५ ऑक्टोबर १८८६
उत्तम वास्तुस्थापत्याचा नमुना असलेली इमारत आणि जागोजागी शहराच्या अनेक वर्षांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या पाऊलखुणा असलेली पुण्यातील महात्मा फुले मंडई अगदी कमी वेळातही नवख्या माणसासमोर शहराचे साधे आणि निर्मळ व्यक्तिमत्त्व उलगडते. ठिकठिकाणांहून येणाऱ्या पर्यटकांसाठी ही मंडई पुण्याचे महत्त्वाचे वैशिष्टय़ आहे.
पुण्याची मंडई म्हटल्यावर मंडईची आठ पाकळ्यांची देखणी इमारत डोळ्यांसमोर उभी राहते. या जुन्या मंडईचे पूर्वीचे नाव ‘रे मार्केट’. ही मंडई उभारण्यापूर्वी भाजीचा बाजार गावकोस मारुतीजवळ आणि नंतर शनिवारवाडय़ाच्या पटांगणात भरत असे. पुण्याची वाढती लोकसंख्या आणि गरजा ध्यानी घेऊन नगरपालिकेने १८८२ साली मंडई उभारण्याचा ठराव केला. त्याला महात्मा फुले, हरि रावजी चिपळूणकर अशा काही सभासदांनी विरोध केला. मंडई उभारणीला अडीच-तीन लाखांचा जो खर्च येईल तो शिक्षणकार्यासाठी खर्च करावा अशी त्यांची भूमिका होती. पण ठराव मंडईच्या बाजूने बहुमताने संमत झाला आणि बांधकामाला सुरुवात झाली. वासुदेव बापूजी कानिटकर या कंत्राटदारांकडे काम सोपवण्यात आले. कानिटकर हे अनुभवी कंत्राटदार होते. त्यांनी पुणे नगर वाचन मंदिर, आनंदाश्रम, फर्ग्युसन कॉलेज अशी ‘भव्य’ कामे त्याआधी केलेली होती. कंत्राटदार कानिटकरांनी त्यांनी अडीच-तीन वर्षांत काम पूर्ण केले. उंच टॉवर असणारी अष्टकोनी मंडई उभारण्यास त्या काळी तीन लाख रुपये खर्च झाला.
मंडईचे काम पूर्ण होताच तिचे उदघाटन मुंबई इलाख्याचे गव्हर्नर लॉर्ड रे यांच्या हस्ते ५ ऑक्टोबर १८८६ रोजी थाटामाटात झाले. त्या मुळे साहजिकच या मंडईला ‘रे मार्केट’ असे नाव देण्यात आले. पण पुढे १९४० साली आचार्य अत्रे यांनी ठराव मांडून लॉर्ड रे यांच्या ऐवजी ‘महात्मा फुले मंडई’ असे उचित नाव ठेवायला लावले. आचार्य अत्रे त्यावेळी नगरपालिकेत स्थायी समितीचे अध्यक्ष होते. मंडईच्या वरच्या बाजूला ‘लॉर्ड रे इंडस्ट्रियल म्युझियम’ होते. नगरपालिकेची कार्यालयेही तिथेच होती. तत्पूर्वी नगरपालिका रास्ता पेठेत एका जुन्या वाड्यात दोन खोल्यामध्येल होती.
नंतर भाजीविक्रेत्यांसाठी ही मंडई अपुरी पडत असल्याने साठच्या दशकात त्यालाच लागून नवी मंडई उभी राहिली. तत्कालीन गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते या मंडईचे उद्घाटन झाले होते. यातील जुन्या मंडईच्या इमारतीत नाशवंत भाजीपाला हवेशीर वातावरणात राहावा या दूरदृष्टीने केलेली गाळ्यांची रचना, इमारतीच्या प्रत्येक पाकळीच्या बांधणीतील सौंदर्यदृष्टी अगदी आवर्जून पाहण्यासारखी आहे. त्यामुळेच ठिकठिकाणाहून पुण्यात येणाऱ्या चोखंदळ पर्यटकांची पावले मंडईकडे आपसूक वळतात. परंतु केवळ इमारतीसाठीच मंडई पाहण्याजोगी आहे असे मुळीच नाही. मंडईच्या संपूर्ण परिसरात पावला-पावलावर जुन्या पुण्याचे दर्शन घडते. भाजी-फळांच्या मंडईबरोबरच या परिसरात वसलेल्या इतर वस्तूंच्या लहान बाजारपेठाही पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरतात. मंडईच्या जुन्या इमारतीसमोर असलेल्या लोकमान्य टिळकांच्या संगमरवरी पुतळ्यापासूनच या जुन्या पुण्याच्या दर्शनास सुरूवात होते. या पुतळ्याचे अनावरण १९२४ मध्ये मोतीलाल नेहरूंच्या हस्ते झाले होते. हा भाग म्हणजे मोठमोठय़ा नेत्यांच्या सभा, सामाजिक आंदोलने, मोर्चे अशा अनेक घडामोडींचे केंद्रस्थान. या पुतळ्याकडे तोंड करून उभे राहिले तर उजव्या हातास आत्तार गल्ली (म्हणजेच आप्पासाहेब थोरात मिनी मार्केट). प्रामुख्याने पूजा साहित्याची विक्री करणाऱ्या या दुकानांमध्ये प्रत्येक सणाला लागणाऱ्या सजावटीच्या लहानमोठय़ा वस्तू मिळतात. टिळक पुतळ्याच्या डाव्या हाताला फळविक्रेते बागवान आणि विडय़ाची पाने विकणाऱ्या तांबोळी समाजाची दुकाने आहेत. या दोन्हीच्या मध्ये असलेल्या भागात पूर्वी टांगातळ होता. मिनव्र्हा आणि आर्यन चित्रपटगृहे हीदेखील एकेकाळी या ठिकाणाची ओळख होती. गावातून आलेली कष्टकरी मंडळी सहकुटुंब आर्यन चित्रपटगृहात मराठी चित्रपट पाहण्यासाठी आवर्जून जात असत.