पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – विविध भारती म्युझिकल इव्हेंट प्रस्तुत ‘चित्रहार’ या सुमधुर हिंदी – मराठी गीतांच्या दृकश्राव्य माध्यमातील मैफलीने रसिकांना स्मरणरंजनाची अनुभूती प्राप्त झाली. विनायक कदम आणि नंदकुमार कांबळे यांनी आकुर्डी प्राधिकरणातील गदिमा मिनी थिएटरमध्ये रविवार, दिनांक १० मार्च २०२४ रोजी या मैफलीचे आयोजन केले होते. दिशा सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब जवळकर, कार्याध्यक्ष सचिन साठे, उपाध्यक्ष संतोष बाबर, परमेश्वर घाडगे, विराज कदम, सायली सरोदे आदी मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
सुजाता माळवे, अनिल जंगम, शुभांगी पवार, शशिकांत नलावडे, दैवशाला घाडगे, माधव पावगी, संध्या मोरे, अरुण सरमाने, विनायक कदम आणि नंदकुमार कांबळे या गायक कलाकारांनी अवीट गोडीच्या एकल आणि विशेषतः युगुलगीतांच्या बहारदार सादरीकरणाने रसिकांना जुन्या काळात नेले. गीतांचे सादरीकरण होत असताना पार्श्वभूमीवरील पटलावर त्या चित्रपटातील दृश्ये, मूळ गायक, गीतकार, संगीतकार यांचा तपशील रसिकांच्या असंख्य जुन्या आठवणींना उजाळा मिळत होता.
नुकत्याच झालेल्या जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून श्रोत्यांमधील पाच प्रातिनिधिक महिलांच्या हस्ते गायिकांना सन्मानित करण्यात आले. गणेशस्तवनाने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. “चांदी जैसा रंग हैं तेरा…” या गीताच्या माध्यमातून नुकतेच दिवंगत झालेल्या पंकज उधास यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. “शोधीशी मानवा…”, ‘मैं कही कवी न बन जाऊं…”, ” दिल, जिगर, नजर क्या हैं…” , “सांज ढले, गगन तले…”, “पर्बतोंसे आज मैं…”, “निंदियासें जागी बहार…”, ” मेरे सपनोंकी रानी…” या एकल गीतांसोबतच “दिल जाने जिगर…”, ” किसी नजर को तेरा…” , “ये मैंने कसम ली…”, ” जब दीप जले आना…” , “ले चल मुझे…” या युगुलगीतांना रसिकांनी ‘वन्स मोअर’ची फर्माईश केली. “सारंगा तेरी याद में…” या मुकेशच्या आवाजातील गीताचे संध्या मोरे यांनी केलेले सादरीकरण, अनिल जंगम यांनी द्वंद्वगीतांचे महिला आणि पुरुष आवाजात केलेली पेशकश, “हरी ओम हरी…”च्या पाश्चात्य ठेक्याची सुजाता माळवे यांनी अचूक पकडलेली लय, “ओ हंसिनी…” या गीताच्या माध्यमातून नंदकुमार कांबळे यांनी साधलेले किशोरकुमारच्या आवाजाशी साधर्म्य रसिकांना विशेष भावले. उत्तरोत्तर रंगतदार झालेल्या मैफलीचा “परदेमें रहेने दो…” म्हणत शुभांगी पवार यांनी केलेला समारोप रसिकांच्या मनाला हुरहुर लावून गेला.
सा रे ग म प म्युझिकल इव्हेंटच्या शैलेश घावटे यांनी तांत्रिक साहाय्य केले. अरुण सरमाने, सानिका कांबळे आणि शुभांगी पवार यांनी मैफलीचे निवेदन केले.