आजचे राजकारण धनसंपत्ती, मीडियाच्या आधारे चालते का ?

0
188

– सारंग कामतेकर

आज सकाळी एका ज्येष्ठ डॉक्टर दांपत्याने वैद्यकीय क्षेत्रातून निरोप घेत असल्याचा त्यांचा भावनिक लेख वाचला. या लेखातून त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातल्या आपल्या प्रवासातल्या उतार-चढावांचे खूप मार्मिक वर्णन केले होते. वैद्यकीय व्यवसायातील झालेले बाजारीकरण व बदल याबाबत त्यांनी तपशीलवार विवेचन केले होते. वैद्यकीय क्षेत्रातल्या सध्याच्या परिस्थितीचा जो आढावा त्यांनी घेतला होता तो खूपच विचार करायला लावणारा होता. त्यांच्या या लेखाने माझ्या मनावर खोलवर परिणाम झाला.

“दोन दशकांच्या माझ्या राजकीय जीवनात मी एका विचारवंताचे म्हणणे नेहमी लक्षात ठेवले होते. त्यांनी म्हटले होते की, ‘खरा नेता राज्य करण्यासाठी नाही, तर सर्वांच्या हितासाठी काम करण्यासाठी असतो.’ ज्येष्ठ डॉक्टर दांपत्याने लिहिलेल्या लेखामुळे माझ्या मनात सहज विचार आला कि, मी खरोखरच ज्या उद्देशाने राजकारणात आलो होतो, त्या उद्देशाला साध्य करण्यासाठी किती प्रमाणात यशस्वी झालो आहे ? आजूबाजूला पाहताना आजच्या राजकीय परिस्थितीत समाजसेवेच्या नितीमूल्यांचे महत्त्व कितीपत शिल्लक आहे ? या प्रश्नांनी मला आत्मनिरीक्षण करायला लावले.

काळाच्या ओघात राजकारणात मोठा बदल झाला आहे. आजचे राजकारण हे पूर्वीच्या राजकारणाच्या तुलनेत पूर्णपणे बदलले आहे. एकेकाळी विचारधारा आणि सिद्धांतांवर आधारित असलेले राजकारण आता सत्ता मिळवण्याच्या स्पर्धेत रुपांतरीत झाले आहे. नितीमुल्ये, तत्व, आदर्श या भावना आता मागे पडल्या आहेत आणि त्याऐवजी सत्ता मिळवण्यासाठी काहीही करण्याची मानसिकता आणि व्यवहारवाद प्रबळ झाला आहे. सार्वजनिक सेवेचा मार्ग असलेले राजकारण आता फक्त सत्ता, पैसा आणि विशेषाधिकार मिळवण्याचा मार्ग बनले आहे. निवडणुका, ज्यांच्यामधून जनता आपले प्रतिनिधी निवडते, त्या आर्थिक ताकदीच्या लढाईचे मैदान बनल्या आहेत. या बदलांमुळे निःस्वार्थ सेवेची प्रामाणिक भावना असलेल्या व्यक्तीला त्यांच्या तत्त्वांनुसार राहणे कठीण झाले आहे.

एकेकाळी मला वाटायचे की, राजकारण हे समाजातील असमानता दूर करण्याचे, वंचितांना बळ देण्याचे आणि न्यायपूर्ण समाज निर्माण करण्याचे एक शक्तिशाली माध्यम आहे. राजकीय कार्यकर्त्यांचे कार्य हे त्यांच्या विचारांवर आधारित असायचे आणि जनतेशी त्यांचे नाते खूप दृढ असायचे. पण आजची राजकीय परिस्थिती अगदी वेगळी आहे. आर्थिक हितसंबंधांचे राजकारणात वर्चस्व आहे आणि निवडणुकांमध्ये पैसा आणि जाहिरात्बाजिकचा जोर इतका वाढला आहे की, उमेदवाराची योग्यता किंवा त्याची विचारसरणी यापेक्षा पैसाच निवडणुकीच्या निकालाचा निर्धारक घटक बनला आहे. यामुळे लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांनाच धोका निर्माण झाला आहे.

देशाच्या लोकशाही व्यवस्थेचा पाया हा मतदार आहे. मतदार म्हणजेच देशाचा मालक. मात्र, आजकाल आपण अशी स्थिती पाहत आहोत की, मतदारांमध्ये राजकीय प्रक्रियेबद्दल एक निराशा दिसून येते. मतदार आणि राजकीय कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी यांच्यामधील विश्वासही कमालीचा कमकुवत झाला आहे.

विचारांच्या आदान-प्रदानापेक्षा आजकाल मतभेदांवरच भर दिला जातो, ही एक दुर्दैवी परिस्थिती आहे. पूर्वी देशाच्या भविष्याबाबत, प्रगतीबाबत वेगवेगळे विचार मांडले जात असत; पण आजचे वादविवाद स्वार्थ साधण्यापुरते मर्यादित राहिले आहेत. धर्म, जात आणि वैयक्तिक आक्रमणांच्या आधारे होणारे वादविवाद आता सर्वत्र दिसून येत आहेत. सत्य आणि तथ्यांची जागा आता अतिरंजित व आधारहीन युक्तिवादाने घेतलेली आहे.

पूर्वी राजकारण हे लोकांच्या हृदयात जाऊन त्यांचे विश्वास जिंकण्याचे माध्यम होते. लोकांच्या दारात जाऊन त्यांच्या समस्या समजून घेण्याचे आणि त्यावर उपाय करून देणे हेच प्रमुख कार्य होते. पण आज, राजकारण हे केवळ सत्तेच्या भूक आणि स्वार्थाचे केंद्र बनले आहे. राजकीय कार्यकर्ते मोठ्या घोषणांच्या आडून लपून बसतात आणि पैशांच्या जोरावर मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करत आहेत. काळाच्या ओघात, राजकीय कार्यकर्त्यांचे महत्त्व का कमी झाले आहे.

मी या परिस्थितीत बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करू इच्छितो. कदाचित माझे हे प्रयत्न इतरांनाही प्रेरणा देऊ शकतील. मी ज्या मूल्यांवर विश्वास ठेवतो, त्यांच्याशी तडजोड न करता लोकांच्या सेवा करण्याची माझी इच्छा कायम आहे. माझ्या अंतःकरणाला भावणार्‍या मूल्यांना धरून, लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याची माझी प्रेरणा कायम आहे. राजकीय स्थितीमध्ये सकारात्मक बदलाच्या प्रक्रियेची सुरुवात आपण सर्व मिळून करू शकू, असा मला विश्वास आहे.


🙏🏻🙏🏻🙏🏻
सारंग अविनाश कामतेकर