उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (३ जून) दिवसभर पिंपरी चिचवड शहराचा जो काही दौरा केला तो आगामी निवडणुकीत काय परिस्थिती असेल याची एक झलक होती. भल्या सकाळी ६.५५ पासून दुपारी ४.४५ पर्यंत विविध २० प्रकल्पांचे भूमीपूजन व उद्घाटने, राष्ट्रवादीचा अभूतपूर्व गर्दीचा मेळावा आणि प्रदीर्घ अशी पत्रकार परिषद. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अजित पवार यांचा जोश काही औरच होता. तब्बल पावणे दोन तासाच्या भाषणातून त्यांनी जे काही चित्र रेखाटले ते पाहिल्यावर आता भाजपाची धडगत नाही, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. मुळात अजित पवार यांची देहबोली व भाषणे पहिल्यापेक्षा खूपच जोशपूर्ण आणि दमदार होती. मार्च मध्ये भाजपा सत्तेतून पायउतार होताच प्रशासनाची बैठक घेऊन विकास कामांच्या निविदांपासून रखडलेल्या सगळ्या कामांची कसा आढावा घेतला, आगामी काळात काय काय करणार याची जंत्रीच अजितदादांनी वाचून दाखवली. राष्ट्रवादीचे १०० नगरसेवक निवडूण द्या म्हणजे मी हे सगळे करुन दाखवतो आणि भाजपामुळे गेल्या पाच वर्षांत जो काही बॅकलॉग निर्माण झाला तो भरून काढतो, हे दादांचे आश्वासन खूप महत्वाचे वाटले. शहरासाठी पाच वर्षांत भाजपाने कोणता नविन प्रकल्प आणला ते दाखवा, या अजित पवार यांच्या प्रश्नावर भाजपाकडेही उत्तर नाही. भाजपावाले गेल्या पाच वर्षांत शहराचा साधा पाणी प्रश्न सोडवू शकले नाहीत, पण राष्ट्रवादीची सत्ता आली तर आज जे काही दिवसाआड पाणी आहे ते रोज देणार, अशी ग्वाही दादांनी दिली. ते तिथेच थांबले नाहीत तर, चिखलीच्या जलशुध्दीकरण प्रकल्पाची पाहणी करताना १०० एमएलडी चा प्रकल्प २०० एमएलडी क्षमतेने वाढविण्याचे आदेशसुध्दा दिले. महापालिकेचे मेडिकल कॉलेज काढणार, महापालिकेची सर्व रुग्णालये २४ तास खुली ठेवणार, थेरगावला कॅन्सर रुग्णालय उभे कऱणार, मगर स्टेडियमचा विस्तार, अप्पूघरचे नूतनीकरण अशी विकास कामांची मोठी यादी दादांना तोंडपाठ होती. दीड तासांच्या भाषणात ते विकास कामांबद्दलच सव्वातास बोलले आणि अवघे १५ मिनीटे राजकारणावर आल्हाददायक भाष्य केले. लोकांच्या प्रश्नांवर ते भरभरून बोलले तेच सर्वांना आवडले. विशेष म्हणजे त्यांचे भाषण दोन हजारावर उपस्थितांना एकलेच पण पीसीबी टुडेवर ते लाईव्ह एकणारेसुध्दा हजारो लोक होते. याचाच दुसरा अर्थ आता लोकांच्या नजरा फडणवीस आणि भाजपाकडे नाहीत तर अजित पवार आणि राष्ट्रवादीकडे लागून राहिल्यात. भाजपा काळात कुत्र्यांच्या नसबंदीत तब्बल साडेसहा कोटींची लूट कशी झाली याचे एकच उदाहरण देताना भाजपा किती भ्रष्ट होती ते अजित पवार यांनी अगदी रेटून ठासून सांगितले. म्हणजे आगामी निवडणुकित राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा प्रचारासाठी मुख्य मुद्दा कऱणार हेसुध्दा स्पष्ट झाले. राज्याच्या राजकारणात हनुमान चालिसा किंवा हनुमानचा जन्म कुठे झाला यावर महंतांचे एकमेकांवर धावून जाणे निष्फळ आहे. अशा चर्चा किंवा वादात पडायचे नाही, धार्मिक, जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांपासून सावध राहा, असे कार्यकर्त्यांना सांगताना दादांनी भाजपाचा पंचनामा केला, खिल्लीही उडवली. लोकांनाही आज रोजच्या जगण्याचा प्रश्न, महागाई, बेरोजगारीचा मुद्दा महत्वाचा वाटत असताना नको त्या विषयावर वेळ, पैसा वाया घालविण्यात रस नाही. अजित पवार यांचा ती भूमिका, तो विचार खूप भावला. मी शहरात लक्ष देत नाही, नाराज आहे वगैरे बातम्यांचे खंडन करताना, आज सकाळी ६.५५ ला आलो आता पुढच्यावेळी ५.५५ लाच येणार, आगामी काळात माझे दौरे वाढणार हे सांगून राष्ट्रवादीच्या झोपी गेलेल्यांना त्यांनी चार्ज केले. दादांच्या फेऱ्या वाढणार म्हटल्यावर भाजपाची धडधड वाढली आहे. भाजपाच्या दोन आमदारांपैकी एक लक्ष्मण जगताप हे प्रकृतीमुळे बाहेर पडू शकत नाहीत आणि दुसरे आमदार महेश लांडगे हे भाजपाचे शहराध्यक्ष असून ते भोसरी सोडून कुठे फिरकत नाहीत. फडणवीस, चंद्रकांत पाटील कधी शहरात पायधूळ झाडून जातात. त्यामुळे भाजपाचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. मुळात आताच्या भाजपामध्ये ७७ पैकी ६५ नगरसेवक हे पूर्वीचे राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेतून आलेले आहेत. ते केव्हाही पाठ दाखवतील याची भिती भाजपाला आहे. आता तर खुद्द अजित पवार यांनी स्वतः जातीने लक्ष घातल्याने त्यांना तोंड देणारा दुसरा नेता शहरात नाही. आमदार महेश लांडगे यांची संपूर्ण कुंडलीच अजितदादांकडे असल्याने तेसुध्दा राष्ट्रवादी विरोधत तोंड उघडणार नाहीत. इकडे आड तिकडे विहीर अशी भाजपामधील मंडळींची अवस्था आहे.
