हिंदु नववर्षांच्या निमित्ताने पुणे येथे मंदिर स्वच्छता, सामूहिक गुढीपूजन व सुराज्य शपथग्रहणाचे आयोजन !

0
117

चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात् हिंदु नववर्षाच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यात ५० हून अधिक ठिकाणी सामूहिक गुढीपूजन करण्यात आले, अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे पुणे जिल्ह्याचे श्री. पराग गोखले यांनी दिली. या वेळी सर्वांनी एकत्र येऊन ‘सुराज्य स्थापन’ करण्याची सामूहिक शपथ घेतली.

या वेळी भीमाशंकर, लेण्याद्री देवस्थान तसेच ओझर देवस्थान आदींचे विश्वस्त, धर्मप्रेमी संबंधित गुढी पूजनाच्या ठिकाणी उपस्थित होते.

या वेळी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे पुणे जिल्ह्याचे श्री. पराग गोखले म्हणाले की, हिंदु धर्मात साडेतीन मुहूर्तांवर शुभ कृत्ये करण्याचा संकल्प केला जातो. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. अयोध्येत नुकतेच श्री रामलल्ला विराजमान झाल्यानंतर देशाला आध्यात्मिक अधिष्ठान प्राप्त झाले आहे. आता देशाला आवश्यकता आहे ती रामराज्याची अर्थात् ‘स्वराज्याकडून सुराज्या’कडे जाण्याची ! प्रभु श्रीरामाने सकल जनांचे कल्याण करणारे आदर्श रामराज्य स्थापन केले. तसेच आदर्श राज्य स्थापन होण्यासाठी सर्वांनी स्वतःच्या जीवनात आणि सामाजिक जीवनात रामराज्य आणण्यासाठी सलग काही वर्षे प्रयत्न करावे लागतील. व्यक्तीगत जीवनात स्वतः साधना करून नैतिक आणि सदाचारी जीवन जगण्याचा संकल्प करावा लागेल. सामाजिक जीवनात भ्रष्टाचार, अनैतिकता आणि अराजकता यांना विरोध करण्यासाठी प्रयत्नशील व्हावे लागेल. सात्त्विक समाजाच्या पुढाकारातूनच अध्यात्मावर आधारित राष्ट्ररचना, म्हणजेच रामराज्य शक्य आहे; म्हणूनच या गुढीपाडव्यापासून व्यक्तीगत आणि सामाजिक जीवनात रामराज्य आणण्याचा संकल्प करा !’