अनिल परब यांचे रिसॉर्ट पाडायला कोटी रुपये खर्च

0
407

रत्नागिरी, दि. १५ (पीसीबी) : दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनाऱ्यावरील ठाकरे गटाचे माजी मंत्री अनिल परबांशी संबंधित असलेले वादग्रस्त “साई रिसॉर्ट” आणि “सी शंख” रिसॉर्ट पाडण्यासाठी आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी तसेच जमीन पूर्ववत करण्यासाठी येणारा खर्च हा जवळपास ९२ लाख रुपये आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तसा अंदाजपत्रकीय प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. मात्र, यावेळी महसूल, पोलीस सुरक्षा आदी गोष्टींसाठी येणारा अंदाजित खर्च १ कोटीपर्यंत जाणार आहे.

ही दोन रिसॉर्ट पडण्यासाठी यापूर्वीही कन्सल्टंटची नेमणूक करुन जाहीर निविदा काढण्यात आली होती. मात्र, कन्सल्टंट कोटेशन न मागवता हे काम सार्वजनिक बांधकाम विभागानेच करावे असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी सा.बां. विभागाला दिले आहेत. त्यामुळे आता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पाठवण्यात आलेल्या अंदाजपत्रकीय प्रस्तावास मंजूरी मिळाल्यानंतरच निविदा काढून ठेकेदार नेमणूक करुन ही दोघंही रिसॉर्ट पाडण्यात येणार आहेत. मात्र, यासाठी अजून किती कालावधी लागेल हे निश्चित नाही. पण किमान एक ते दोन महिने या कार्यवाहीसाठी लागतील असा अंदाज आहे. त्यामुळे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिलेली दिवाळीची डेड लाईनही हुकण्याची शक्यता आहे.

सद्यस्थितीत मुरुड येथील “साई रिसॉर्ट” हे कांदिवली (पूर्व) येथील रहिवासी सदानंद कदम यांच्या मालकीचे आहे. तर “सी शंख” दे रेसॉर्ट बीचच्या मालकीचे आहे. दापोली पोलिसांनी सी शंख बीचच्या मालकावर पर्यावरणाची हानी केल्याप्रकरणी एफआयआर दाखल केला होता. २५ ऑगस्ट २०२२ रोजी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांनी झोन मॉनिटरिंग समितीच्या अधिकार्‍यांना अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यास सांगितले होते. पाडण्याचा खर्च जमीन मालकांकडून वसूल केला जाणार आहे. हे रिसॉर्ट सुमारे तीन वर्षांपूर्वी बांधण्यात आले होते. दोन रिसॉर्ट्सची रेखाचित्रे (इमारत प्लॅन) कोणत्याही स्थानिक शासकीय कार्यालयात अनुपलब्ध आहेत. त्यामुळे या रिसॉर्टला पाडण्याच्या प्रक्रियेस वेळ लागत आहे. ग्राउंड प्लस दोन मजली साई रिसॉर्ट आणि सर्व्हंट क्वार्टरचे एकत्रित क्षेत्रफळ १४७२ चौरस मीटर आहे.

किरीट सोमय्या यांनी हे रिसॉर्ट अनिल परब यांचेच असल्याचा आरोप केला होता. तर सदानंद कदम यांनीही अनिल परब यांच्याकडून आपण हे रिसॉर्ट विकत घेतले असं लिहून दिलं आहे, असं देखील सोमय्या यांनी सांगितलं होतं. हे रिसॉर्ट बांधण्यासाठी अनिल परब यांनी आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप करुन केंद्र सरकारच्या सीआरझेड कायदयाचे उल्लंघन करुन ही बेनामी संपत्ती उभी केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन करुन बांधलेले हे रिसॉर्ट पाडण्यासाठी सोमय्या यांचा पाठपुरावा सुरु आहे. हे रिसॉर्ट म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीच्या घोटाळयाचे स्मारक असल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला होता. दरम्यान, हे सगळे आरोप अनिल परब यांनी फेटाळून लावत या रिसॉर्टशी आपला कोणताही संबंध नाही असा दावा केला होता.