सामानाची डिलिव्हरी देता देता तो चोरायचा महागड्या सायकली; डिलिव्हरी बॉयला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

137

चिंचवड, दि. ३१ (पीसीबी)- डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाने सामानाची डिलिव्हरी करताना रेकी करून महागड्या सायकली चोरल्याचे उघडकीस आले आहे. या डिलिव्हरी बॉयला वाकड पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून सहा महागड्यात सायकली जप्त करण्यात आले आहेत.

राहुल रवींद्र पवार (वय 25, रा. काळेवाडी) असे अटक केलेल्या डिलिव्हरी बॉयचे नाव आहे.

पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप दिगंबर तांबे (रा. रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात सायकल चोरीची तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि बातमीदारांमार्फत माहिती काढली. त्यामध्ये पोलिसांना माहिती मिळाली की, सायकल चोरी करणारा एक डिलिव्हरी बॉय असून तो डिलिव्हरी देण्याच्या पाहण्याने सोसायटीमध्ये प्रवेश करतो. डिलिव्हरी देत असताना तो सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या सायकलवर लक्ष ठेवून संधी साधून सायकलची चोरी करतो.

दरम्यान वाकड पोलिसांना माहिती मिळाली की, चोरीची सायकल विक्री करिता एकजण तापकीर मळा चौकाजवळ येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून एका तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने रहाटणी आणि काळेवाडी परिसरातून सहा सायकल चोरी केल्याचे सांगितले. पोलिसांनी आरोपीकडून 85 हजार रुपये किमतीच्या सहा सायकली जप्त केल्या आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहाय्यक आयुक्त श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, पोलीस निरीक्षक रामचंद्र घाडगे, सहाय्यक निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक सचिन चव्हाण, सहाय्यक फौजदार बिभीषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे, पोलीस अंमलदार वंदू गिरे, संतोष बर्गे, स्वप्नील खेतले, दीपक साबळे, अतिश जाधव, प्रमोद कदम, अतिक शेख, विक्रांत चव्हाण, प्रशांत गिलबिले, अजय फल्ले, तात्या शिंदे, स्वप्नील लोखंडे, सौदागर लामतुरे, विनायक घारगे, रमेश खेडकर, कौंतेय खराडे, भास्कर भारती, पोलीस शिपाई पंडित यांनी केली आहे.

ओएलएक्स वरील सामान खरेदी करताना खबरदारी घ्या, अन्यथा…

ओएलएक्स वरून कोणतीही वस्तू खरेदी करताना मूळ बिलाची खात्री करूनच वस्तू खरेदी करावी. अन्यथा ती वस्तू चोरीची निघाल्यास खरेदी करणाऱ्या संबंधित व्यक्ती विरोधात देखील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी दिली आहे. तसेच आपल्या सोसायटीमध्ये बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची माहिती घ्यावी व प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत असे, आवाहन देखील पोलीस उपायुक्त डोळे यांनी केले आहे.