पिंपरी, दि. १४ (पीसीबी) : पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने रावेत येथे 25 किलो गांजा पकडला. यामध्ये पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. 12) रात्री म्हस्के वस्ती, रावेत येथे करण्यात आली.
कृष्णा मारुती शिंदे (वय 27, रा. शिंदेवस्ती, शितपूर, ता. कर्जत, जि. अहमदनगर), अक्षय बारकू मोरे (वय 29, रा. कान्होबा वस्ती, पाटेगाव, ता. कर्जत, जि. अहमदनगर), हनुमंत भाऊसाहेब कदम (वय 35, रा. कुसडगाव, ता. जामखेड, जि. अहमदनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार सदानंद रुद्राक्षे यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेत परिसरातील म्हस्के वस्ती येथे बीआरटी रोडच्या बाजूला तिघेजण संशयितपणे थांबले असून त्यांच्याकडे गांजा हा अंमली पदार्थ असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन कृष्णा, अक्षय आणि हनुमंत या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 25 लाख 69 हजार 100 रुपये किमतीचा 25 किलो 691 ग्रॅम गांजा, कार (एमएच 14/सीडब्ल्यू 0007), चार मोबाईल फोन आणि 1600 रुपये रोख रक्कम असा एकूण 30 लाख 55 हजार 700 रुपयांचा ऐवज जप्त केला.
आरोपींना अटक करून त्यांच्याकडे चौकशी केली असता आरोपींनी हा गांजा वसंत डुकळे (रा. आंबी, ता. परांडा, जि. धाराशिव) याच्याकडून आणला असल्याचे समोर आले. आरोपींनी आणलेला गांजा ते सौरव निर्मल (रा. रुपीनगर, चिखली) याला विकणार असल्याचे तपासात समोर आल्याने वसंत आणि सौरव यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.