अजितदादा हेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री, चंद्रकांत पाटील यांच्या मतदारसंघातील बॅनर्स

0
324

पुणे, दि. २२ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. त्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. दरम्यान अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत या चर्चांना पूर्णविराम दिला. मात्र, तरीही अजितदादा भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा अजूनही सुरू असतानाच त्यात आणखी एका भर घातली आहे.

अजितदादा हेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे बॅनर्स भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मतदार संघात म्हणजेच पुण्यातील कोथरूड परिसरात झळकले आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. पुण्यातील कोथरूडमध्ये हे बॅनर्स झळकल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अजित पवार यांनी काल ‘सकाळ’ माध्यम समूहाला मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी मुख्यमंत्री व्हायला आवडेल असं म्हटलं होतं. त्यानंतर संध्याकाळी अचानक कोथरूडमध्ये अजितदादांचे बॅनर्स लागले. जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असं या बॅनर्सवर लिहिलेलं आहे.

‘महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू अजित पवार…’ असंही बॅनर्सवर लिहिलं आहे. या बॅनर्सवर अजितदादा पवार यांचा भला मोठा फोटो आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर्स लावले आहेत. दिपाली संतोष डोख यांनी हे बॅनर्स लावले असून त्यावर त्यांचं आणि फोटोही आहेत. कोथरूडमध्ये अचानक अजित पवार यांचे बॅनर्स लागल्याने चर्चांना उधाण आलं आहे.