ही लोकशाही आहे, दडपशाही नाही. चर्चा ही झालीच पाहिजे – सुप्रिया सुळेंचा अजितदादांना टोला

0
87

पुणे, दि. १८ (पीसीबी) – मला काम करायला आवडते. त्यामुळे पहाटे पाचला उठून कामाला लागतो. कामांची पाहणी करतो. काम करत असल्यानेच माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होतात. जे काम करत नाहीत, त्यांच्यावर आरोप होण्याचा प्रश्नच येत नाही. सेल्फी काढून, भाषणे ठोकून मतदारसंघातील कामे होत नाहीत, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे खासदार सुप्रिया सुळेंना लगावला होता. याला आता सुप्रिया सुळेंनी उत्तर दिलं आहे. त्या पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होत्या.

“आम्हाला बोलण्यासाठीच संसदेत निवडून पाठवतात. ही लोकशाही आहे, दडपशाही नाही. चर्चा ही झालीच पाहिजे,” असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.

अजित पवार वैयक्तिक पातळीवर टीका करत आहेत का? असा प्रश्न विचारल्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आता तो त्यांचा विषय आहे. पण, केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं एक अध्यादेश काढला होता की प्रत्येक कॉलेजमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो लावा आणि सगळ्यांनी त्याबरोबर सेल्फी काढा. पंतप्रधानांनी स्मृती इराणींना एक कोटी महिलांबरोबर सेल्फी काढा, असं सांगितलं होतं. “

“आम्ही नाहीतर पंतप्रधान मोदी सेल्फीचं प्रमोशन करत आहेत. पंतप्रधानपदाचा नेहमी गौरव केला पाहिजे,” अशी खोचक टिप्पणी सुप्रिया सुळेंनी केली आहे.

“संसद ही आमच्यासाठी फक्त इमारत नाही, तो एक विचार आहे. देशाचं सगळ्यात मोठं मंदिर आहे. पंतप्रधान निवडून आल्यानंतर संसदेत नतमस्तक झाले होते. संसदेतील चर्चेला आम्ही लोकशाहीचं मंदिर म्हणून पाहतो. आम्हाला जनता निवडून कशाला देते? तर संसदेत जाऊन भाषण करण्यासाठी. यालाच लोकशाही म्हणतात,” असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं.

“ज्या वास्तुत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाचं संविधान लिहिलं आणि देशाला अर्पण केलं. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्याच वास्तुतून देशाला संबोधित केलं, याचा मला सार्थ अभिमान आहे. नितीन गडकरी मोठ्या रस्त्यांची घोषणा संसदेतच करतात. त्यामुळे जो काही निधी मिळतो किंवा विकासकामे होतात, त्याची सुरूवात संसदेतून लोकशाही पद्धतीनं चर्चेतून पुढं येते. मग, संसदेत भाषण करायला हवं ना?,” असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला.

“मागच्या आठवड्यात एक आदर्श भाषण अर्थमंत्रालयानं व्हाईट पेपरवर केलं. त्यानंतर काही प्रवेश झाले. त्यामुळे संसदेत केवढी मोठी ताकद आहे. प्रवेश घेण्यास, आरोप आणि विकास करण्यास संसद उपयोगी पडते. आम्हाला बोलण्यासाठीच संसदेत निवडून पाठवतात. ही लोकशाही आहे दडपशाही नाही. चर्चा ही झालीच पाहिजे,” असं उत्तर सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना दिलं आहे.