक रोखे जमा केले. त्याचे पैसे आमच्या पक्षाच्या खात्यात 10-04-2019 रोजी जमा झाले. याबाबत आम्ही देणगीदारांबद्दल अधिक माहिती देऊ शकत नाही.
पक्षाने निवडणूक आयोगाला सांगितले की, त्यांना श्री सिमेंट आणि भारती एअरटेल यांच्याकडून निवडणूक रोख्यांद्वारे निधी मिळाला आहे. समाजवादी पक्षाने निवडणूक आयोगाला असेही सांगितले की, त्यांना पोस्टाने 10 रोखे मिळाले आहेत, ज्याची किंमत 10 कोटी रुपये आहे. पण देणाऱ्याची माहिती नाही. अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने सांगितले की त्यांना एसके ट्रेडर्स, सॅन बेव्हरेजेस, एके ट्रेडर्स, केएस ट्रेडर्स, बीजी ट्रेडर्स आणि एएस ट्रेडर्स यांच्याकडून निवडणूक रोख्यांद्वारे देणग्या मिळाल्या आहेत.