आता ९० दिवसांत निर्णय घ्या, संजय राऊत यांचा थेट विधानसभा अध्यक्षांनाच इशारा

0
275

मुंबई, दि. १२ (पीसीबी) : सर्वोच्च न्यायालयानं अखेर महाराष्ट्रातील ठाकरे विरुध्द शिंदे संघर्षावर निकाल दिला आहे. याचवेळी त्यांनी १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. आता यावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. ठाकरे गटाकडून लवकरात लवकर १६ आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात येत आहे. याचवेळी आता ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी थेट विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना धमकीवजा इशारा दिला आहे.

खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे फडणवीस सरकारसह विधानसभा अध्यक्षांवरही निशाणा साधला आहे. राऊत म्हणाले, सर्वोच्च न्यायालयानं सरकार बेकायदेशीर आणि अपात्र ठरलं आहे. सर्वोच्च न्यायालय निर्घृण अपराध्याला फाशीची शिक्षा ठोठावतं. फाशीचा दोर जल्लादाकडे असतो. त्यामुळे शिक्षा ठोठावून न्यायालयाने विधिमंडळातील लोकांकडे पाठवलं आहे. आता त्यांनी फाशी द्यायची आहे.

तसेच ९० दिवसांत विधानसभा अध्यक्षांना अपात्रतेचा निर्णय घ्यावा लागेल. अध्यक्षांना अपात्रतेची फाईल दाबता येणार नाही. ९० निर्णय नाही घेतला, तर महाराष्ट्र काय आहे, हे त्यांना कळेल असा इशारा संजय राऊतांनी राहुल नार्वेकरांना दिला आहे.

फडणवीसांनी पुन्हा एकदा कायद्याची…
राज्यपालांची संपूर्ण प्रक्रिया बेकायदेशीर आहे. बहुमत चाचणीपासून प्रत्येक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवले आहेत. तरीही हे नागडे का नाचत आहेत? एकनाथ शिंदे यांची गटनेते पदी झालेली नियुक्ती बेकायदेशीर आहे. फडणवीस वकील आहेत. त्यांनी नागपुरातील न्यायालयात वकिली केल्याचं ते सांगतात. मात्र, त्यांनी पुन्हा एकदा कायद्याची पुस्तकं चाळली पाहिजेत असा टोलाही संजय राऊतांनी दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने शिंदे आणि त्यांच्या सरकारला दिल्लीत पूर्ण नग्न केलं. नंतर विधानसभा अध्यक्षांकडे पाठवलं आहे. हे सरकार बेकायदेशीर असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. त्यांनी नेमलेला व्हिप बेकायदेशीर आहे. व्हिपने दिलेले आदेश बेकायदेशीर आहेत. तिथेच सरकारल हरलं आहे. सुनील प्रभूंचा व्हिपच कायदेशीर निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिल्यावर हे नागडं का नाचत पेढे वाटताहेत असा हल्लाबोलही संजय राऊतांनी केला आहे.