सावधान ! रोबोट्स आले रे !

0
23
—-लेखन सारंग अविनाश कामतेकर (९३७१०२४२४७)—-
 
दि . २२ ( पीसीबी ) – रोबोट्स आणि ऑटोमेशन क्षेत्रात झपाट्याने होणाऱ्या प्रगतीमुळे जागतिक स्तरावर कामगार क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीपासून ते सर्व्हिस इंडस्ट्रीपर्यंतच्या सर्व क्षेत्रांतील जी कामे कधीकाळी केवळ मनुष्य करत होता, ती कामे आता रोबोट्स करू लागले आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या या क्रांतीमुळे कार्यक्षमता वाढली आहे आणि उत्पादन खर्चाचे प्रमाण देखील कमी होत आहे. परंतु भारतासारख्या मोठ्या मनुष्यबळ असलेल्या देशात या क्रांतीमुळे बेरोजगारी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्पन्नातील विषमता आणि रोजगाराच्या संधींबाबत जनसामान्यांच्या मनात आता अनेक प्रश्न उभे राहिले आहेत.
इंटरनॅशनल फेडेरेशन ऑफ रोबोटिक्स यांनी नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, सन २०२३ पर्यंत जगभरात अंदाजे ४२ लाख ८१ हजार ५८५ औद्योगिक रोबोट वापरात होते. तसेच २०२३ मध्ये नव्याने तैनात केलेल्या सर्व रोबोट्सपैकी ७० टक्के रोबोट आशिया खंडात, १७ टक्के युरोपमध्ये आणि १० टक्के अमेरिकेत स्थापित केले गेले. तसेच, रोबोट्सच्या संख्येत दरवर्षी लक्षणीय वाढ होत आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अंदाजानुसार, ऑटोमेशनमुळे सन २०२५ पर्यंत अंदाजे तब्बल ८.५ कोटी नोकऱ्या कमी होऊ शकतात.
रोबोटच्या वापरामध्ये जागतिक स्तरावर दक्षिण कोरिया या देशाने आघाडी घेतली आहे. दक्षिण कोरिया हा जगातील पहिला देश ठरला आहे, ज्या ठिकाणी औद्योगिक कामगारांपैकी १० टक्क्यांहून अधिक जागा रोबोट्सनी घेतल्या आहेत. वर्ल्ड रोबोटिक्स २०२४ नुसार, दक्षिण कोरियात आता दर १०,००० कर्मचाऱ्यांमागे १,१०२ रोबोट्स आहेत. दक्षिण कोरियामध्ये कारखान्यांसोबतच आरोग्यसेवा, हॉटेल्स, शेती, लॉजिस्टिक्स आणि सुरक्षा अशा अनेक क्षेत्रांमध्ये आता रोबोट्सचा वापर सुरू झाला आहे.
एकेकाळी स्वस्त कामगारांवर अवलंबून असलेल्या चीनने जागतिक स्तरावरील स्पर्धेत टिकून राहण्यासाठी ऑटोमेशनमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. चीनमध्ये ॲपलची उत्पादने बनवणाऱ्या फॉक्सकॉनसारख्या कंपन्यांनी हजारो कामगारांच्या जागी “फॉक्सबॉट्स” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोबोट्सची नियुक्ती केली आहे. चीनमधील काही कारखान्यांमध्ये, ऑटोमेशननंतर कामगारांची संख्या ६०% किंवा त्याहून अधिक कमी झाली आहे. चीनमधील औद्योगिक ह्यूमनॉइड रोबोट, वॉकर एस१ जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी बीवायडीच्या कारखान्यांसह अनेक वाहन उत्पादक कारखान्यांमध्ये वापरले जात आहेत. वॉकर एस१ ची उंची ५.६ फूट (१७२ सेमी) आणि वजन १६७.६ पौंड (७६ किलो) आहे, जे आकाराने माणसांसारखेच आहे. एप्रिल २०२५ मध्ये चीनची राजधानी बीजिंग येथे झालेल्या अर्ध-मॅरेथॉनमध्ये प्रथमच सुमारे २२ ह्यूमनॉइड रोबोट्सनी मानवांविरुद्ध धावण्याच्या स्पर्धेत भाग घेऊन इतिहास रचला.
