सरकारकडून गोड बोलून माझा काटा काढण्याचा डाव

0
36
  • जरांगे पाटील यांची तब्येत खालावली

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. आज (11 जून) त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. यामुळे त्यांची तब्येत देखील खालावली असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांनी आज पत्रकार परिषदेत सत्ताधाऱ्यांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. सरकारकडून गोड बोलून माझा काटा काढण्याचा डाव आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. त्यांच्या या आरोपांमुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्यावर देखील निशाणा साधला.

“एका बाजूला मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी बैठका घेवू अशी चर्चा सरकारकडून सुरु आहे. मात्र अशा चर्चा करून सरकारकडून गोड बोलून माझा काटा काढण्याचा डाव आहे, असा अंदाज दिसतो.”,असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.

“सरकारकून माझ्या आंदोलनाची दखल घेतली जात नसून, केवळ मला खेळवणं सुरु आहे. सरकारला जर मराठ्यांची माया असती तर त्यांनी असं चार-चार दिवस खेळवलं नसतं. त्यांचा हा गोड बोलून माझा काटा काढण्याचा अंदाज दिसतोय.”, असंही पुढे जरांगे म्हणाले.

पुढे जरांगे पाटील यांना छगन भुजबळ यांच्याबद्दल सवाल करण्यात आला. आम्ही जरांगे पाटील यांच्यामुळे हरलो नाही, असं भुजबळ म्हणाले होते. याला उत्तर देताना त्यांनी एकेरी उल्लेख करत, ‘तू नको सांगूस आम्हाला’ असं जरांगे म्हणाले.

दरम्यान जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. त्यांनी उपचार घेण्यासही नकार दिला आहे. त्यांची प्रकृती यामुळे अजूनच खालावत चालल्याची माहिती आहे. आता सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.