शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतिर्थावर होण्याची शक्यता मावळली

177

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – दसरा मेळाव्याला महापालिकेने परवानगी नाकारून योग्य केले, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविल्याने शिवसेनेचा दसरा मेळवा शिवाजी पार्कवर होण्याची शक्यता मावळली आहे. अद्याप निकाल बाकी आहे.

दसरा मेळाव्याच्या शिवतीर्थावरील परवानगीसाठी शिवसेनेकडून मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी सुरु आहे. यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या वकिलांनी शिवसेनेला शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याचा कोणताही अधिकार नाही, हे पटवून देण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. पालिकेचा युक्तिवाद पाहता शिवाजी पार्कवर मेळावा घेण्याचा अधिकार पालिकेकडून शिवसेनेने पुर्णपणे गमावला असल्याचे सांगण्यात येत आहे.

महापालिकेने कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत दोन्ही पक्षांना परवानगी नाकारली. आज ठाकरे गट, शिंदे गट, महापालिका यांच्याकडून बाजू मांडण्यात आली. यावेळी युक्तिवादादरम्यान पालिका त्यांच्या निर्णयावर ठाम राहिली. पालिकेच्या वकीलांनी शिवसेनेचे यापूर्वी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे युक्तिवाद केला, त्यामुळे शिवाजी पार्कवर मेळावा घेण्याचा अधिकार शिवसेनेने गमावला आहे, असे पालिकेचे वकील मिलिंद साठ्ये यांनी सांगितले.

शिवाजी पार्क हे खेळाचं मैदान आहे. ते शांतता क्षेत्रात मोडतं. अर्ज कायद्याला अनुसरुनच फेटाळण्यात आला आहे. मेळाव्यातून सेना कुणाची हे सिद्ध होणार नाही. मेळावा झाल्यास कायद्याचा प्रश्न उद्भवेल. आम्ही कुणीचीही बाजू न घेता दोघांनाही परवानगी नाकारली आहे.
तुमच्या एकत्र येण्यावर आणि भाषणावर गदा आणलेली नाही. त्याच जागेवर मेळावा घ्यायचाय आणि तो अधिकार आहे असा दावा करता येणार नाही. २०१२ मध्ये हे प्रकरण कोर्टात आलं तेव्हा अन्य पर्याय नसल्याने परवानगी देण्यात आली होती. आणि त्यावेळी पुढच्या वर्षी हे मैदान उपलब्ध नसेल तर अन्य मैदानासाठी अर्ज करू अशी कबुली शिवसेनेने दिली होती. कुणी कायमचा हक्क सांगु शकत नाही. २०१४ साली आचारसहिंतेचा मुद्दा होता. अर्जाच्या छाननीबाबत पालिकेनं नियम स्पष्ट केलं आहे.

राज्य सरकारनं साल 2016 सालच्या आदेशात जे 45 दिवस राखीव आहेत ते स्पष्ट केलेले आहेत. त्यात केवळ बालमोहन यांनाच बालदिन शिवाजी पार्कात परवानगा नावानिशी दिलेली आहे. बाकीच्या केवळ दिवसांचा उल्लेख आहे. दसऱ्याचा दिवस हा दसरा मेळाव्यासाठी राखीव आहे. मात्र तो कोणी घ्यावा हे आदेशात म्हटलेलं नाही, असंही साठे यांनी म्हटलं आहे.

तसेच आम्ही दोन्ही गटाकडून करण्यात आलेल्या अर्जाच्या निर्णयासंदर्भात वेळकाढूपणा केलेला नाही. दोघांच्या अर्जाचा छाननी केली. दोन्ही गटात वाद असल्याने निर्णय थेट घेता येत नाहीत. असेही पालिकेने यावेळी स्पष्ट केलं.

शिवसेनेचा युक्तिवाद

मुळ शिवसेना कुणाची हा मुद्या येथे नाही,दरवर्षी शिवसेनेचा मेळावा शिवाजी पार्कवर होतो, ही परंपरा थांबवणे योग्य नाही, असे शिवसेनेकडून सांगण्यात आले. तसेच, 2016 पासून आम्हाला परवानगी, मग कुणीही उठून अर्ज कसा करतोय असा युक्तिवाद ठाकरे गटाच्या चिनॉय यांनी केला आहे.