शिवद्रोह्यांचा राष्ट्रवादीने केला ‘कडेलोट’.

76

पिंपरी, दि. ८ (पीसीबी)- छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणा-यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चिखली गाव येथील जाधव राजवाड्यातून कडेलोट केला.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे आणि युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांच्या नेतृत्वात आज (बुधवारी) झालेल्या या आंदोलनात माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेवक पंकज भालेकर,विकास साने, यश साने, समिता गोरे,सुरज पटेल,युवराज पवार,सुरेश जाधव,अशोक मगर, काशिनाथ जगताप, दत्तात्रय जगताप, प्रसन्न डांगे, राहुल पवार, कविता खराडे, दीपक गुप्ता, अनुज देशमुख, ओम शिरसागर, सागर पवार,गणेश नागरे,रोहित मोरे,दिनेश पटेल, संजीवनी पुराणिक,निर्मला माने मोठ्या संख्येने युवक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

इम्रान शेख म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि बहुजन महापुरुषांच्या विरोधात भाजप आणि आरएसएस विचार धारेतून येणारे नेते आक्षेपार्ह विधान करत आहेत. या मागे मोठे षडयंत्र आहे. शिवछत्रपतींबाबत आणि बहुजन महापुरुष यांच्या विरोधात इतके वाद निर्माण करा, इतके वाद निर्माण करा की येणाऱ्या पिढ्यांनी महात्म्याचे नाव घेणे देखील टाळले पाहीजे हे यांच्या कृतीतून त्यांनी वेळीवेळी दाखवून दिले आहे.वादग्रस्त विधान करणाऱ्या पाताळयंत्री लोकांना शिवछत्रपती नको आहेत.

शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले, भारतीय जनता पक्षाचे नेते वारंवार महापुरुषांबद्दल आक्षेपार्य विधान करत आहेत. राज्यातील वातावरण दूषित करण्याचा त्यांचा डाव आहे. देशात, राज्यात महागाई बेरोजगारी यासारखे महत्त्वाचे प्रश्न तापले असताना या प्रश्नावरून दिशा भटकवण्यासाठी मुद्दाम अशा प्रकारचे वक्तव्य केली जातात. महापुरुषांचा चुकीचा इतिहास लोकांपुढे आणण्याचे षड्यंत्र भाजप रचत आहे. राज्यभरात विविध पक्ष संघटनेतर्फे इतकी आंदोलन त्यांच्या विरोधात झाली तरी देखील या वाचाळवीरांमध्ये सुधारणा होताना दिसत नाही. यापुढे हे वाचाळवीर आटोक्यात नाही आले. तर, यांच्या लोकप्रतिनिधींच्या घरांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे घेराव घालण्यात येईल असा इशाराही गव्हाणे यांनी दिला.