हिंदु मुली लुटीचा माल नव्हे, पाकिस्तान संसदेत खासदारानेच सुनावले

0
115

पाकिस्तानमध्ये धार्मिक अल्पसंख्याकांवर अत्याचार होत असल्याचा मुद्दा अनेकदा उपस्थित झालेला आहे. संयुक्त राष्ट्रानेही मागील महिन्यात अल्पसंख्याक समाजातील महिला आणि मुलींचे रक्षण करण्यात पाकिस्तान सरकार कमी पडत असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता पाकिस्तानच्या संसदेत एका हिंदू खासदाराने पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. पाकिस्तानच्या काही प्रांतामध्ये स्थानिक गुंड आणि समाजकंटकाकडून हिंदू मुलींचे अपहरण करून त्यांचे धर्मांतर होत असल्याचा मुद्दा खासदार दानेश कुमार पलायानी यांनी उपस्थित केला. तसेच पाकिस्तानचे संविधान आणि कुराण कुणाचाही धर्म बदलण्याचे अधिकार देत नाही.

खासदार दानेश कुमार पलायानी पुढे म्हणाले, “सिंद प्रांतात हिंदू मुलींचे बळजबरीने धर्मांतर केले जात आहे. हिंदूंच्या मुली या लुटीचा माल नाहीत की, कुणीही त्यांचे धर्मांतर करेल. दोन वर्षांपूर्वी प्रिया कुमारी नावाच्या मुलीचे अपहरण करण्यात आले. दोन वर्षांपासून सरकारने आरोपींविरोधात कोणतीही कारवाई केलेली नाही. काही गुंड आणि दरोडेखोर आपल्या देशाचे (पाकिस्तान) नाव धुळीस मिळवत आहेत. पाकिस्तानचे संविधान आणि कुराणदेखील कुणाचेही बळजबरीने धर्मांतर करण्याची परवानगी देत नाही.”