सतरा रूपयांची साडी देऊन मेळघाटातील महिलांचा अपमान

0
157

दि 2 एप्रिल (पीसीबी )- अमरावतीच्या भाजप उमेदवार नवनीत राणा आणि माजी मंत्री, बच्चू कडू यांच्यातील विस्तव जाण्याचं नाव घेत नाही. नवनीत राणांच्या उमेदवारीला बच्चू कडू आणि महायुतीतील उमेदवारांनी विरोध केला होता. पण, कार्यकर्त्यांच्या विरोधात जाऊन भाजपच्या राज्यातील आणि केंद्रातील श्रेष्ठींनी विश्वास दाखवत राणांना उमेदवारी दिली. त्या पार्श्वभूमीवर बच्चू कडूंनी सुद्धा अमरावतीत उमेदवार जाहीर केला आहे. यानंतर कडूंकडून राणांवर ‘प्रहार’ करणेच सुरूच आहे. एका सभेत बोलताना कडूंनी साडीवाटपावरून नवनीत राणांवर टीका केली आहे. “सतरा रूपयांची वाटलेली साडी निवडणुकीत मतपरिवर्तन करू शकत नाही. लोकांना गुलामीकडे नेणारी व्यवस्था तोडून टाकावी लागेल,” असा हल्लाबोल कडूंनी राणांवर केला आहे.
बच्चू कडू म्हणाले, “पैसा आईची सेवा करू शकत नाही. सेवा करण्यासाठी चांगलं मन लागतं. सतरा रूपयांची साडी देऊन मेळघाटातील महिलांचा अपमान केला. दोन कोटींच्या गाडीत फिरायचं आणि सतरा रूपयांची साडी वाटून लोकांना गुलामीकडे नेण्याची व्यवस्था तोडून टाकावी लागेल.”
“माझं आणि राजकुमार बडोले यांचं सगळं सुखात चालू होतं. फक्त तटस्थ राहण्यासाठी निरोप आला होता. पण, इमानदारीकडे जाण्याचं काम आम्ही केलं आहे. कारण, सतरा रूपयांची साडी वाटून निवडणुकीत मतपरिवर्तन होणार नाही,” असं कडूंनी म्हटलं.
“महाराष्ट्रावर आलेली अनेक आव्हान छत्रपती शिवाजी महाराज यांनी उटलून लावली आहेत. अमरावती हा संत गाडगेबाबा यांचा जिल्हा. गाडगेबाबांच्या घरात अन्नाचा कण नव्हता. पण, अमरावतीतील गाडगेबाबांनी महाराष्ट्राला सेवा धर्म शिकवला,” असंही कडू म्हणाले.