अत्रेसाहेबांच्या ‘महाराष्ट्रनिष्ठा’ बावनकशी सोन्यासारख्या!

0
82
  • मधुकर भावे

१३ ऑगस्ट २०२४…
आचार्य अत्रे यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाची सांगता उद्या होईल. १३ ऑगस्ट १८९८ हा अत्रेसाहेबांचा जन्मदिवस. गेली १०० वर्षे आचार्य अत्रे हे नाव महाराष्ट्रात दुमदुमत आहे. १३ जून १९६९ ला अत्रेसाहेब गेले. त्यांना जाऊन आता ५५ वर्षे झाली. ५५ वर्षांनंतरही त्यांची ‘पुण्यतिथी’ आणि ‘जयंती’ महाराष्ट्रात साजरी होते आहे आणि वर्षाच्या ३६५ दिवसात, अनेक क्षण असे येतात की, त्या दिवशी तमाम महाराष्ट्राला असे वाटते, ‘आज अत्रेसाहेब हवे हाेते.’ एका पत्रकाराचा, एका साहित्यिकाचा, एका महान नाटककाराचा, एका चित्रपटकाराचा आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी लढलेल्या योद्ध्याचा… महाराष्ट्राला जयंतीदिनी तरी निदान विसर पडलेला नाही, हे सुद्धा काही कमी नाही! ‘अत्रे-कट्टा’ आज महाराष्ट्रात अनेक गावांत सुरू आहे. अशोक हांडे यांच्यामुळे ‘अत्रे-अत्रे-सर्वत्रे’ या कार्यक्रमातून नवीन पिढीला अत्रेसाहेब निदान माहिती तरी होत आहेत. याखेरिज ‘अत्रेय’ संस्थेचे अॅड. राजंेद्र पै, विक्रम पै, हर्षवर्धन देशपांडे आणि कुटुंबीयांतर्फे दरवर्षी १३ ऑगस्टला दिल्या जाणाऱ्या ‘साहित्य सम्राट आचार्य अत्रे पुरस्कारा’मुळे अत्रेसाहेबांच्या नावाचा गजर महाराष्ट्रात निदान काही काळ होतो. या खेरीज अत्रेसाहेबांच्या सासवड या गावी श्री. विजयआण्णा कोलते आणि त्यांचे स्थानिक आमदारांसह सर्व सहकारी गेली ३० वर्षे अत्रेसाहेबांची पुण्यतिथी आणि जयंती अतिशय जोरदापणे साजरी करत आहेत. साहित्य संमेलन भरते… व्याख्याने होतात…. सासवड येथील आचार्य अत्रे सभागृह आणि नाट्यगृह श्री. विजयअण्णा कोलते यांच्या प्रयत्नानेच उभे राहले आहे.

अर्ध पुतळासुद्धा! पुण्यात बाबुराव कानडे हे ही अत्रेसाहेबांच्या स्मृती जागवतात. मुलुंडला श्रीकांत फौजदार आणि त्यांचे सहकारी ‘आचार्य अत्रे जयंती समितीतर्फे’ खूप मोठे कार्यक्रम आयोजित करत असतात. या सर्वांचे अत्रेप्रेम मनापासूनचे आहे.
वरळी येथे आचार्य अत्रे यांचा पुतळा मराठी माणसाच्या स्वाभिमानाचे प्रतिक म्हणूनच उभा आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे हा पुतळा उभा राहिला. आणि प्रमोद नवलकर त्यावेळी सांस्कृतिककार्य मंत्री होते, त्यांचाही हातभार लागला. वरळीहून जाणाऱ्या मेट्रोच्या नकाशात ‘हा पुतळा हटवावा,’ असे प्रयत्न होत होते. पण, मेट्रोच्या त्यावेळच्या संचालक श्रीमती अश्विनी भिडे यांनी ठामपणे त्याला नकार दिला. मेट्रोचा संकल्पित नकाशा थोडा बदलला. आज वरळीच्या याच मेट्रो रेल्वे स्टेशनला ‘आचार्य अत्रे स्टेशन’ हे नाव दिले जाणार आहे. तशी पाटीही तिथे लागलेली आहे. हे सगळे पाहात असताना मराठी माणसाला निश्चितच आनंद होतो. कारण, मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी साहित्य, मराठी पत्रकारिता, मराठी नाटक आणि मराठी चित्रपट अशी दहा क्षेत्रे आहेत की, जिथे अत्रेसाहेबांच्या उंचीला कोणीही पोहोचलेले नाही. आणि पोहोचणे शक्यही नाही. जे जे उन्नत, उदात्त आणि उंचच उंच, तिथे तिथे अत्रेसाहेबांचाच हात पोहोचतो. म्हणूनच देशातील चित्रपटांना दिले जाणारे राष्ट्रपतींचे पहिले सुवर्णपदक…. आचार्य अत्रे यांच्या ‘श्यामची आई’ या चित्रपटाला मिळते. सात परिक्षकांमध्ये एकही परिक्षक मराठी भाषिक नव्हते. श्री. मंगलदास पक्वासा (अध्यक्ष), सदस्य म्हणून कमलादेवी चटोप्पाध्याय, कवी प्रा. रामधारीसिंह (दिनकर), बी. डी. मिरचंदानी (आय.