शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंचा कौतुक सोहळा

0
258

पिंपरी,दि.२२(पीसीबी) – निगडी प्राधिकरणातील ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयात शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त माजी खेळाडूंचा गौरव करण्यात आला. शाळेचा माजी विद्यार्थी ऋषिकेश अरणकल्ले (मल्लखांब पुरस्कार सन २०२०) आणि यश चिनावले (स्केटिंग पुरस्कार सन २०२१) यांचा महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च मानाचा पुरस्कार प्रदान सोहळा क्रीडादिन २९ ऑगस्ट,२०२३ रोजी मुंबई येथे पार पडला होता. एकाच शाळेतील दोन खेळाडूंनी एकाच वर्षी शिवछत्रपती पुरस्कार जिंकून एक नवा इतिहास रचला त्याबद्दल त्यांच्या यशाचे कौतुक म्हणून बुधवार, दिनांक २० सप्टेंबर २०२३ रोजी ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयाच्या गणेश मंडपात त्यांना सन्मानित केले गेले. याप्रसंगी पोलीस दलातील अधिकारी डॉ. संजय शिंदे (पिंपरी -चिंचवड अप्पर पोलीस आयुक्त) आणि राष्ट्रपती पदकप्राप्त विनयकुमार चौबे (पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्त) प्रमुख अभ्यागत म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत उत्साही वातावरणात शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांच्या मिरवणुकीने झाली. रथावर आरूढ झालेले दोघा खेळाडूंचे तुतारी आणि ढोलताशांच्या गजरात औक्षण करून त्यांना मंडपात आणण्यात आले. यावेळी मागील शिवछत्रपती पुरस्कार मिळविलेले सौरभ भावे देखील उपस्थित होते.

खेळाडूंचे प्रशिक्षक शैलेश डुंबरे आणि डॉ. आनंद लुंकड यांनी सत्कारमूर्ती खेळाडूंची क्रीडा कारकीर्द, त्यांनी घेतलेले प्रशिक्षण आणि केलेली मेहनत या विषयी मांडणी केली. या वेळी खेळाडूंची चित्रफितही दाखविली गेली.

यश चिनावले यांनी सत्काराला उत्तर देताना, ‘खेळाडू म्हणून तयार होताना जडणघडणीत असलेला शाळेचा वाटा अधिक महत्त्वाचा असतो’ ; तर सत्कारार्थी ऋषिकेश अरणकल्ले यांनी, ‘अथक मेहनत हाच यशाचा पाया असतो’ असे सांगितले. पालकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी गुरूंवर श्रद्धा आवश्यक असते असे सांगत उपस्थित खेळाडूंना मोठी स्वप्ने बघण्याचे या दोघांनीही आवाहन केले.

प्रमुख अभ्यागत विनयकुमार चौबे यांनी, ‘व्यक्ती निर्माण करणारी शाळा म्हणजे ज्ञान प्रबोधिनी’ असे नमूद करत शाळेचा गौरव केला. येथील विद्यार्थी म्हणजे जातील त्या क्षेत्रात यश मिळविण्याची जिद्द घेऊन बाहेर पडणारी विकसित व्यक्तिमत्वे असावीत अशी अपेक्षा व्यक्त करत खेळाडूंना परिश्रमाची कास धरण्याचा मूलमंत्र, शिस्त आणि परिस्थितीवर मात करण्याची जिद्द या त्रिसूत्रीतून मोलाचा सल्ला दिला.

कार्यक्रमाचा समारोप विद्यालयाचे प्राचार्य आणि क्रीडाकुल प्रमुख डॉ. मनोज देवळेकर यांनी केला. क्रीडा यश हे सद्शक्ती मोजण्याचे परिमाण असून अशा प्रकारचे खेळाडू निर्माण करण्यासाठी लागणारे कष्ट, सरावातील सातत्य आणि क्रीडाकुल विभागातील आरोग्य आणि मानस विभागाचे दायित्वदेखील महत्त्वाचे आहे. म्हणून हा सन्मान अशा पदक विजेते निर्माण करण्याच्या प्रक्रियेचा असल्याचे त्यांनी नमूद केले. अभ्यागत संजय शिंदे यांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला; तर विनयकुमार चौबे यांना यावर्षी राष्ट्रपती पुरस्कार मिळाला त्यानिमित्ताने विद्यालयाच्या वतीने त्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला; तर पालक महासंघाच्या व्हॉलीबॉल स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून डॉ. मनोज देवळेकर, खेळाडूंचे प्रशिक्षक शैलेश डुंबरे आणि तुषार भरगुडे यांचे सत्कार करण्यात आले. गणेशाच्या चरणी अधिकाधिक उत्तमतेचा ध्यास घेण्याचा संकल्प करून क्रीडाकुल विभागाच्या महाआरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि परिचय क्रीडा प्रशिक्षक संपदा कुलकर्णी यांनी केले. तर सूत्रसंचालन नागेश जोशी आणि मंजुषा पुरोहित यांनी केले. कार्यक्रमास विद्यालयातील यशवंत लिमये, शिवराज पिंपुडे, आदित्य शिंदे, कल्याणी पटवर्धन, विद्या उदास आणि यशस्वी खेळाडूंचे पालक उपस्थित होते. कबड्डी प्रशिक्षक भगवान सोनवणे यांनी मिरवणुकीचे आयोजन केले; तर संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन निखिल सोनोने यांनी केले.