श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव झाकणारे शिल्प दोन दिवसात काढा, अन्यथा मी स्वतः काढणार – श्रीरंग बारणे

283

चिंचवड, दि.२० (पीसीबी)-पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने थेरगावातील डांगे चौकात फ्लॉवर ऑफ पँराडाइज शिल्प बसविण्यात येत आहे. त्यामुळे पुलावरील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव झाकले जात आहे. महापालिका प्रशासनाने येत्या दोन दिवसात हे शिल्प काढावे. अन्यथा मी स्वत: ते शिल्प काढून टाकेल, असा इशारा शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिला आहे.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात खासदार बारणे यांनी म्हटले आहे की, महापालिकेत थेरगावचे प्रतिनिधीत्व करत असताना माझ्या पाठपुराव्याने डांगे चौकात पुल उभारण्यात आला. या पुलाला महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात आले. डांगे चौकात महाराजांचा मोठा पुतळा आहे. महाराजांकडे पाहिले की नागरिकांना वेगळी उर्जा मिळते.

स्मार्ट सिटीच्या नावाखाली महापालिका प्रशासन काही पण उद्योग करत आहे. कुठेही काहीही बसविले जात आहे. डांगे चौकात फ्लॉवर ऑफ पँराडाइज शिल्पा बसविण्यात येत आहे. त्यामुळे पुलावरील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव झाकले जात आहे. महाराजांच्या नावाचे, परिसराचे विद्रुपीकरण होत आहे. हे शिल्प येत्या दोन दिवसात हटविण्यात यावे. अन्यथा मी स्वत: हे शिल्प काढून टाकेल असा इशारा खासदार बारणे यांनी दिला आहे.