अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची उचलबांगडी; उपायुक्त स्मिता झगडे झाल्या अतिरिक्त आयुक्त

0
666

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची उचलबांगडी झाली असून त्यांच्या जागी महापालिकेच्याच उपायुक्त स्मिता झगडे यांची अतिरिक्त आयुक्तपदी वर्णी लागली आहे. तसेच सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर, प्रशांत जोशी यांचीही बदली झाली आहे. याबाबतचे आदेश राज्याच्या नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी आज (मंगळवारी) काढले आहेत.

भारतीय रेल्वे सुरक्षा सेवेतील (IRPFS) विकास ढाकणे यांची 15 फेब्रुवारी अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांचे अतिशय विश्वासू अशी ढाकणे यांची ओळख होती. राज्यात सत्तांतर होताच 16 ऑगस्ट 2022 रोजी राजेश पाटील यांची तडकाफडकी बदली झाली. पाटील यांच्या बदलीनंतर एका महिन्याच्या आतमध्येच अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांचीही बदली झाली आहे.

ढाकणे यांची महापालिका अतिरिक्त आयुक्तपदावरील प्रतिनियुक्ती संपुष्टात आणली आहे. त्यांच्या सेवा त्यांच्या मूळ प्रशासकीय विभागाकडे प्रत्यार्पित केल्या आहेत. त्यांच्याजागी महापालिकेच्या उपायुक्त स्मिता झगडे यांची प्रशासकीय कारणास्तव अतिरिक्त आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. स्मिता झगडे या महापालिकेत सहाय्यक आयुक्त, उपायुक्त होत्या. आता त्यांची अतिरिक्त आयुक्तपदी वर्णी लागली आहे.

तर, प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांची पुण्यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) येथे प्रादेशिक अधिकारीपदी बदली झाली आहे. भूमी आणि जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी यांची ठाण्यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ येथे प्रादेशिक अधिकारीपदी बदली झाली आहे.