“साहित्यिकांनी समाजाला आरसा दाखवला पाहिजे!” – डॉ. अमोल कोल्हे

92

अग्रलेखसंग्रह प्रदर्शनाला मान्यवरांसह रसिकांची पसंती

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – “‘सत्ता आणि सत्ताधारी यांनी आचरणात आणण्याचे पथ्य’ हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्यावर लिहिला गेलेला अग्रलेख हा आजच्या राजकारण्यांसाठी एक आरसा आहे. साहित्यिकांनी समाजाला आरसा दाखवला पाहिजे!” असे परखड भाष्य खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नुकत्याच संपन्न झालेल्या दुसऱ्या इंद्रायणी साहित्य संमेलनात केले. ज्येष्ठ साहित्यिक अरुण बोऱ्हाडे यांनी संकलित केलेल्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्याविषयीचे वृत्तपत्रीय लेख आणि अग्रलेखांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. संमेलनाध्यक्ष सोपान खुडे, स्वागताध्यक्ष गणेश सस्ते, इंद्रायणी साहित्य परिषदेचे अध्यक्ष संदीप तापकीर यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याप्रसंगी बोलताना अमोल कोल्हे पुढे म्हणाले की, “आज खरे बोलण्यापेक्षा बरे बोलावे लागते ही राजकारणाची शोकांतिका आहे.‌ सर्वसामान्यांशी निगडित असलेल्या प्रश्नांपेक्षा राजकीय कलगीतुरा आणि मसालेदार विषयांना जास्त प्रसिद्धी लाभते. त्यामुळे साहित्यिकांची जबाबदारी अधिकच वाढली आहे!”

इंद्रायणी साहित्य परिषद आयोजित दुसऱ्या दोन दिवसीय इंद्रायणी साहित्य संमेलनात मान्यवरांपासून सर्वसामान्य रसिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या ‘स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्याविषयीचे वृत्तपत्रीय लेख आणि अग्रलेखांचे प्रदर्शन’ याविषयी ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी नगरसेवक अरुण बोऱ्हाडे म्हणाले की, “बालपणापासून वृत्तपत्रांच्या माध्यमातून लोकनेते यशवंतराव चव्हाणसाहेब यांच्याविषयी वाचन करीत असतानाच त्यांच्या सुसंस्कृत, दूरदर्शी व्यक्तिमत्त्वाने मनाला खूप प्रभावित केले होते. त्या काळातच रामभाऊ जोशी लिखित ‘यशवंतराव चव्हाण : इतिहासाचे एक पान’ हे पुस्तक प्रकाशित झाले. मोशीसारख्या त्या काळातील ग्रामीण भागात हे पुस्तक उपलब्ध झाले नाही म्हणून मी धाडस करून चव्हाणसाहेबांना चक्क साधे पोस्टकार्ड पाठवून पुस्तक वाचण्याची इच्छा कळवली होती. साहेबांच्या मनाचा मोठेपणा इतका की, त्यांनी माझ्यासारख्या सामान्य विद्यार्थ्याच्या पत्राची दखल घेऊन ते पुस्तक मला पाठवले. अर्थातच माझ्यासाठी तो अतिशय आनंदाचा अन् संस्मरणीय अनुभव होता. पुढे चव्हाण साहेबांच्या प्रत्यक्ष भेटीचा योग आला. त्यांच्या खानदानी, शालीन अन् उमद्या आचरणापासून प्रेरणा घेऊन समाजकारणात कार्यकर्ता म्हणून मी काम करू लागलो.

“दिनांक २५ नोव्हेंबर २०२३ रोजी यशवंतराव चव्हाण यांचे दु:खद निधन झाले. संपूर्ण महाराष्ट्र दु:खात बुडाला; पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या वैयक्तिक जीवनात त्यामुळे मोठी पोकळी निर्माण झाली. २६ नोव्हेंबरपासून महाराष्ट्रातील ‘लोकसत्ता’ , ‘महाराष्ट्र टाइम्स’ , ‘सकाळ’ , ‘पुढारी’ , ‘ऐक्य’ यांसह सर्वच अग्रगण्य वृत्तपत्रांनी या घटनेची दखल घेत अग्रलेख प्रकाशित केले. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने सगळ्यात मोठा सहा कॉलमचा अग्रलेख प्रसिद्ध केला होता; तर सांगली, सातारा, कोल्हापूर भागातील ‘ऐक्य’ने सलग तीन दिवस लेखांची मालिका प्रसिद्ध केली होती. मी सर्व वृत्तपत्रांमधील कात्रणे संकलित केली. त्यानंतर साहेबांची जयंती आणि पुण्यतिथीचे औचित्य साधून वृत्तपत्रांमध्ये जे लेख प्रसिद्ध होत गेले, त्याची कात्रणे संकलित करण्याचा छंद लागला. सुमारे दोनशे दहा कात्रणे संकलित झाल्यानंतर त्याचे जाहीर प्रदर्शन भरविले. त्याला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यामुळे आजपर्यंत दहा वेगवेगळ्या ठिकाणी हे प्रदर्शन भरविण्याची संधी मला मिळाली.

“‘महाराष्ट्राचा सह्याद्री’ असा ज्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला जातो त्या यशवंतराव चव्हाणसाहेब यांनी राज्याच्या विकासाचा आराखडा मांडताना मराठी भाषा, साहित्य आणि कलेचाही विचार केला आणि तो राबविला. त्यांनी पक्षीय राजकारणाचा अभिनिवेश बाजूला ठेवून नेहमी बेरजेचे राजकारण केले आणि नेहमी सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवला. आजच्या काळात राजकारण आणि समाजकारण खूपच आव्हानात्मक झाले आहे. अशा परिस्थितीत सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना या प्रदर्शनाच्या माध्यमातून चव्हाणसाहेबांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख तर होतेच, शिवाय त्यातून दीपस्तंभासारखे मार्गदर्शनही लाभते!” अशी भावना अरुण बोऱ्हाडे यांनी व्यक्त केली