सी.एस. सचिव), एस. एम. आय्यर हे सगळे बिगर मराठी परिक्षक. आणि निवड झाली ती ‘श्यामची आई’ या चित्रपटाची. महाराष्ट्राचा हा सर्वोच्च गौरव. आणि स्पर्धेसाठी असलेल्या अन्य दोन चित्रपटांत बिमल रॉय यांचा ‘दो बिघा जमीन’ आणि सोहराब मोदी यांचा ‘झाँशीची रानी’ हे दोन जबरदस्त चित्रपट असताना, राष्ट्रपतींचे सुवर्णपदक ‘शामची आई’ चित्रपटासाठी अत्रेसाहेबांच्या गळ्यात पडते. असे उत्तुंग पराक्रम करणारे अत्रेसाहेब महाराष्ट्रातून वजा केले तर संयुक्त महाराष्ट्र झालाच नसता. अत्रेसाहेबांचे सगळे साहित्य, त्यांची ‘झेंडूची फुलं…’ त्यांची सगळी नाटकं… सगळे चित्रपट, एका बाजूला आणि संयुक्त महराष्ट्राच्या लढ्यात दोन हातात दोन दांडपट्टे घेऊन लढलेला आणि लेखणीची तोफ केलेला हा नेता. अन्य मोठे नेते होतेच.. एस. एम. होते… डांगे होते… क्रांतिसिंह होते… प्रबोधनकार होते.. दादसाहे गायकवाड होते… उद्धवराव पाटील होते… तरीही हे मराठी राज्य आणि या राज्याचे ‘महाराष्ट्र राज्य’ हे नाव, केवळ आणि केवळ अत्रेसाहेबांमुळे मिळालेले आहे. कोणी स्वीकारो…. नाकारो… महाराष्ट्र नावाचा हा इितहास आहे. अत्रेसाहेबांवर आजपर्यंत प्रत्येक जयंती आणि पुण्यतिथीला खूप काही लिहिले आहे.. माझी दोन पुस्तकेही झाली… १०० व्याख्याने झाली. तरी अत्रेसाहेब शिल्लकच राहतात. पण, १२५ वी जयंती मंगळवार दिनांक १३ ऑगस्ट रोजी साजरी होत असताना, अत्रेसाहेबांचा चेहरा समोर येतो तेव्हा काही वेदनांनी अस्वस्थ होऊन जाते.
हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा ज्या मराठी माणसांनी लढवला त्या मराठी माणसामध्ये आघाडीवर होते ते प्रामुख्याने दोन घटक… एक शेतकरी आणि दुसरा लढाऊ कामगार. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीला आता पुढच्या वर्षी १ मे रोजी ६५ वर्षे होतील. या ६५ वर्षांमध्ये चिरडून टाकला गेला तो शेतकरी आणि कामगारच. १५ हजार शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या… शेतकऱ्यांवर ही वेळ कोणी आणली…? का आली…? मराठी माणूस कुठे आहे? मुंबईतील गिरणी कामगार कोणी चिरडला…? कसा चिरडला….? छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाच्या घोषणा करून आणि पान-पान जाहिराती देवून, राज्य चालवणारे महाराष्ट्राचे आर्थिक लचके तोडले जात असताना दिल्लीवाल्यांसमोर शरणागती पत्करतात… इथला कामगार चिरडला जातो… इथचा हिरे बाजार पळवला जातो… इथले पोर्ट ट्रस्टचे मुख्य कार्यालय पळवले जाते… मुंबईचे मोक्याचे भूखंड कोणाला विकले जात आहेत? मुंबईचा एअरपोर्ट कोणाला विकला? इथला मराठी उद्योगपती संपवला जातो… गरवारे संपले, किर्लोस्कर संपले, चौगुले संपले… गोगटे संपले, मराठी उद्योजक हताश झाले. बांडगुळासारखे वर आलेले अंबानी-आदाणी महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या जोरावर जगातील करोडोपती बनले. महाराष्ट्र