अमेरिकेत घडली मन हेलावून टाकणारी घटना; स्फोट होऊन भीषण आग, 18 हजार गायींचा मृत्यू

0
279

वॉशिंग्टन, दि. १४ (पीसीबी) : अमेरिकेतील टेक्सासमध्ये (Texas) एक वेदनादायक दुर्घटना घडली आहे. एका भीषण स्फोटात एक डेअरी फार्म उद्ध्वस्त झाला असून, 18,000 हून अधिक गायींचा मृत्यू झाला आहे. इतक्या गुरांचा मृत्यू झाल्याची अमेरिकेतील ही पहिलीच घटना आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, टेक्सासमधील डिमिटमधील साउथ फोर्क डेअरी फार्ममध्ये सोमवारी हा स्फोट झाला. (Texas Dairy Farm Explosion) एका इमारतीतून शेतात आग लागली. संपूर्ण परिसरात काळा धूर पसरला होता.

रॉयटर्सच्या अहवालानुसार, हे फार्म टेक्सासमधील सर्वात मोठे दूध उत्पादक कुटुंबाचे होते. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या पथकाला तासन्तास मेहनत घ्यावी लागली, त्यानंतर 18 हजारांहून अधिक गायींचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. अग्निशमन दलाने सांगितले की डेअरी फार्मचा कर्मचारी त्यात अडकला होता, त्याला अधिकाऱ्यांनी वाचवले आणि रुग्णालयात दाखल केले. सध्या आगीचे कारण शोधले जात आहे. कौंटी न्यायाधीश मॅंडी गेफ्लर म्हणाले की, उपकरणातील बिघाडामुळे स्फोट झाला असावा असा संशय आहे.

2013 पासून, अॅनिमल वेल्फेअर इन्स्टिट्यूट (AWI) ने अशा घटनांचा मागोवा घेणे सुरू केले. यावरून असे दिसून येते की, गेल्या दशकात अशा आगीच्या घटनांमध्ये सुमारे 65 लाख जनावरे मृत्युमुखी पडली आहेत, त्यापैकी बहुतांश कोंबड्या आहेत. तथापि, टेक्सासच्या शेतातील आग ही गुरांचा समावेश असलेली सर्वात विनाशकारी आग होती. अॅनिमल वेल्फेअर इन्स्टिट्यूट (AWI) च्या निवेदनानुसार, प्राण्यांना आगीपासून वाचवण्यासाठी कोणतेही संघीय नियम नाहीत आणि फक्त काही राज्यांनी अग्निसुरक्षा कोड स्वीकारला आहे. यामध्ये टेक्सासचा समावेश नाही.