ही तर आमच्याच योजनांची कॉपी; महायुतीच्या योजनांवर टीका करणाऱ्या विरोधकांना दादांनी सुनावलं, दिवसभरात तीन सभांचा धडाका

0
38

दि. १० (पीसीबी)राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राज्यात तीन जाहीर सभांना संबोधित केले. शिरूर विधानसभा मतदारसंघात त्यांनी पक्षाचे उमेदवार ज्ञानेश्वर कटके यांच्या समर्थनार्थ रॅली काढली, इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात निशिकांत पाटील हे पक्षाचे उमेदवार असून फलटणमधून सचिन सुधाकर पाटील हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत.

शिरूरमध्ये सभेला संबोधित करताना त्यांनी महायुती सरकारमध्ये चांगला समन्वय असल्याचा दावा केला. विरोधकांवर निशाणा साधत ते म्हणाले की त्यांनी लोकसभेत खोटे विधान केले आणि त्याचा आम्हाला फटका बसला.
लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांना मोफत वीज, युवा प्रशिक्षण कार्यक्रम, मोफत 3 गॅस सिलिंडर आणि दुधावर 7 रुपये अनुदान यांसारख्या योजनांच्या माध्यमातून सरकारने समाजातील सर्व घटकांना मदत केली आहे. विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले, “विरोधकांनी आमच्या योजनांवर टीका केली आणि आता आमच्या सर्व योजना त्यांच्या जाहीरनाम्यात दिसतात. या योजनांसाठी पैसे कुठून आणणार, असा प्रश्न ते विचारत होते, आता महाविकास आघाडीला पैसे कुठून मिळणार, याचे उत्तर त्यांनी द्यावे. महाविकास आघाडी जनतेची दिशाभूल करत आहे, ते सत्तेत येणार नाहीत, त्यामुळे वाट्टेल त्या घोषणा करून लोकांची मते मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.

कांद्यावरील निर्यातबंदीमुळे पूर्वीच्या कांद्याला चांगला भाव मिळत नव्हता, असेही ते म्हणाले. याचा परिणाम लोकसभेवर झाला. मी केंद्राला विनंती केली आणि आज कांद्याला चांगला भाव मिळत आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही उसाला चांगला भाव मिळत आहे.
इस्लामपूरमध्ये त्यांनी विद्यमान आमदार जयंत पाटील यांच्यावर मतदारसंघातील प्रश्नांवरून हल्लाबोल केला. ते म्हणाले, “जयंत पाटील गेल्या 35 वर्षांपासून इस्लामपूर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. त्यासोबतच ते राज्याचे अर्थमंत्रीही राहिले आहेत. मात्र इस्लामपूर शहरात योग्य बसस्थानक नाही. या शहरात अद्याप रोजगारासाठी एमआयडीसी नाही. जयंत पाटील यांनी साखर कारखान्याच्या शेतकऱ्यांचे पेमेंट दिले नसून ते मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

फलटण येथे बोलताना अजित पवार म्हणाले, “आमचे विरोधक लाडकी बहीण योजनेच्या विरोधात न्यायालयात गेले, पण न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळून लावली. राज्य कर्जबाजारी होईल, असा आरोप विरोधकांनी केला, या योजनेचे पैसे येणार नसल्याचाही आरोप केला. परंतु आम्ही राज्यातील २.५ कोटी महिलांना या योजनेचा लाभ दिला आहे.”

विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.