“साहित्य हे चिरंतन समाधान देते!” – डॉ. दीपक शहा

0
196

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – “पैशामुळे जीवन श्रीमंत होते; पण या श्रीमंतीमध्ये समाधान असेलच असे नाही. मात्र साहित्यामुळे जीवन समृद्ध होते आणि साहित्य हे चिरंतन समाधान देते!” असे विचार प्रतिभा शैक्षणिक संकुलाचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांनी प्रतिभा महाविद्यालय सभागृह, मुंबई – पुणे हमरस्ता, काळभोरनगर, चिंचवड येथे शनिवार, दिनांक २४ फेब्रुवारी २०२४ रोजी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषद – पिंपरी चिंचवड शाखा, महाराष्ट्र साहित्य व संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि प्रतिभा शैक्षणिक संकुल – चिंचवड यांच्या सहकार्याने शैक्षणिक विचारवेध साहित्य संमेलनात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. दीपक शहा बोलत होते. नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासगार हे उदघाटक म्हणून तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य प्रा. रवींद्र बेडकिहाळ, प्रा. प्रदीप पाटील, दिनेश औटी, विलास सिंदगीकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषद – पिंपरी चिंचवड चे अध्यक्ष राजन लाखे, कार्याध्यक्ष विनीता ऐनापुरे उपस्थित होते.

डॉ. दीपक शहा पुढे म्हणाले की, “नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी शिक्षक हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. साहित्य, संस्कृती आणि शिक्षण यांचे मिश्रण करून समाजाला नवीन काय देता येईल याचा शोध घेणारे हे संमेलन आहे, ही स्तुत्य बाब आहे!” डॉ. पंडित विद्यासागर म्हणाले की, “मराठी माणूस मराठीविषयी कृतिशील नाही. खडू, फळा आणि वर्ग याच्या पलीकडे जाऊन नवीन शैक्षणिक धोरण राबवायचे असल्याने ते खूप आव्हानात्मक आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षणापासून बदल होणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्याचा शिकण्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग या बाबीवर नवीन शैक्षणिक धोरणात भर दिला आहे. अर्थात त्यासाठी विद्यार्थी, शिक्षक, पालक, व्यवस्थापन आणि शासन या सर्व घटकांची मानसिकता बदलली पाहिजे. गुणवत्ता अन् आर्थिकदृष्ट्या परवडणारे शिक्षण देणे ही काळाची गरज आहे!” रवींद्र बेडकिहाळ यांनी, “शिक्षण, कला, क्रीडा आणि संस्कृती या क्षेत्रांत महाराष्ट्र देशात अग्रेसर होता; परंतु यशवंतराव चव्हाण यांचे वैचारिक बोट आताच्या राजकीय नेत्यांनी सोडून दिले आहे. शिक्षक, साहित्यिक आणि पत्रकार यांच्यात जागृती निर्माण झाल्यास पूर्वीचा वैभवशाली महाराष्ट्र उभा राहू शकतो!” असे विचार मांडले. विलास सिंदगीकर यांनी, “विद्यार्थ्यांवर संस्कार करणारे साहित्य निर्माण झाले पाहिजे!” अशी अपेक्षा व्यक्त केली; तर प्रदीप पाटील यांनी, “शिक्षणातून संवेदनशील माणूस घडला पाहिजे!” असे मत व्यक्त केले.

उद्घाटन सत्रानंतर पुणे येथील मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य संजय खरात आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण टास्क फोर्स सदस्य प्राचार्य डॉ. देविदास गोल्हार यांनी डॉ. पंडित विद्यासागर यांच्या अध्यक्षतेखाली ‘नवीन शैक्षणिक धोरण : अनुकूलता व आव्हाने’ या परिसंवादात सहभाग घेतला. प्रतिभा महाविद्यालयाचे सी.ए.ओ. डॉ. राजेंद्र कांकरिया यांनी परिसंवादात समन्वय साधला.

दीपप्रज्वलन, सरस्वतीपूजन आणि रिचा राजन यांनी सादर केलेल्या “तुज मागतो मी आता…” या भक्तिगीताने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. राजन लाखे यांनी प्रास्ताविकातून, “शिक्षक आणि प्राध्यापक यांच्यासाठी उपयुक्त असलेले तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता या महत्त्वाच्या दोन विषयांना केंद्रस्थानी ठेवून शैक्षणिक विचारवेध साहित्य संमेलन २०२४चे आयोजन करण्यात आले आहे!” अशी माहिती दिली. डॉ. रजनी शेठ, किरण लाखे, किशोर पाटील, दत्तू ठोकळे, श्रीकांत जोशी, जयश्री श्रीखंडे, प्राची कुलकर्णी, किरण जोशी, नागेश गव्हाड, अमिता देशपांडे आणि उज्ज्वला जगताप यांनी संयोजनात सहकार्य केले. संजय जगताप यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.