सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्रा पवार, बारामती रंगतदार होणार

167


बारामती, दि. १६ (पीसीबी) : बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीमधून खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या धर्मपत्नी सुनेत्रा पवार या रिंगणात उतरणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. आता पवार कुटुंबातच घमासान लढाईचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या गेली तीन टर्म या मतदारसंघातून खासदार आहेत. राष्ट्रवादीत फाटाफूट झाल्यानंतर आता २०२४ मध्येसुध्दा पुन्हा मीच रिंगणात उतरणार असल्याचेही सुळे यांनी यापूर्वीच सांगितले. अशा परिस्थितीत अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून कोण उमेदवार हा प्रश्न होता. भाजप, अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्या महायुतीत लोकसभा जागावाटप जवळपास निश्चित झाले आहे. आजवर शिवसेना भाजप युती असताना हा लोकसभा मतदारसंघ भाजपकडे होता. आता तिथे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा यांनी उमेदवारी करावी, असा आग्रह भाजपमधूनच आहे. मुख्यमंत्री शिंदे हेसुध्दा त्यासाठी होकार देतात. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना तोंड देणारा तगडा उमेदवार आजवर भाजपला इथे कधीच मिळला नाही. यापूर्वी पवार आणि काकडे अशी दोन खांदानातील लढत अनेकदा अनुभवली होती. शिवसेना-भाजप युतीच्या काळात भाजपने जेष्ठ नेत्या आणि फर्ड्या वक्त्या म्हणून डॉ. प्रतिभा लोखंडे यांना दोन वेळा येथून रिंगणात उतरवले होते. स्वतः संभाजीराव काकडे, २० वर्षे मंत्री राहिलेले माजी मंत्री शंकरराव बाजीराव पाटील, जेष्ठ विधीज्ञ विराज काकडे, भाजपच्या आमदार कांता नलावडे, दौंडचे रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल तसेच धनगर समाजाचे मोठे मतदान असल्याने राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख म्हणून महादेव जानकर, आताचे आमदार गोपीचंद पडळकर असे उमेदवार देऊन वारंवार नवनवीन प्रयोग केले. शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांचा पराभव करणे भाजपला शक्य झालेले नाही. यावेळी काही झाले तरी बारामती लोकसभा मतदारसंघात पवार यांना धडा शिकवायचाच असा चंग भाजपने बांधला आहे. इंदिरा गांधी पराभूत होऊ शकतात तिथे शरद पवार काय चीज अशी दर्पोक्ती भाजपचे नेते करत आहेत. बारामतीला अनेकदा भगदाड पाडले, फंदफितुरी, गद्दारीचे प्रयोग करून भाजप थकला, पण पवारांचा पाडाव शक्य झाला नाही. आता शेवटचा घाव म्हणून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या मागे सर्व ताकद उभी करायची आणि बारामती जिंकून रेकॉर्ड करायचेच असा भाजपचा डाव आहे. सुप्रिया सुळे यांचे कमी होत गेलेले मताधिक्य हा भाजपसाठी सर्वात मोठा आशेचा किरण आहे. त्यासाठी आता देशाच्या अर्थमंत्री निर्माला सितारामन, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाचे दौरे केले आणि शिडात हवा भरली. आता हे काम फत्ते करायचेच तर काट्याने काटा काढायचे तंत्र अवलंबिण्याचे भाजपमधून ठरले.
गेल्या पंधरा दिवसांपूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडणुकीत शरद पवार यांच्यापेक्षा अजितदादांचे वर्चस्व दिसून आले. सुप्रिया सुळे यांच्यापेक्षा अजितदादांचे प्रस्थ अधिक पसंतीला उतरते आहे, हे भाजपच्या लक्षात आले. त्याशिवाय अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना गेल्यावेळी मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देऊन त्यांचा पराभव करण्यास कुटुंबातूनच हातभार लागल्याचा संशय खुद्द सुनेत्रा पवार यांना आहे. पार्थ यांना बारामतीत लोकसभेची उमेदवारी देऊन ते उट्ट भरून काढायचे अशाही हालचाली सुरू होत्या. प्रत्यक्षात पार्थ चालणार नाही हे लक्षात आल्यावर आता रोहित पवार यांच्या पराभवासाठी पार्थला कर्जत मध्ये लक्ष घालायला सांगितले आणि सुनेत्रा पवार यांना बारामतीतून तयारीचे आदेश आलेत. पवार कुटुंबातील सत्तासंघर्षात कायम रोहित पवार यांनाच साहेबांनी प्रोत्साहन दिल्याची सल सुनेत्रा पवार यांच्या मनात आहेच. स्वतः सुप्रियाताई सुळे आणि सुनेत्रा पवार या नणंद भावजयांचेही विशेष सख्य नसल्याचे वेळोवेळी दिसून आले. सुनेत्रा पवार यांचे भाऊ पद्दमसिंह पाटील हे दोन वेळा खासदार तसेच सलग २० वर्षे राज्यमंत्रीमंडळात होते. त्यामुळे भरभक्कम राजकीय पार्श्वभूमि पाठिशी असल्याने सुनेत्रा पवार यांच्या नावावर महायुतीतून शिक्कामोर्तब झाल्याची खबर आहे. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रे पवार या नणंद भावजयींची लढत झालीच तर महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकारणातील ती लक्षवेधी लढत असेल.