अमोल कोल्हेंना भाजपच्या विचारांची भूरळ? ट्विटरवर शेअर केलेल्या फोटोने चर्चा

0
248

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – गेल्या काही दिवसांपासून खासदार अमोल कोल्हे नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. अलीकडच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमातही ते फारसे दिसत नाहीत.अमोल कोल्हे राष्ट्रवादीवर नाराज असून येत्या काळात ते मोठा निर्णय घेऊ शकतात, अशाही चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. याबद्दल त्यांनी अद्याप कोणतीही ठोस भूमिका जाहीर केलेली नाही. मात्र त्यांच्या एका पोस्टमुळे पुन्हा एकदा ते भाजपच्या वाटेवर आहेत का? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.

अमोल कोल्हे यांनी त्यांच्या फेसबुकवर जागतिक पुस्तक दिनानिमित्त दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत त्यांच्या हातात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भाषण संग्रहाचे ‘नेमकेची बोलणे’ हे पुस्तक आहे. तर दुसऱ्या फोटोत नलिन मेहता यांचे ‘द न्यू बीजेपी’ नावाचे पुस्तक दिसत आहे. त्यांच्या या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

अनेक दिवसांपासून अमोल कोल्हे नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. काही दिवसांपुर्वी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर त्यांना पुढील निवडणूक भाजपमधून की राष्ट्रवादीतून लढवणार? असाही प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी उत्तर देताना म्हटलं होतं की, ‘आधी आभाळं बघायचं, वारं बघायचं अन् मग नांगरायला घ्यायचं. त्यामुळे उद्याची निवडणूक लढायची की नाही ते आता कशाला सागायचं?’ असं सूचक वक्तव्यही अमोल कोल्हेंनी केलं होते.

तर दुसरीकडे, आगामी लोकसभा निवडणुकीत पार्थ पवार यांना शिरुर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. कारण गेल्यावेळी मावळमध्ये त्यांचा दारुण पराभव झाला होता. त्यामुळे ते पुन्हा तेथून लढण्याचे धाडस पार्थ करणार नाही. पण राष्ट्रवादीसाठी तुलनेने सोपा असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात त्यांना उमेदवारी देणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर अमोल कोल्हेंनी द न्यू बीजेपी हे पुस्तक वाचत असल्याची सूचक पोस्ट करून कोल्हे यांनी राष्ट्रवादीला इशारा दिलाय की काय असाही प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.