सीएमओ मधून बोलत असल्याचे सांगून एका तोतयाने नामांकित शिक्षण संस्थांमध्ये दिले प्रवेश

0
449

चिंचवड, दि.२७ (पीसीबी)-मुख्यमंत्री कार्यालयातून बोलत असल्याचे सांगत एका तोतयाने शहरातील नामांकित शिक्षण संस्थांमध्ये चार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून दिला. यात त्याने विद्यार्थ्यांकडून भल्यामोठ्या रकमा घेतल्या. हा प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी त्या तोतया अधिकाऱ्याला अटक केली आहे.

राहुल राजेंद्र पलांडे (वय 31, रा. केशवनगर, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्यावर फसवणूक, सरकारी अधिकारी असल्याचे भासवणे, माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्तीस असणाऱ्या एका लिपिकाने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

राहुल पालांडे हा कोणत्याही शासकीय पदावर कर्तव्यास नाही. तो शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी नाही. तरीही त्याने सिम्बायोसिस एसआयबीएम पुणे, लवळे, हिंजवडी आणि बेंगलोर येथील संस्थांमध्ये सीएमओ कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून चार विद्यार्थ्यांचे प्रवेश केले.

शैक्षणिक संस्थांना फोनवरील व्यक्ती खरोखर सीएमओ मधून बोलत असल्याचे समजावे यासाठी त्याने तो वापरत असलेल्या मोबाईलच्या ट्रु कॉलरच्या प्रोफाईलला तसेच व्हाटसअपच्या डीपीला बोधचिन्ह ठेवले. त्याखाली सीएमओ ऑफिस, महाराष्ट्र शासन, मुंबई मंत्रालय असा मजकूर ठेवला. व्हाटसअपच्या स्लोगनमध्ये सीएमओ पीआरओ ऑफिस एकनाथ भाई शिंदे मुंबई मंत्रालय महाराष्ट्र शासन असा मजकूर ठेवला. त्याखाली मुंबई मंत्रालयाचे लोकेशन आणि बनवत मेलआयडी देखील ठेवले. एकंदरीत त्याने मुख्यमंत्री कार्यालयातून बोलत असल्याचे भासवून शिक्षण संस्थांमधील पदाधिकाऱ्यांवर दबाव आणून विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन प्रवेश मिळवून दिला.

असा उघडकीस आला प्रकार

दोन दिवसांपूर्वी शहरात एका विवाह सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच अन्य अनेक मंत्री, शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि बड्या शिक्षण संस्थांचे संस्थापक, संस्था चालक उपस्थित होते. या विवाह सोहळ्यात मुख्यमंत्री कार्यालयातील बडे अधिकारी आणि कॉलेज व्यवस्थापनाचे विश्वस्त समोरासमोर आले. तेंव्हा सुरुवातीला पलांडे याने केलेल्या फोन वरील विनंती वरून विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याचे समोर आले.

मात्र, मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडून कोणत्याही अधिकाऱ्याने कधीही कोणत्याही कॉलेज व्यवस्थापनाला फोन केला नसल्याचे उघड झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मंत्रालयातील सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी कोणाला शिफारस पत्र दिले का याची खातरजमा करण्यात आली. त्यानंतर कोणीच असे पत्र कोणाला दिले नसल्याचे उघड झाल्याने पलांडे याने बनावट पत्र तयार करून, लोकांकडून पैसे घेऊ हा प्रकार केल्याचे उघड झाले.

आरोपीला पोलीस कोठडी

या प्रकरणाची पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गांभीर्याने दखल घेतली. गुन्हे शाखा युनिट चारला तत्काळ कठोर कारवाई करण्याच आदेश देण्यात आले. गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण करून आरोपीला अटक केली. न्यायालयाने पलांडे याची 29 मे तारखेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे म्हणाल्या, “हा प्रकार गंभीर असल्याने पोलीस आयुक्तांनी याप्रकरणी कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून गुन्हे शाखा युनिट चार पुढील तपास करीत आहेत.”