आंद्रातून पाणी आणण्यासाठी आता 20 ऑगस्टची मुदत

0
201

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या आणि पाण्याचे अपुरे प्रमाण यामुळे शहरातील विविध भागात पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. त्यामुळे महापालिकेने आंद्रा धरणातून 100 एमएलडी आणि भामा आसखेड धरणातून 200 एमएलडी पाणी आणण्याचे नियोजन केले आहे. पहिल्या टप्यात आंद्रा धरणातून 100 एमएलडी पाणी आणण्यात येणार आहे. त्यासाठी आता 20 ऑगस्टपर्यंत 100 एमएलडी पाणी शहराला मिळेल, असा दावा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे.

शहरवासीयांना 2019 पासून दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. शहराला मावळातील पवना धरणातून पाणी पुरवठा केला जात आहे. पवना धरणातून महापालिका 510 एमएलडी पाणी उचलते. मात्र, शहराची वाढती मागणी लक्षात घेता महापालिका प्रशासनाने आंद्रा धरणातून 100 एमएलडी आणि भामा आसखेड धरणातून 200 एमएलडी पाणी आणण्याचे नियोजन केले आहे. पहिल्या टप्यात आंद्रा धरणातून 100 एमएलडी पाणी आणण्यात येणार आहे. हे पाणी आंद्रा धरणातून इंद्रायणी नदीत सोडले जाणार आहे.

निघोजे येथील बंधाऱ्यांवरून महापालिका चिखली येथील नव्याने बांधण्यात आलेल्या जलशुध्दीकरण केंद्रात पाणी आणणार आहे. त्याठिकाणी पाणी शुध्द केल्यानंतर चिखली, भोसरी, मोशी, चऱ्होली आदी भागात या पाण्याचे वितरण करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. मात्र, आंद्रा धरणातून पाणी आणण्याचे हे काम सुमारे दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी होऊन गेला आहे. तरीही अद्याप काम पूर्ण झाले नसून सध्यस्थितीत 95 टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा पाणी पुरवठा विभागातील अधिकारी करत आहेत.

दरम्यान, 15 जुलैपर्यंत शहराला वाढीव 100 एमएलडी पाणी मिळणार असल्याचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी यापूर्वीच सांगितले होते. हा मुहूर्त पुन्हा टळला असून आता पाणी पुरवठा विभागाच्या वतीने नव्याने 20 ऑगस्टचा मुहूर्त दिला आहे. या मुदतीत तरी काम पूर्ण होऊन शहरवासियांना वाढीव पाणी मिळेल का?असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

कार्यकारी अभियंता देवान्ना गट्टूवार म्हणाले, ”आंद्रा धरणातून पाणी आणण्याचे 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. विद्युतविषयक कामकाज बाकी आहे. पावसाळ्यामुळे खोदाईचे काम करण्यास अडचण निर्माण होत आहे. मात्र, 20 ऑगस्टपर्यंत सर्व काम पूर्ण होऊन वाढीव पाणी शहरवासीयांना मिळेल”.