सत्ता आल्यास राजस्थानच्या मुख्यमंत्री होणार राजकुमारी दिया सिंग

0
280

जयपूर, दि. २५ (पीसीबी) : राजस्थान विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच यामध्ये आता राजकीय वर्तुळात एक नाव चर्चेत आहे. ते नाव म्हणजे राजकुमारी दिया सिंग. एकेकाळचे जयपूरचे महाराज, दिवंगत ब्रिगेडियर भवानी सिंग यांची दिया सिंग या एकुलती एक मुलगी आहेत. त्यांचे वडील भवानी सिंग यांना 1971 च्या युद्धात त्यांच्या शौर्याबद्दल महावीर चक्र पुरस्कार मिळाले होते. आता राजकुमारी दिया या निवडणुकीच्या केंद्रस्थानी आल्या आहेत.
भवानी सिंग यांनी त्यांच्या मुलीचा मुलगा (नातू) पद्मनाभ सिंग यांना दत्तक घेतले, आजोबांच्या मृत्यूनंतर पद्मनाभ सिंग जयपूरचे महाराज झाले. भाजपच्या नेत्या वसुंधराराजे यांच्या सांगण्यावरून दिया कुमारी यांनी 2013 मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. वसुंधराराजे या स्वतः राजस्थानमधील धौलपूरच्या महाराणी आणि ग्वाल्हेर शिंदे राजघराण्याच्या कन्या आहेत.

दिया कुमारी यांनी 2013 मध्ये सवाई माधोपूरमधून राजस्थान विधानसभेची निवडणूक लढवली आणि काँग्रेसचे बलाढ्य उमेदवार डॉ. किरोरी लाल मीना यांचा पराभव केला. शेतकरी आदिवासी मीणा समाजाचे नेते किरोरी लाल मीना हे सध्या भाजपचे राज्यसभा सदस्य आहेत. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांना सध्याच्या विधानसभा निवडणुकीत सवाई माधोपूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास सांगितले आहे. विशेष म्हणजे, आता त्या सवाई माधोपूरमध्ये कुमारी मीना यांच्यासाठी मतं मागत आहेत.

यापूर्वी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत, दिया कुमारी यांना राजसमंद मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, त्यांना त्यांच्या मूळ जयपूर मतदारसंघातून निवडणूक लढवायची होती. राजसमंद हा एक त्यांच्यासाठी कठीण लोकसभा मतदारसंघ आहे, ज्यामध्ये चार जिल्ह्यांतील भूप्रदेशाचा आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. मात्र, मोदी लाटेत राजकुमारी दिया यांनी काँग्रेसच्या देवकीनंदन यांचा 5 लाख 50 हजार एवढ्या मतांनी मोठा पराभव केला.

एका वृत्तवाहिनीशी त्यांच्या मतदारसंघातील परबत सिंग रावत म्हणाले, “दिया सिंग यांनी या भागातील अनेक रस्त्यांची कामे आणि रेल्वे प्रकल्प मंजूर केले आहेत. ती कामे मार्गी लावण्यासाठी त्या केंद्रीय मंत्र्यांना वेळोवेळी भेटून पाठपुरावा करत असतात. त्यामुळे सिंग या केवळ लोकप्रियच झाली नाही, तर त्या काम करणाऱ्या राजकारणी म्हणून त्यांची ओळख आहे. राजस्थानातील त्या सर्वोत्कृष्ट संसद सदस्य असल्याचे असे मानले जाते.

दिया कुमारी यांना राष्ट्रीय राजकारणात यायचे होते. मात्र, पक्षाने त्यांना पुन्हा विधानसभा निवडणुकीत उतरवले आहे. भाजपने त्यांना जयपूरच्या विद्याधर नगर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्यास सांगितले आहे. भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते भैरोसिंग शेखावत यांचे जावई नरपत सिंग राजवी यांनी या जागेचे तीनदा प्रतिनिधित्व केले आहे.
वसुंधराराजे यांच्या निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या राजवी यांना यापूर्वी निवडणुकीचे तिकीट नाकारण्यात आले होते, परंतु त्यानंतर त्यांना चित्तौडगडमधून तिकीट देण्यात आले आहे. यापूर्वीही ते एकदा येथून निवडणूक जिंकले आहेत. दुसरीकडे, 2018 च्या विधानसभा निवडणुकीत राजवी यांच्याकडून मोठ्या फरकाने पराभूत झालेल्या सीता राम अग्रवाल यांना पुन्हा एकदा मैदानात उतरवले आहे. दिया सिंग यांच्याविरुद्ध ते निवडणूक लढवत आहेत