अरवली टरेन व्हेहिकल चॅम्पियनशिप २०२३ राष्ट्रीय स्पर्धेत पीसीसीओईआरचे नेत्रदिपक यश

0
271

सहा पदके मिळवून पीसीसीओईआरने रचला इतिहास

पिंपरी,दि. १५ (पीसीबी) – तळेगाव येथे आयोजित केलेल्या एटीवीसी २०२३ या राष्ट्रीय स्पर्धेत रावेत येथील पीसीसीओइआरच्या मेकॅनिकल विभागातील टीम नॅशोर्न्सने सहा पदकांची कमाई करीत २,०५,०००/- रुपयांचे पारितोषिक पटकावले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे (पीसीईटी) अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्राचार्य डॉ. हरिश तिवारी, विभागप्रमुख डॉ. रमेश राठोड यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले. स्पर्धेचे समन्वयक म्हणून प्रा.अनंत कुऱ्हाडे, प्रा.सुखदिप चौगुले आणि प्रसाद शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संघप्रमुख निशित सुभेदार, उपसंघप्रमुख ब्लिस तुस्क्यॅनो सोबत चालक ॲलविन जेम्स आणि तन्मय तोरणे यांचे सुद्धा विशेष अभिनंदन करण्यात आले.

या स्पर्धेत देशभरातील शंभर पेक्षा जास्त नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयाने सहभाग घेतला होता. टीम नॅशोर्न्सने वेगवेगळ्या स्पर्धाप्रकारात ऑल इंडिया रँक, एनडूरन्स, स्लेज पुल, मॅन्युवेराबिलिटी या गटात प्रथम क्रमांक पटकावला तर डिझाईन वॅलीडेशन व्दितीय आणि सस्पेंशन अँड ट्रॅक्शन गटात तृतीय क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्याचा कस पाहणाऱ्या या अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत पहिल्याच दिवशी या संघाने टेक्निकल इन्स्पेक्शन आणि डिझाईन वॅलीडेशन सर्वप्रथम पार पाडले. स्पर्धेच्या दुसऱ्यादिवशी संघाने स्लेज पुल या स्पर्धाप्रकारामध्ये सर्वोत्कृष्ट रेकॉर्ड प्रस्थापित केला.

अत्यंत कठीण असलेला मॅन्युवेराबिलिटी ट्रॅक सर्वात कमी वेळामध्ये पार करून पुन्हा एकदा टीम नॅशोर्न्स पीसीसीओईआरने नवीन विक्रम प्रस्थापित केला. सर्वोच्च विक्रमाची नोंद करण्यासाठी हा संघ एनडूरन्स रेस स्पर्धेत दाखल झाला. निर्धारित वेळेत दिलेल्या तीन तासात तब्बल ८४ लॅप्स (१५० कि.मी.) पूर्ण करून अशक्यप्राय असलेल्या यशाला गवसणी घातली. संघाला मिळालेल्या या यशामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.