होमहवनवरून शेखर सिंह यांच्यावर ‘व्यंग’अमोल थोरात यांच्याकडून आयुक्तांचे ‘कार्टून’ व्हायरल

0
75

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) : सध्या सातत्याने विविध कारणांमुळे चर्चेत राहणारे पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी आयुक्त बंगल्यावर होमहवन केला. विश्व कल्याण, पर्यावरण शुद्धी, तसेच नैसर्गिक संकटांपासून मुक्तीसाठी होमहवन करण्यात आले. यावरून आयुक्त सिंह यांच्यावर व्यंगचित्र (कार्टून) काढून उपरोधिक टीका करण्यात आली आहे. भाजपाचे अमोल थोरात यांनी हे कार्टून व्हायरल केले आहे.

टीडीआर घोटाळा, प्रायोगिक तत्त्वावरील फसलेले प्रकल्प, दूरदृष्टी न ठेवता उदासीन राहून निर्णय घेणे, तसेच वाकड येथील निर्माणाधीन इमारत पाडावी लागल्याने महापालिकेवर ओढावलेली नामुष्की यासह विविध कारणांमुळे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यावर सातत्याने आरोप तसेच टीका करण्यात आली. भाजपाचे अमोल थोरात यांनी त्याच अनुषंगाने एक कार्टून व्हायरल केले आहे. त्यामुळे आयुक्त सिंह पुन्हा चर्चेत आले आहेत.

शेखर सिंह यांनी आयुक्त बंगल्यावर केलेल्या होमहवनसाठी महापालिकेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना निमंत्रित केले होते. त्यामुळे बंगल्याच्या परिसराला जत्रेचे स्वरुप आले होते. तसेच कार्यक्रमस्थळी लावण्यात आलेल्या फलकावर होमहवनाचा हेतू स्पष्ट करण्यात आला होता. त्यासाठी फलकावर एक सुविचार देखील नमूद केला होता. त्याच सुविचाराचा उपहासात्मक वापर या कार्टूनमध्ये करण्यात आला आहे. फलकावरील ‘तेरे साथ तेरा द्रव्य नही, तेरा कर्म जाएगा’, हा सुविचार तसेच ‘टीडीआर घोटाळा’ असे नमूद करून कार्टूनमधून सिंह यांच्यावर व्यंग करण्यात आले आहे. यातून त्यांच्या कार्यशैली सुधारण्यासह त्यांना सुविचाराप्रमाणे सद्बुद्धी देऊन योग्य निर्णय घेण्याची उपरती होऊ दे, अशी खोचक टीका देखील अमोल थोरात यांनी केली आहे.