पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार यांची पुन्हा नियुक्ती झाली. त्यामुळे पुणे जिल्हा नियोजन समितीचे (डीपीडीसी) अध्यक्षपदही त्यांच्याकडेच आले आहे. त्यातून या समितीची फेररचना होणार असून, त्यावरील भाजप व शिवसेनेचे सदस्य कमी होतील, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार) वाढणार आहेत. त्यामुळे तेथे वर्णी लागण्यासाठी या पक्षाच्या पिंपरी-चिंचवड, पुणे शहरासह जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
दरम्यान, डीपीडीसीत फेरबदल करताना त्यातील राज्य सरकारमधील शिंदे शिवसेनेसह भाजपच्या कुठल्या सदस्यांना डच्चू देऊन तेथे आपल्या पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्याला संधी द्यायची हा निर्णय घेताना अजितदादांना मोठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. आगामी महापालिका निवडणूक ध्यानात घेऊन पुणे आणि पिंपरी-चिंचवडला तेथे स्थान देणे त्यांना भाग पडणार आहे. त्यात तुलनेने उद्योगनगरीवर त्यांचे अधिक प्रेम असल्याने तेथील आपल्या समर्थकांना ते संधी देतील असा अंदाज आहे. त्यासाठी त्यांच्या काही समर्थक व इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
अजितदादा सत्तेत सामील होण्यापूर्वी शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात स्थापन झालेल्या आणि चंद्रकांत पाटील अध्यक्ष असलेल्या डीपीडीसीमध्ये उद्योगनगरीतील भाजपचे विजय फुगे, काळूराम नढे हे,तर मावळातून माजी राज्यमंत्री बाळा भेगडे आणि शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे सदस्य आहेत. त्यांना आता डच्चू मिळून त्या जागी राष्ट्रवादीचे येतील, अशी शक्यता आहे. अगोदरच्या या समितीत महाविकास आघाडी सरकारने उद्योगनगरीला ठेंगा दाखवला होता. मात्र, अजितदादा पालकमंत्री झाल्याने आपल्या पक्षाला नव्याने उभारी देण्यासाठी ते या समितीवर आपल्या समर्थकांना संधी देण्याची शक्यता आहे. त्यातून त्यांचे प्रिय शहर असलेल्या उद्योगनगरीला म्हणजे तेथील राष्ट्रवादीला या समितीत स्थान मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.