सोन्याच्या मण्यांची माळ घेणे पडले महागात

0
238
  • अनोळखी लोकांनी खोटे दागिने देत केली एक लाखांची फसवणूक

पिवळ्या रंगाच्या मण्यांची माळ ही सोन्याची आहे असे भासवून चौघांनी एका व्यक्तीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर व्यक्तीला भोसरी मधील उड्डाणपुलाखाली बोलावून एक लाख रुपये घेत सोन्याची म्हणून खोली माळ देऊन फसवणूक केली. हा प्रकार 14 मे ते 21 मे या कालावधीत रावेत आणि भोसरी येथे घडला.

बाबासाहेब सीताराम पौळ (वय 42, रा. किवळे) यांनी याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजू (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आणि इतर तीन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किवळे येथे बाबसाहेब यांचे रसवंतीगृह आहे. तिथे दोन अनोळखी लोकांनी बाबासाहेब यांच्याशी ओळख केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी देखील येऊन पुन्हा गप्पा मारल्या. दरम्यान राजू नाव सांगणाऱ्या व्यक्तीने बाबासाहेब यांना पिवळ्या रंगाची मण्याची माळ दाखवून ती सोन्याचे असल्याचे सांगितले. ती माळ त्याला मातीत सापडली असून ती विकायची असल्याचे त्याने सांगितले. बाबासाहेब यांनी ती माळ खरेदी करण्यास रस दाखवला. मात्र आपल्याकडे केवळ एक लाख रुपये असल्याचे बाबासाहेब यांनी सांगितले. माळ देण्यासाठी आरोपींनी भोसरी येथील उड्डाणपुलाखाली बोलावले. तिथे बाबासाहेब यांना सोन्याच्या मण्यांची म्हणून खोटी माळ देऊन आरोपींनी पोबारा केला. त्यानंतर बाबासाहेब यांना संशय आल्याने त्यांनी सोनाराकडे जाऊन खातरजमा केली असता ती माळ खोटी असल्याचे स्पष्ट झाले. बाबासाहेब यांनी आरोपींना फोन करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसात धाव घेतली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.