चीनमध्ये आता “डार्क फॅक्टरी” ही संकल्पना रुजू होत आहे. “डार्क फॅक्टरी” म्हणजे एक उत्पादन स्थळ, जिथे मॅन्युफॅक्चरिंगचे प्रत्येक काम मशिनद्वारे हाताळले जाते, उदाहरणार्थ असेंब्ली, तपासणी, लॉजिस्टिक्स इत्यादी. अशा ठिकाणी एकाही मानवाची उपस्थिती नसते. कामगारांशिवाय कारखाना सुरू असल्याने, त्याठिकाणी लाईट्स, पंखे, हीटर किंवा ब्रेकची आवश्यकता उरत नाही. त्यामुळे ऊर्जेचा खर्च कमी होतो.
जर्मनीमधील फॉक्सवॅगन आणि बीएमडब्ल्यू यांसारख्या वाहन उद्योग कंपन्यांनी त्यांच्या उत्पादन लाइनमध्ये मोठ्या प्रमाणात रोबोट्सचा वापर केला आहे. आता मानवांसोबत रोबोट्स, ज्यांना ‘कोबोट्स’ संबोधले जाते, ते काम करत आहेत. रोबोट्सच्या वापरामुळे उत्पादकता वाढली आहे आणि मानवी चुका कमी होत आहेत. तब्बल २ लाख ६९ हजार ४२७ स्थापित युनिट्ससह, जर्मनी युरोपमध्ये रोबोटिक्सचा सर्वात मोठा वापरकर्ता देश आहे. जर्मनी जगभरात रोबोट्स वापरण्याच्या बाबतीत पाचव्या क्रमांकावर आहे.
जागतिक स्तरावर रोबोटिक्समध्ये अग्रेसर असलेल्या जपानने केवळ उत्पादन क्षेत्रातच नव्हे, तर आरोग्य सेवा क्षेत्रातही रोबोट्सचा वापर प्रभावीपणे केला आहे. वृद्ध लोकसंख्येच्या समस्येचा सामना करत असलेल्या या देशाने “पेप्पर” आणि “पॅरो” सारख्या रोबोट्सना वृद्धाश्रम आणि इतर आरोग्य सेवा सुविधांमध्ये मूलभूत कामे करण्यासाठी तैनात केले आहे. तसेच वृद्धाश्रम व रुग्णालयातील वृद्ध नागरिकांच्या सोबतीसाठी जपानने “किवी” आणि “माँगो” नावाचे दोन रोबोट्स विकसित केले आहेत. “किवी” आणि “माँगो” हे मानवी आवाज आणि चेहरे ओळखू शकतात आणि मिठी मारू शकतात तसेच भावनिक संवाद साधू शकतात. तसेच जपानी कंपनी कावासाकीने हायड्रोजन इंजिनने चालणारा आणि “एआय”ने सुसज्ज असलेला एक नाविन्यपूर्ण रोबोटिक घोडा “कॉर्लिओ” चे अनावरण केले आहे. कॉर्लिओची रचना ‘हेवी ऑफ-रोडिंग’साठी केली आहे, ज्यामध्ये मांजरीसारखी एका खडकावरून दुसऱ्या खडकावर उडी मारण्याची आणि असमान भूभागावर धावण्याची क्षमता आहे.
एप्रिल २०२५ च्या दुसऱ्या आठवड्यात थायलंडच्या रॉयल थाई पोलिसांनी देशातील पहिला एआय-पॉवर्ड “सायबॉर्ग १.०” पोलीस रोबोट नुकताच तैनात केला आहे. या ह्यूमनॉइड रोबोटचे अधिकृत नाव ‘एआय पोलीस कर्नल नखोनपाथोम प्लोड फाई’ असे आहे. मोठ्या स्तरावरील उत्सव-कार्यक्रमांमध्ये सार्वजनिक सुरक्षा वाढवण्यासाठी डिझाइन केलेले हे मानवासारखे दिसणारे ह्यूमनॉइड रोबोट गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि संभाव्य सुरक्षा धोके ओळखण्यासाठी “एआय” आणि “फेस-रेकग्निशन” तंत्रज्ञानाचा वापर करतात. आगामी काळात कारागृह सुरक्षेमध्ये ह्यूमनॉइड रोबोट्सचा वापर थाई सरकारकडून केला जाणार आहे.
