अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदाचा मार्ग सापडला

0
266

सासवड (जि. पुणे), दि. ७ (पीसीबी) : ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे कणखर नेते अजित पवार चार वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले. पण, त्यांना मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली नाही. ते काही महिन्यांपूर्वी विधानसभेतील विरोधी पक्षनेते झाल्यावर मी त्यांचे अभिनंदन केले. कारण, मुख्यमंत्रिपदाचा मार्ग हा विरोधी पक्षनेतेपदातून जातो, अशी कित्येक उदाहरणे आहेत. त्यामुळे आता हा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग अजितदादांना सापडला आहे’, असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विजय कोलते यांनी केले.

पुरंदर तालुक्यातील सासवड येथील आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानच्या सभागृहात पुरंदर पब्लिसिटीतर्फे विजय कोलते यांनी संपादित केलेल्या ‘कार्यक्षम नेतृत्व महाराष्ट्राचे : अजितदादा पवार’ या कॉफीटेबल बुकचे २०० संस्था-संघटनांना मोफत वितरण करण्यात आले, तसेच सासवड साहित्य परिषदेच्या शाखेच्या वतीने विजय कोलते यांचा वाढदिवसानिमित्त गौरव करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते.

माजी आमदार अशोक टेकवडे म्हणाले की, विजय कोलते हे कोणाशीही दुश्मनी करीत नाहीत. त्यामुळे स्वतःच्या पक्ष व नेत्यावर श्रद्धा असताना त्यांना शुभेच्छा द्यायला इतरपक्षीय सारे हजर आहेत, हा त्यांचा सर्वसमावेशकतेचा गुणच आहे.

या वेळी माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे, पंचायत समितीचे माजी सभापती अतुल म्हस्के, राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे तालुकाध्यक्ष पुष्कराज जाधव, काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्षा सुनीता कोलते, शिवसेना (उद्धव ठाकरे) तालुकाध्यक्ष अभिजित जगताप, बाळासाहेबांची शिवसेनेचे शहराध्यक्ष डॉ. राजेश दळवी, भाजपचे शहराध्यक्ष साकेत जगताप, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बाळासाहेब भिंताडे, बाजार समितीचे माजी सभापती नंदकुमार जगताप, संजय चव्हाण उपस्थित होते.