सर्वसामान्यांची घरे पाडून रस्ता होणार नाही, तो रद्द करू

0
24
  • आमदार शंकर जगताप यांची वाल्हेकरवाडी येथील स्वामी विवेकानंद सोसायटीतील बैठकित ग्वाही

पिंपरी, दि . २७ ( पीसीबी ) – नवीन विकास आराखड्यात नागरिकांच्या घरावरून टाकलेला २४ मीटरचा रस्ता अगदी अयोग्य आहे. एकही घर बाधित होत असेल तर त्याला माझाही विरोध आहे. सामान्य माणसांची घरे पाडून डिपीमध्ये रस्ता टाकला असेल तर तो रद्द करू. परिसरातील नागरिकांच्या सहमतीनेच कामे होतील, अशी ग्वाही आमदार शंकर जगताप यांनी दिली. दरम्यान, नागरिकांनीसुध्दा यासंदर्भात मुदतीत लेखी हरकती घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
वाल्हेकरवाडी येथील आहेर गार्डन शेजारील स्वामी विवेकानंद सहकार हाऊसिंग सोसायटीतील नागरिकांनी आयोजित केलेल्या बैठकित ते बोलत होते. यावेळी माजी सत्ताधारी नेते नामदेव ढाके, माजी उपमहापौर सचिन चिंचवडे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती श्रीधर वाल्हेकर, भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते शेखर चिंचवडे, मंडल प्रमुख बिभीषण चौधरी, सोसाटीचे परबत मराठे, सुहास देवांग, महेश व्यवहारे, नवनाथ भोसले, रमेश दासरी, साहेबराव गाडे यांच्यासह सोसायटीचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

आपल्या भाषणात आमदार जगताप म्हणाले, मुळात आम्हाला कोणालाही विश्वासात न घेता हा डिपी केला आहे. प्रारुप विकास आराखडा प्रसिध्दी झाल्यानंतर आरक्षणांबद्दल आम्हाला समजले. खरे तर, लोकवस्तीतून रस्ता कदापि होणार नाही, तो शक्यतो रद्द केला जाईल. शहर विकास आराखड्यात अशा प्रकारच्या अनेक चुका आहेत. सगळ्याच ठिकाणी हा प्रकार झाला आहे.

पवना नदिची निळी पूररेषा सर्व ठिकाणी कमी जास्त असल्याचे त्यांनी स्वतः नमूद केले. ते म्हणाले, पूपरेषा पुढे जाण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे. नदीचे खोलीकरण केले तर पुराचे पाणी खाली जाईल आणि पूररेषा आत सरकेल. राज्य सरकार आणि महापालिकेच्या समन्वयातून आमचे प्रयत्न सुरू आहेत.