आता सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 1 हजार तर सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण केल्यास 5 हजार रुपये दंड

0
472

पिंपरी दि. १ (पीसीबी)
– सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणे, कचरा जाळणे, उघड्यावर शौच करणे, रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी रोडारोडा टाकणे, जैव वैद्यकीय घनकचरा सामान्य कच-यामध्ये अथवा रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी टाकणे आदी बाबींसाठी आकारण्यात येणा-या दंडाच्या रकमेत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी वाढ केली आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 1 हजार तर सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण केल्यास 5 हजार रुपये दंड दंड आकारला जाणार आहे.

  महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये प्रशासक राजेश पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. महापालिका सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना प्रशासक पाटील यांनी मान्यता दिली.  सार्वजनिक स्वच्छतेविषयक विविध बाबींकरीता निर्धारित करण्यात आलेल्या दंडाच्या रकमांचे पुनर्निधारण करण्यात आले असून प्रशासक पाटील यांनी या विषयाला मंजूरी दिली. 

सद्यस्थितीत कचरा टाकणे या बाबीकरीता 180 रुपये इतकी रक्कम दंड म्हणून आकारण्यात येते.  अनेक भागांमध्ये मोठ्या स्वरुपात कचरा टाकला जात असल्याच्या घटना घडलेल्या आहेत.  त्यामुळे कमी प्रमाणात कचरा टाकणे आणि मोठ्या प्रमाणात कचरा टाकणे या दोन्ही घटनांकरीता दंडाची रक्कम वेगवेगळी करण्यात आली आहे.  नागरिकांना अस्वच्छता करण्यापासून परावृत्त करण्याकरीता दंडाची रक्कम वाढविण्यात आली आहे.  त्याचबरोबर काही नवीन बाबींकरीता देखील दंडाची रक्कम निर्धारीत करण्यात आली आहे.

 रस्ते अथवा सार्वजनिक ठिकाणी छोट्या प्रमाणात कचरा टाकून अस्वच्छता केल्यास आता 500 रुपये दंड आकारला जाणार आहे.  तर ट्रक, टेम्पोद्वारे रस्ते अथवा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा टाकल्यास आता 180 रुपयांऐवजी 50 हजार रुपये दंड आकारला जाईल.  सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 1 हजार रुपये, उघड्यावर लघुशंका केल्यास 500 रुपये, उघड्यावर शौच केल्यास 1 हजार रुपये, सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण केल्यास छोट्या स्टीकर्ससाठी 500 रुपये तर मोठ्या स्टीकर्ससाठी 5 हजार रुपये, ऑनसाईट कंपोस्टींग (बल्क वेस्ट जनरेटर) बाबत पहिल्या प्रसंगी 5 हजार रुपये तर पुढील प्रत्येक प्रसंगी 15 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.   व्यावसायिक आस्थापनांमार्फत कचरापेटी न ठेवल्यास 500 रुपये, मोकळ्या प्लॉटमध्ये अस्वच्छता केल्यास 2 हजार रुपये दंड आकारण्यात येईल.  घरगुती, व्यावसायिक आणि निर्माणाधीन इमारती मॉल्स थिएटर्स मोठी रुग्णालये या ठिकाणी डासोत्पत्ती स्थानांची निर्मिती केल्यास अनुक्रमे 1 हजार, 2 हजार, 10 हजार रुपये दंड होईल. 

छोट्या स्वरुपात कचरा जाळण्याबद्दल 5 हजार रुपये, मोठ्या स्वरुपात कचरा जाळण्याबद्दल 25 हजार रुपये दंड केला जाईल.  बंदी असलेल्या प्लॅस्टीकचा वापर केल्यास पहिल्या प्रसंगाकरीता 5 हजार रुपये दुस-या प्रसंगाकरीता 10 हजार रुपये , तिस-या प्रसंगाकरीता 25 हजार रुपये दंड होईल. रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी राडारोडा टाकल्यास 3 हजार रुपये, जैववैद्यकीय घनकचरा सामान्य कच-यामध्ये अथवा रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी टाकल्यास 35 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तसेच मोबाईल टॉयलेट सेवेसाठीच्या शुल्कात वाढ करण्यात आली असून या सेवेसाठी आता  प्रतिदिन 300 रुपये तसेच अनामत 3 हजार रुपये भरावे लागणार आहे.  मैला उपसा सुविधेसाठी निवासीकरीता 1500 रुपये तर व्यावसायिककरीता 2500 रुपये शुल्क आकारण्यात येईल.