अमेरिकेने “एआय” आणि रोबोटिक तंत्रज्ञानात आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. त्यामुळे अमेरिकेतील विविध क्षेत्रांमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. ॲमेझॉनसारख्या कंपनीने रोबोट्सच्या मदतीने वेअरहाउसिंगमध्ये क्रांती घडवून आणली आहे. ॲमेझॉनने त्यांच्या वेअरहाऊसमध्ये ५ लाख २० हजारांहून अधिक रोबोटिक ड्राईव्ह युनिट्स वापरात आणले आहेत. तसेच वॉलमार्टसारख्या बलाढ्य रिटेलिंग साखळ्यांनी स्टॉक चेकिंगसाठी आणि फ्लोअर क्लिनिंगसाठी रोबोट्सची चाचणी केली आहे. याशिवाय, सॅन फ्रान्सिस्कोमध्ये “वेमो” आणि “क्रूझ” सारख्या कंपन्यांनी “सेल्फ-ड्रायव्हिंग कार” ची सेवा कार्यान्वित केली आहे. इतकेच नव्हे, तर शेतीमध्ये स्वयंचलित ट्रॅक्टरदेखील आता अमेरिकेच्या बाजारात उपलब्ध झाले आहेत. तसेच “ॲन्ट रोबोट्स” चा वापर लागवड, कापणी, तण काढणे, कीटक नियंत्रण, पिकांचे आरोग्य आणि मातीची स्थिती यांचे निरीक्षण करणे यांसारख्या विविध कामांसाठी केला जात आहे. त्याचबरोबर हॉस्पिटॅलिटी, बांधकाम क्षेत्र, इन्स्पेक्शन व देखभाल दुरुस्ती, वाहतूक, वैद्यकीय व आरोग्यसेवा, संशोधन, व्यावसायिक स्वच्छता, सुरक्षा व्यवस्था, व्यावसायिक ह्युमनॉइड आणि डिफेन्स अशा अनेक क्षेत्रांमध्ये रोबोट्सचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे.
खाणकामात रोबोटिक्सच्या वापरात ऑस्ट्रेलिया जगात अग्रेसर आहे. तेथे रोबोट्सचा वापर खनिज शोध, ड्रिलिंग, स्वयंचलित वाहतूक आणि रिमोट-कंट्रोल्ड ऑपरेशन्ससाठी केला जातो. खाणकामात अग्रेसर असलेल्या ऑस्ट्रेलियन कंपन्यांनी त्यांच्या लोहखनिज उत्खनन कार्यात रोबोट्सचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू केला आहे.
युक्रेन आता युद्धभूमीवर “रोबोटिक डॉग्स” वापरत आहे. युद्धभूमीवर अशा रोबोट्सची ही पहिलीच ज्ञात लढाऊ तैनाती आहे. हे रोबोट एका ब्रिटिश कंपनीने पुरवले आहेत. युद्धभूमीवर त्यांचा वापर गुप्त माहिती गोळा करणे, लँडमाईन्ससारखे लपलेले स्फोटक शोधणे आणि रशियन सैन्याचा शोध घेणे यासाठी केला गेला. या “रोबोटिक डॉग्स”मुळे सैन्याची क्षमता वाढते आणि सुरक्षितता सुधारते.
बांधकाम क्षेत्रातही आता रोबोट्सचा वापर सुरू झाला आहे. गवंडी आणि मिस्त्री करत असलेली अनेक कामे, जसे की विटा रचणे, प्लास्टर करणे, फरश्या लावणे, ही सर्व कामे आता रोबोटच्या माध्यमातून करता येतात. तसेच, पेंटिंग करणारे रोबोटदेखील आता बाजारात उपलब्ध झाले आहेत.
सिंगापूर, कॅनडा, तैवान, मेक्सिको, ब्राझील, युरोप, युनायटेड किंग्डम, टर्की आणि आखाती देश अशा जगभरातील अनेक ठिकाणी रोबोट्सचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. घटत्या जन्मदरामुळे कमी होत चाललेल्या कामगार संख्येला तोंड देण्यासाठी अनेक प्रगत देश रोबोटिक्समध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. रोबोट बनवणाऱ्या कंपन्यांकडून आता ऑनलाइन पद्धतीने विविध प्रकारच्या रोबोट्सची विक्री सुरू झाली आहे.