त्यांना विकला गेला. इथे भू माफिया, वाळू माफिया, होर्डींग माफिया आणि राजकारणातील मफिया अशा टोळ्यांची एकजूट झाली. आणि मराठी माणूस हद्दपार करण्याची स्पर्धा सुरू झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत स. का. पाटील म्हणाले होते, ‘मुंबई कॉस्मोपॉलिटियन आहे…’ त्यावेळी संतापलेल्या आचार्य अत्रे यांच्या ‘मराठा’ चे शिर्षक होते, ‘सदोबा, तुझा बाप कॉस्मोपोलिटियन’ आणि हे फक्त अत्रेसाहेबच लिहू शकत होते. पण, दुर्देवाने अत्रेसाहेबांचे शब्द खोटे ठरले आणि सदोबांचे खरे ठरले. आज मुंबई महापालिकेच्या माजी नगरसेवकांची यादी काढली तर ६० टक्के नगरसेवक बिगर मराठी आहेत. उद्योगात बरकत झालेले ७० टक्के बिगर मराठी. २५- ३० मजली इमारतींत ‘एकाही मराठी माणसाला स्वीकारले जाणार नाही,’ असे जाहिरपणे पाटी लावणारे बिल्डर. आणि झोपडपट्या आणि चाळींत फेकलेला गरिब मराठी माणूस… जी मराठी उपहारगृहे आहेत ती सर्व बंद पडली. मामा तांबे गेले… वीरकर हॉटेल गेले… दत्तात्रय हॉटेल गेले… हिंदमाता चित्रपटगृह गेले… भारतमाता चित्रपटगृह गेले… मराठी शाळा बंद पडत चालल्या… आणि राज्यकर्त्यांचा धटींगपणा वाढत असताना त्यांना जाब विचारणारा कोणी संपादक शिल्लक राहिलेला नाही… कोणी नेता शिल्लक राहिलेला नाही… किंवा रस्त्यावर उतरून लढा लढणारा एकही नेता शिल्लक राहिलेला नाही. हुतात्मा स्मारक उभे राहिले… आम्ही मराठी माणसं खूश झालो…. कारण त्यात हाती मशाल घेतलेला आहे तो शेतकरी आणि कामगार…. पण, तोच कामगार आणि तोच शेतकरी अतिशय पद्धशीरपणे गेल्या १५-२० वर्षांत ठरवून गाडला गेला आहे. ‘दीडशे कोटी रुपये कर्ज फेडू शकले नाही म्हणून नितीन देसाई यांनी आत्महत्या केली. आणि ८-८ हजार कोटी बुडवणारा मल्ल्या आणि त्याहीपेक्षा अिधक रक्कम बुडवणारा निरव मोदी मिजाशीत वावरू शकतो. पैसेवाल्यांची वाढलेली मिजास… ‘त्या पैशांच्या जोरावर आम्ही काही करू शकतो’ असा वाढलेला धटींगणपणा…. हा महाराष्ट्र असा नव्हता… त्यावेळचे नेेते तसे नव्हते. आणि काही चुकीचे झाले तर त्या विरोधात आवाज उठवणारे आचार्य अत्रे होते. अत्रेसाहेबांची जयंती-पुण्यतिथी साजरी होते आहे… अत्रेसाहेब आज आहेत, असेही वाटते आहे. पण, ते वाटणे एक भास आहे. त्यांची जागा घेणारा कोणी नाही…त्यांच्याएवढा कुणाचाही धाक राहिलेला नाही. अशा स्थितीत आचार्य अत्रे यांची जयंती साजरी करायची ती आत्मसमाधानासाठी साजरी करायची. ‘अत्रेसाहेब आज हवे होते’ असं म्हणायचे, आणि मनाची तडफड करून घ्यायची या पलिकडे मराठी माणसाच्या हातात काही राहिलेय, असे वाटत नाही… आणि त्यामुळेच अत्रेसाहेबांची आपण फसवणूक तर करत नाही ना? अत्रेसाहेब स्वर्गातून कदाचित विचारत असतील… ‘माझी जयंती साजरी करता… माझ्या नावाचे पुरस्कार देता… पण, महाराष्ट्रातील शेतकरी तुडवला जातोय, आत्महत्या करतोय… कामगार हैराण आहे… महागाईने सामान्य माणूस होरपळला आहे… छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक समुद्रात होणार होते, त्याचे काय झालं? म्हणून कोणी विचारणारा आहे की नाही? शिवाजी महाराजांच्या नावावर राज्य करता… त्यांच्या जयजयकार करता… छत्रपती शिवाजी महाराज, शाहु-फुले-आंबेडकर यांचा वारसा असल्याचे सांगता… आणि सत्तेसाठी कोणाला शरण जाता?’ एक नाही तर असे असंख्य प्रश्न अत्रेसाहेब स्वर्गातून विचारत असतील… पण त्या प्रश्नांची उत्तरे कोणाजवळ आहेत? आणि कोण देणार आहे…? अत्रेसाहेब, तुमची ताकद कोणामध्ये आहे? तुमच्या जयंतीदिनी तुम्हाला अभिवादन करताना त्यामुळे मनाला शरमही वाटते आहे… जाहिरातबाजी करून चाललेले सरकार…. १० वर्षांपूर्वी १५ लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात चढवण्याची घोषणा झाली होती. आता लाडक्या बहीणीला १५ लाखांवरून १५०० रुपयांवर आणले गेले. ‘लाडकी बहीण’- ‘लाडका भाऊ’…. पण, प्रत्यक्षात लाडके कोणी नाही…. फक्त लाडकी सत्ता… त्या सत्तेसाठी आज महाराष्ट्र पैशाने नासवण्याचे काम ज्या पद्धतीने चालले आहे, त्यासाठी आवाज उठवायला मला स्वर्गातून उडी मारायला लागेल, असे अत्रेसाहेब ओरडून सांगत असतील…. तुम्ही कोणीच… कसे काय आवाज उठवत नाही….?’ असेही विचारत असतील.
अत्रेसाहेबांचे असे अनेक प्रश्न कामात घुमत आहेत… महाराष्ट्र सरकारवर असलेले एकूण कर्ज ७ लाख कोटी रुपये आहे. आज महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर ६२ हजार रुपयांचे कर्ज आहे… त्यामुळे ‘योजना’ आणि ‘घोषणा’ कागदावरच… मतदानाच्या महिन्यापर्यंत. नंतर कोणी लाडके नाही… आज चालायला रस्ते नाहीत… वाहतुक कोंडीने माणसं हैराण आहेत… खडड्यांमध्ये लाेंकांचा जीव चाललाय… नाशिकला जायला १० तास लागतात… उपनगरांतुन मुंबईला पोहोचायला ३ तास लागतात.. मुंबई-पुणे हाताच्या बाहेर गेले. आता प्रत्येक पावसाळ्यात मुंबई-पुणे पुरात डुबणार… अनेक बेकायदा बांधकामांनी धुमाकुळ घातलाय… एक अहिंसक-अराजक झाल्यासारखी परिस्थिती आहे. पण बोलणार कोण? रोज वाहतुक कोंडीचे फोटो छापले जात आहेत. आणि बाजूलाच मुख्यमंत्र्यांचे आदेश प्रसिद्ध होत आहेत. … तेसुद्धा वाहतुककोंडीत अडकूनच वाचावे लागताहेत.. सामान्य माणसांचा वाली कोणीही नाही, अशी एक विचित्र परिस्थिती झालेली आहे.
एक विषय मनात आला…. अत्रेसाहेबांचे ते निखाऱ्यासारखे अग्रलेख आज डोळ्यांसमोर येतात…. १९५६ साली १०५ (१०६ वा हुतात्मा हा लाथा बुक्यांनी तुडवून मारला गेला… – अनंत गोलतकर) लढाऊ माणसांच्या रक्ताचा सडा रस्त्यांवर पडला तेव्हा ज्यांच्या लेखणीतून शब्द आला…. ‘नरराक्षस मोरारजी…’ त्यासाठी अत्रेसाहेबांनी १० महिने तुरुंगवास भोगला… १ मे १९६० ला महाराष्ट्र राज्य झाले. अत्रेसाहेब १९६९ ला गेले… अवघ्या ८ वर्षांनी आमच्या संयुक्त महाराष्ट्र समितीच्याच नेत्यांनी जो ‘जनता पक्ष’ स्थापन केला होता, त्या पक्षाच्या नेत्यांनी मोरारजी देसाईंना पंतप्रधान केले. अत्रेसाहेब असते तर त्यांनी ठामपणे ‘मोरारजी पंतप्रधानपदी चालणार नाहीत….’ ही भूमिका निश्चित घेतली असती…. आणि बाबू जगजीवनराम यांच्या नावाचा पुरस्कार केला असता… महाराष्ट्रातील नेत्यांनी तरी मोरारजी यांच्या पंतप्रधानपदाच्या नावाला त्यावेळी विरोध करायला हवा होता. अगदी जयप्रकाश नारायण यांनाही ठणकावून सांगायला अत्रेसाहेबांनी कमी केले नसते. संयुक्त महाराष्ट्राला विरोध करणाऱ्या आचार्य विनोबांना, महाराष्ट्र निष्ठेमुळे झोडपून काढायला अत्रेसाहेबांनी मागे-पुढे पाहिले नव्हते. संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर