सोनिगरा ज्वेलर्स दुकानावरील दरोड्याचा डाव पोलिसांनी उधळला; तिघांना अटक

0
137

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) चिंचवड,
चिंचवड मधील सोनिगरा ज्वेलर्स या दुकानावर दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा डाव चिंचवड पोलिसांनी उधळून लावला. पाच जणांचे टोळके चिंचवड रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या मोकळ्या मैदानात दरोड्याचे साहित्य घेऊन थांबले असताना चिंचवड पोलिसांनी कारवाई करत तिघांना अटक केली. ही कारवाई रविवारी (दि. 7) दुपारी पावणे चार वाजताच्या सुमारास करण्यात आली.

सुनील मारुती लोणी (वय 22, रा. बिजली नगर, चिंचवड), समील मोहम्मद बागवान (वय 24, रा. चिंचवडे नगर, चिंचवड), काशिनाथ कल्याण उकली (वय 24, रा. महात्मा फुले नगर, एमआयडीसी भोसरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह जोयबा बागवान (रा. दगडोबा चौक, चिंचवड), मयूर सुरवळे (रा. महात्मा फुले नगर, एमआयडीसी भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिंचवड रेल्वे स्थानकाच्या शेजारी असलेल्या मोकळ्या मैदानात एक टोळके संशयितपणे थांबले असून ते कुठल्यातरी दुकानावर दरोडा घालणार आहेत, अशी माहिती चिंचवड पोलिसांना मिळाली. त्यानुसार चिंचवड पोलिसांनी सापळा लावून तिघांना ताब्यात घेतले. दरम्यान त्यांचे दोन साथीदार पळून गेले.

आरोपींकडे दोन तलवार, एक चोपर, एक कटावणी, मिरची पावडरची पुडी, नायलॉन रस्सी, पाच कापडी मास्क असा 1500 रुपये किमतीचा ऐवज आढळून आला. अटक केलेल्या आरोपींकडे चौकशी केली असता हे आरोपी चापेकर चौकातील सोनिगरा ज्वेलर्स या सराफ दुकानावर दरोडा घालणार असल्याचे समोर आले. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.