सोसायटी समोर भांडण करणाऱ्यांना हटकल्याने सुरक्षा रक्षकास मारहाण

0
320

वाकड, दि. ४ (पीसीबी) – सोसायटी समोर भांडण करणाऱ्या दोघांना सुरक्षा रक्षकाने हटकले. इथे भांडण करू नका, पुढे जा, असे सुरक्षा रक्षकाने म्हटले. त्यावरून भांडण करणाऱ्या दोघांनी सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण केली. तसेच सुरक्षा रक्षकाच्या केबिनवर दगडफेक करून नुकसान केले. याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शनिवारी (दि. 3) रात्री तीन वाजता द आईसलँड सोसायटी समोर, वाकड येथे घडली.

धनराज जयराम यादव (वय 23, रा. वाकड. मूळ रा. उत्तर प्रदेश) असे जखमी सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार निखील भाऊसाहेब भोंडवे (वय 19, रा. अण्णाभाऊ साठेनगर, वाकड) आणि एका अल्पवयीन मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. शनिवारी पहाटे रात्रपाळी ड्युटीवर असताना दोघेजण त्यांच्या सोसायटीच्या गेट समोर भांडण करू लागले. त्यामुळे फिर्यादी यांनी भांडण करणाऱ्या दोघांना इथे भांडण करू नका पलीकडे जा, असे सांगितले. त्यावरून भांडण करणाऱ्या दोघांनी फिर्यादीस शिवीगाळ केली. सुरक्षा रक्षकाच्या केबिनवर दगडफेक केली. निखील भोंडवे याने फिर्यादीच्या दिशेने सिमेंटचा गट्टू फेकून मारला. अल्पवयीन मुलाने देखील फिर्यादीला दगडाने मारून त्यांना जखमी केले.

पोलिसांनी निखील भोंडवे याला अटक केली आहे. तर अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याच्या पालकांच्या ताब्यात दिले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.