भारतामध्ये आता रोबोट्सचा वापर हळूहळू वाढू लागला आहे. भारतात सुमारे ४४ हजार ९५८ औद्योगिक रोबोट कार्यरत आहेत. मात्र, आगामी काळात भारतात रोबोट्सचा होणारा व्यापक वापर आणि त्यासाठी आवश्यक असलेले रोबोट्सचे उत्पादन व त्याच्या विकासात अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. रोबोट बनवण्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तू, उदाहरणार्थ अॅक्च्युएटर, मोटर्स, सेन्सर्स आणि चिप्स यांसारख्या महत्त्वाच्या भागांसाठी भारताला मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून राहावे लागते. यामुळे उत्पादन खर्च वाढतो आणि उत्पादन क्षमतादेखील मर्यादित राहते. रोबोटच्या डिझाइन, डेव्हलपमेंट, ऑपरेशन व देखभाल-दुरुस्तीसाठी आवश्यक असलेले कुशल अभियंते आणि त्यासाठी आवश्यक असलेले यंत्रसामुग्री-तंत्रज्ञान यामध्ये कमतरता आहे. तसेच, पाश्चात्त्य देशांमध्ये भारतातून होणारे “ब्रेन ड्रेन” टिकवून ठेवणे हेदेखील एक मोठे आव्हान आहे. अनेक लघु आणि मध्यम आकाराच्या उद्योगांना तंत्रज्ञानाचे ज्ञान, रोबोटमध्ये केलेली सुरुवातीची गुंतवणूक, त्यांच्या वापरासाठी आवश्यक असलेले विशिष्ट गरजेनुसार केलेले बदल आणि त्यांची देखभाल यासाठी लागणारा खर्च परवडत नाही. त्यात भर म्हणून, रोबोटिक प्रणालींवरील आयात शुल्क जास्त असल्याने या खर्चात आणखी वाढ होते. रोबोट्सच्या वापरामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढण्याची शक्यता आहे. नवीन तंत्रज्ञानासाठी आवश्यक कौशल्ये भारतीय कामगारांकडे नसल्यामुळे त्यांच्या रोजगारक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. तसेच, सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या नवीन तंत्रज्ञानासाठी आवश्यक कौशल्यांचे प्रशिक्षण घेणे खर्चिक व जिकिरीचे ठरू शकते. विशिष्ट उद्योगांचे केंद्रीकरण झाल्यास आणि शिक्षण तसेच प्रशिक्षणासाठी आवश्यक सोयीसुविधांची उपलब्धता विविध राज्यांमध्ये/जिल्ह्यांमध्ये कमी असल्यास, याआधीच असलेली प्रादेशिक असमानता अधिक वाढेल. याचे अनेक राजकीय व सामाजिक दुष्परिणाम होऊ शकतात.
चीनने सप्टेंबर २०२५ पासून प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना “एआय”चे शिक्षण घेणे अनिवार्य केले आहे. तसेच सहा वर्षांच्या विद्यार्थ्यांना चॅटबॉट्स आणि इतर आधुनिक साधने कशी वापरायची हे शिकवले जाणार आहे. भारतातील सध्याच्या पिढीसाठी “रोबोटिक्स” आणि “एआय”चे ज्ञान प्राप्त करणे आता अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. शहरातील आणि ग्रामीण भागातील तरुणांना असे शिक्षण देण्यासाठी शासकीय स्तरावर धोरणात्मक निर्णय घेऊन त्यांची तातडीने अंमलबजावणी करणे आता आवश्यक आहे. तसेच, सामाजिक स्तरावर देखील या नवीन तंत्रज्ञानाचे शिक्षण सर्वांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रभावी उपक्रम राबविणे गरजेचे आहे. २०२५ पर्यंत स्वयंचलीकरणामुळे सुमारे ८ कोटी ५० लाख नोकऱ्या कमी होण्याचा अंदाज वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जरी व्यक्त केला असला तरी, नव्याने ९ कोटी ७० लाख नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील असा अंदाज देखील त्यांनी व्यक्त केला आहे. म्हणजेच, रोबोट्समुळे रोजगारात घट होण्याऐवजी केवळ रोजगाराच्या स्वरूपात बदल होणार आहे. आगामी काळात रोबोट्स आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनणार आहेत. शिक्षण, कौशल्ये आणि सामाजिक दृष्टिकोन यांमध्ये योग्य बदल करून आपण या भविष्यासाठी अधिक सक्षम होऊ शकतो आणि या आगामी बदलांसाठी आपण सर्वांनी सज्ज होण्याची गरज आहे.