सामंत, सत्तार भुमरे शिंदे गटाकडून, तर विखे, मुनगंटीवार यांचीही नावे मंत्रीमंडळात

60

मुंबई, दि. ८ (पीसीबी) : गेल्या महिनाभरापासून होणार होणार अशी चर्चा असलेल्या मंत्रिमंडळ विस्तारास अखेर मुहूर्त मिळाला असून येत्या दोन दिवसांत तो होणार असल्याचे स्पष्ट झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात यासंदर्भात बैठक झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, शिंदे गटाकडून सहा आमदारांचा मंत्रिमंडळ विस्तारात समावेश असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यातील बहुतांश मागील सरकारमधील मंत्र्यांना पुन्हा संधी मिळणार असल्याचे स्पष्ट आहे.

नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे गटाकडून माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, माजी कृषीमंत्री दादा भुसे, माजी रोहयो मंत्री संदीपान भुमरे, माजी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार, माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा समावेश आहे. दुसरीकडे, आगामी मुंबई महापालिका निवडणूक पाहता मुंबईतील भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांना पहिल्या यादीत स्थान मिळू शकतं. फडणवीस सरकारमध्ये मंत्री राहिलेले आशिष शेलार यांना मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्षपद मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कारण, चंद्रकांत पाटील यांचा मंत्रिमंडळातील समावेश निश्चित समजला जात आहे. सुधीर मुनगंटीवार, निलेश राणे यांचेही नाव भाजपाच्या संभाव्य यादीत निश्चित करण्यात आल्याची चर्चा आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. विरोधी पक्षांकडून शिंदे-फडणवीस यांना याच कारणावरून टीकेचे धनी व्हावे लागत आहे. मंत्र्यांचे अधिकार सचिवांना देण्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केलेल्या टीकेनंतर घूमजाव करण्यात आले. तसेच, राज्याच्या काही भागात होत असलेली अतिवृष्टी पाहता पालकमंत्र्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्याची गरज असताना पालकमंत्रीच नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस यांनी दिल्लीवरून आल्यानंतर आज सकाळी नंदनवन बंगल्यावर एक बैठक घेतली. त्यात मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी त्यांनी दिल्लीतून पक्षश्रेष्ठींकडून परवानागी आणल्याचे सांगितले जात आहे.