५१ तोळ्यांचं हगवणे कुटुंबाने काय केलं?; नव्या खुलाशाने सगळेच हादरले

0
37

दि . २६ ( पीसीबी )  – पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. वैष्णवीला तिच्या आई-वडिलांनी हुंडा म्हणून दिलेले ५१ तोळे सोनं हगवणे कुटुंबाने फेडरल बँकेत गहाण ठेवल्याची माहिती तपासात समोर आली आहे. यावरून हगवणे कुटुंबाची आर्थिक लालसा किती होती, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

फॉर्च्यूनर कार व ॲक्टिवा गाडी जप्त :

वैष्णवी आणि शशांक यांचा प्रेमविवाह झाला होता. लग्नात वैष्णवीला तिच्या माहेरकडून ५१ तोळे सोने, चांदीची भांडी आणि फॉर्च्यूनरसारखी आलिशान गाडी अशा अनेक गोष्टी हुंडा म्हणून दिल्या होत्या. एवढेच नाही, तर हगवणे कुटुंबीयांना सात किलो चांदीची भांडी देखील लग्नात दिली होती. इतके सर्व काही मिळाल्यानंतरही हगवणे कुटुंबाची लालसा वाढतच गेली. त्यांनी वैष्णवीच्या वडिलांकडे, अनिल कस्पटे यांच्याकडे, दोन कोटी रुपयांची मागणी केली. वडिलांनी पैसे देण्यास नकार दिल्याने हगवणे कुटुंबाने वैष्णवीचा शारीरिक आणि मानसिक छळ वाढवला, असा आरोप आहे. 

आता पोलिसांनी ५१ तोळे सोने नेमक्या कोणत्या कारणासाठी बँकेत गहाण ठेवले, यासाठी वैष्णवीची परवानगी घेतली होती का, तिला सोनं तारण ठेवण्यासाठी तिचा छळ करून सोनं घेतलं का, तसेच सोने तारण ठेवण्यामागे आरोपींचा काय उद्देश होता, याबाबत सखोल तपास करत आहेत. लग्नाच्या वेळी हुंडा म्हणून देण्यात आलेली फॉर्च्यूनर कार व ॲक्टिवा गाडी पोलिसांनी जप्त केली आहे.

एफआयआरमधील माहितीनुसार, राजेंद्र तुकाराम हगवणे यांनी मुलीच्या घरच्यांकडून ५१ तोळे सोने, फॉर्च्यूनर गाडी, चांदीची भांडी घेतली होती. एवढेच नाही, तर सनीज वर्ल्ड या ठिकाणी लग्न करून देण्याच्या बोलीवर त्यांनी मुलीशी लग्न करून दिले. लग्नानंतर साधारण चार-पाच महिन्यांनी सासू लता हगवणे यांनी चांदीची भांडी मागितली. ती दिली नाहीत म्हणून राग मनात धरून सासू लता, नणंद करिश्मा हगवणे, सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांनी सुनेला घालून-पाडून बोलून, तिच्या चारित्र्यावर संशय घेत शारीरिक व मानसिक त्रास देणे सुरू केले, अशी माहिती एफआयआरमध्ये देण्यात आली आहे.

या प्रकरणाबद्दल बोलायचे झाल्यास, सासरच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे (वय २३) हिने १६ मे रोजी राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवलं. याप्रकरणी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांना मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक केली आहे. फरार असलेले सासरे राजेंद्र तुकाराम हगवणे व दीर सुशील राजेंद्र हगवणे यांनाही नुकतीच अटक करण्यात आली आहे. राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चा राज्य कार्यकारिणी सदस्य होता.

वैष्णवीचे वडील आनंद कस्पटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, लग्नानंतर दुसऱ्या दिवसापासूनच शशांक व तिचे सासू-सासरे यांनी घरातील किरकोळ कामाच्या वादातून तिच्याबरोबर भांडण सुरू केले. तिच्या चारित्र्यावरुन बोलणे, शारीरिक व मानसिक त्रास देणे सुरू केले होते. पोस्ट मार्टममध्ये वैष्णवीच्या अंगावर मारहाणीचे व्रण आढळले होते.