शहराबद्दल प्रेम, आपुलकी फडणवीसांना आहे का –
उपमुख्यमंत्री अजित पवार हे १९९२ पासून शहर पाहतात. मुळात त्यांची बारामती लोकसभेची खासदारकी आणि नंतरच्या काळातील मंत्रीपदाचा शहराला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मोठा लाभ झाला. स्मार्ट सिटीत पुणे होते, पण पिंपरी चिंचवचा समावेश नव्हता, त्यावेळी अजित पवार यांनी त्यांचे काका शरद पवार यांच्या कानावर हा प्रकार घातला. दुसऱ्या आठवड्यात तो समावेश करणे भाग पाडले. पीएमआरडीए कार्यालय पिंपरी चिंचवड शहरातच हवे, पुणे शहरात नव्हे असा अजित पवार यांचा रोखठोक विचार आहे, कारण या शहराबद्दलचे प्रेम.
उद्योगनगरी पिंपरी चिंचवड शहराबद्दल आस्था, आपुलकी, प्रेम, जिव्हाळा महाराष्ट्रातील कोणत्या नेत्याला आहे, या प्रश्नाच्या उत्तरात आज एकमेव नाव समोर येते, ते म्हणजे अजित पवार. या शहराचे रोपटे ज्यांनी लावले त्या अण्णासाहेब मगर यांच्यानंतर या रोपट्याला खतपाणी दिवंगत प्रा. रामकृष्ण मोरे सर आणि शरद पवार यांनी घातले. गेली २० वर्षे शहर आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत नेण्याचे श्रेय निश्चितच अजितदादांना जाते. बारामती खालोखाल त्यांनी या शहराची देखभाल केली. पाणी, रस्ते, पूल, उड्डाणपूल, मेट्रो, शाळा, मैदाने, उद्याने यात कुठे काय हवे नको ते पाहिले. शरद पवार यांच्यानंतर गल्लीबोळातील कार्यकर्त्यांशी थेटसंपर्क करणारे, चुटकीसरशी कामे करणारे अजित दादा हे एकमेव आहेत. पाच वर्षे भाजपाची सत्ता होती, पण महापालिकेची सत्ता हातात देऊनसुध्दा देवेंद्र फडणवीस कितीवेळा शहरात आले, ते शोधावे लागेल. भाजपा सत्तेत असताना शहराचे अवैध बांधकामे, शास्ती, पाणी, नदी असे अत्यंत महत्वाचे किती प्रश्न मार्गी लागले ते भिंगाचा चष्मा लावून पहावे लागेल. भाजपाने नमामी इंद्रायणी चा नारा दिला आणि मोठा शो केला, इंदायणी थडीतून बाजार भरवला. प्रत्यक्षात ३००-४०० कोटींचे फक्त आकडे पुढे आले, पण जागेवर काहीच नाही. अजित पवार यांनी त्याबाबत सवाल उपस्थित केलाय, आता भाजपाचे काय उत्तर येते ते पहायचे. बैलगाडा स्पर्धेत जेसीबी, बोलेरो, ट्रॅक्टर बक्षिसांचीही थट्टा उडवताना हे लबाडाघरचे आवतान, जेवल्याशिवाय खरे नाही, असे दादा म्हणाले. अजितदादांच्या कोणत्याही टीकेला उत्तर देण्याची जराशीही हिंमत महेश लांडगे यांच्यात नाही. सत्तेतून सत्ता हे समिकरण होते म्हणून केंद्र, राज्याच्या सत्तेतून भाजपाने २०१७ मध्ये महापालिकेत सत्ता मिळविली. आता राज्यात महाआघाडीची सत्ता आहे, भाजपाची नाही. त्यामुळे तोच फॉर्मुला वापरून राष्ट्रवादीसुध्दा सत्तेतून सत्ता घेऊ शकते. पक्ष सोडून जे ५०-६० नगरसेवक भाजपामध्ये गेले त्यांना स्वगृही घेण्याचे काम टप्प्याने सुरू आहे. निवडूण येण्याची क्षमता हा निकष पाहूनच उमेदवारी देणार असे अजित पवार म्हणतात. तशी क्षमता असणाऱ्यांची धाव सत्तेत कोण येणार या दिशेने असते. आता ते पारडे भाजपाच्या नव्हे तर राष्ट्रवादीच्या दिशेने झुकते आहे. राजकिय घडामोडी, विविध प्रसंग सगळे काही तेच दर्शवितात. निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोंबर मध्ये होतील, तोपर्यंत भाजपा कशी सावरणार यावर भाजपाचे भवितव्य आहे.