अधिकारांच्या मागणीसाठी मराठा समाजाची एकता हीच ध्येय गाठण्याची गुरुकिल्ली ठरेल – शत्रुघ्न काटे.

0
222

पिंपरी, दि.३१ (पीसीबी) – छत्रपती शिवाजी महाराज चौक, रहाटणी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या “एकच मिशन मराठा आरक्षण” या चळवळीला पाठिंबा देण्यासाठी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी सहभाग घेत पाठिंबा दिला. मराठा आरक्षणाची मागणी ही गेल्या 40 वर्षांपासून होतेय परंतु मराठा आरक्षणाला संजीवनी देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाने राज्यातील मराठा समाज एकवटला असून मराठा आरक्षणाच्या निमित्ताने राज्यभर सुरू झालेल्या तीव्र आंदोलनाचे ज्वलंत धग पहावयास मिळत आहे. मनोज जारंगे-पाटील यांनी आमरण उपोषण सुरू करून पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा वणवा पेटवला. काही ठिकाणी या आंदोलनाचे हिंसक प्रतिसाद देखील उमटत आहे.

राज्यातील मराठा समाजाची फक्त एवढीच मागणी आहे की दुसर्‍या कोणाच्या आरक्षणाला धक्का न लावता व कायद्याच्या चौकटीत टिकणारे असे मराठा समाजाला आपल्या हक्काचे स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे आणि सरकारने याबाबत ठोसपणे , आवश्यक व सकारात्मक पाऊल उचलून राज्यातील मराठा समाजाला न्याय द्यावे अशी भावना नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी व्यक्त केली तसेच या आंदोलन दरम्यान तरुणांनी टोकाची भूमिका घेऊ नये असे आवाहन देखील केले आहे.
तसेच उद्या १ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ७ वा. पिंपळे सौदागर येथील पी.के.चौक याठिकाणी सकल मराठा समाज व समस्त पिंपळे सौदागर ग्रामस्त मार्फत एक दिवसीय उपोषण करण्यात येणार आहे.