ताबडतोब विनोबांची माफी मागायला ते गेले…. ‘माझ्या महाराष्ट्रनिष्ठा बावनकशी आहेत… बाबा, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती,’ हे सांगायला ही ते कचरले नाहीत. पण विनोबाही तेवढ्याच मोठ्या मनाचे… ते एकच वाक्य बोलले…. ‘जो मनातून प्रेम करतो… त्यालाच रागवण्याचा अधिकार आहे…’ तेव्हा अत्रेसाहेबांच्या डोळ्यांतून पाणी आले. अत्रेसाहेबांचा सत्ताधाऱ्यांना असलेला विरोध हा व्यक्तिद्वेषातून नव्हता… महाराष्ट्राच्या भल्यासाठी होता. त्यामुळेच जर आणखी दहा वर्षे अत्रेसाहेब जगले असते तर मोरारजी पंतप्रधान होवू नयेत, म्हणून त्यांनी आकाश-पाताळ एक केले असते. आणि आज अत्रेसाहेब असते तर महाराष्ट्रच्या राजकारणाची ही लक्तरे त्यांनी होऊच दिली नसती. पण, आता असे तडफदार नेते, संपादक होणार नाहीत. त्यावेळचे थोर नेते यशवंतरावही आता नाहीत आिण ते अत्रेसाहेबही नाहीत.
यशवंतराव चव्हाण हे मुख्यमंत्री असेपर्यंत जिथे प्रखर विरोध करायचा तिथे विरोध करायला अत्रेसाहेब कचरले नाहीत. म्हणूनच महाराष्ट्र राज्य िनर्माण होताना त्याचे नाव ‘मुंबई राज्य’ असे ठरले होते. त्या नावाला तडाखून विरोध करून साहेब मराठाच्या अग्रलेखातून गरजले होते की, ‘यशवंतराव, आमचे नाव महाराष्ट्रच….’ आणि त्यामुळेच या राज्याला ‘मुंबई राज्य’ या नावाऐवजी ‘महाराष्ट्र राज्य’ हे नाव मिळाले. विरोध महाराष्ट्राच्या हितासाठी होता. आिण ज्या दिवशी पंडितजींनी संरक्षण मंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांना दिल्लीला बोलावले त्या दिवशी विधानसभेत अिभनंदनाचा ठराव मांडताना अत्रेसाहेब सांगून गेले, ‘यशवंतराव, तुम्हाला अनेकवेळा मी विरोध केला असेल… पण, देशाच्या पंतप्रधानाला देशातील १७ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा चेहरा दिसला नाही… माझ्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचाच चेहरा ‘संरक्षण मंत्री’ म्हणून त्यांच्यासमोर आला…. हा तुमचा आणि महाराष्ट्राचा गौरव आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्वर्गातून तुमच्यावर पुष्पवृष्टी करतील…. तुमचे नाव यशवंत आहे… तुम्ही संरक्षण मंत्री म्हणून जा… तुम्हीच शत्रूला पाणी पाजाल… तेव्हा महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचल्याशिवाय राहणार नाही..’
आज असे सगळ्या बाजूंनी अत्रेसाहेब आठवत आहेत. ते आहेतही आणि नाहीतही अशा विचित्र भूमिकेत असलेल्या महाराष्ट्राला आज नेता राहिलेला नाही. आणि अत्रेसाहेबांची जयंती साजरी करताना तीच तर खंत आहे…. पुढच्या काही दिवसांत महाराष्ट्राचे लचके आणखी तोडले जातील… आणि सत्तेसाठी शरणागती पत्करणाऱ्यांची संख्याही वाढलेली असेल! ‘पक्षबदल’ म्हणजे तर ‘शर्ट बदल’ एवढ्या थिल्लरपणाने महाराष्ट्रात राजकारण सुरू अाहे. तो महाराष्ट्र पहायच्या आगोदरच अत्रेसाहेबांना भेटायला वर जाता आले तर किती बरे होईल…! आता झाली ८५ वर्षे….. आणखीन किती जगायचे? आणि लिहिण्याची आणि लढण्याची ताकतही संपली… निराशा म्हणून नव्हे तर, महाराष्ट्राचे राजकारण नासले त्याची खंत आहे. म्हणून अत्रेसाहेब हवे होते, असे वाटते ते त्याकरिताच….!

            सध्या एवढेच