आता शिंंदे सरकारला पाहण्याची वेळ आलेली आहे – अजित पवार

0
124

मुंबई, दि. २ (पीसीबी) : राज्य सरकारच्या पर्यटन विभागाने ‘देखो आपला महाराष्ट्र’ अशी जाहिरात केली आहे. या सरकारला मराठी भाषेचीही अडचण निर्माण झाली आहे का? मराठीत देखो म्हणतात का? पहा आपला महाराष्ट्र असा म्हणा ना. हा देखो कोठला काढला? कुठल्या राज्यातून आला, हा देखो? आता ह्यांनाच पाहण्याची वेळ आलेली आहे, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिला.

महाविकास आघाडीची तिसरी वज्रमूठ सभा आज एक मे दिनी मुंबईत झाली. त्या सभेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने या सरकारला नपुसंक म्हटले आहे. त्याची या सरकारला लाज वाटत नाही. राज्यातील दंगली रोखण्याची जबाबदारी असतानाही ती जबाबदारी पार न पाडल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ही टिपण्णी केली आहे. त्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काही वाटत नाही का?

मुख्यमंत्रीसाहेब तुम्ही साडेबारा कोटी जनतेचे प्रमुख आहात. बोलत असताना घोटाळा करू नका. मात्र, हे घोटाळा करून मुख्यमंत्री झालेले आहेत. आता त्यांना जागा दाखवण्याची गरज आहे. आपली ऐकी टिकविण्यासाठी कार्यकर्त्यांनी दोन चार पावले मागे पुढे झाले पाहिजे. जिंकून येण्याची क्षमात हा उमेदवारीचा निकष असला पाहिजे. पण आपल्यातही जाणीवर्पूवक बातम्या पसरवल्या जातात. टिल्ली टिल्ली लोकही काहीही बोलत आहेत, असा टोमणाही पवार यांनी मारला.

बदल्यांचे रेट ठरले आहेत, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केला आहे. बदल्यासाठी रेट असा प्रकार महाराष्ट्रात कधीही घडलेला नव्हता. भ्रष्टाचारी कारभार राज्यात सुरू आहे. सर्व गोष्टी मंत्रालयातून हलत आहेत. जनतेच्या पैशाची वारेमाप उधळपट्टी चालेली आहे. जनतेच्या पैशावर यांचा उदोउदो कोण चालवून घेणार आहे, असा सवालही त्यांनी केला.

पवार म्हणाले की, मधल्या काळात दीडशे बैठका घेणारा हिंदकेसरी महाराष्ट्राला मिळाला, असा दावा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केला. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी त्यांचं षडयंत्र सुरू होते, हे त्यांनीच सांगून टाकलं आहे. मात्र, आम्ही सत्तेसाठी हपालेलो नाही. मात्र, जनतेच्या विकासाला तडा जाऊ न देणे आपली जबाबदारी आहे.