शिरूर लोकसभा लढण्यासाठी माजी आमदार विलास लांडेची मोर्चे बांधणी

0
158

पिंपरी, दि. २३ (पीसीबी)- माजी आमदार विलास लांडे यांनी शिरूर लोकसभेसाठी तयारी सुरू केली आहे. २०१९ ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत विलास लांडे यांची निश्चित झालेली उमेदवारी ऐनवेळी अमोल कोल्हे यांना देण्यात आली होती. शिवजयंतीच्या निमित्ताने लांडे शक्तिपरीक्षा केले आणि चाचपणी केली.

महाराष्ट्रात बारामतीनंतर शिरूर लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे. शरद पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यासाठी कंबर कसल्याने अजित पवार यांना बारामतीनंतर शिरूरमध्ये ही चीत पट करण्यासाठी शरद पवार यांनी मोर्चे बांधणी सुरू केल्याचे बोलले जात आहे. अशा स्थितीत अजित पवार कोणाला उमेदवारी देणार याची चर्चा सुरू असताना भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी आपण शिरूरसाठी इच्छुक असल्याचे आणि आपल्याला उमेदवारी द्यावी असा दावा त्यांनी केला आहे. दरम्यान, या जागेसाठी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे शिंदे शिवसेनेकडून उमेदवारी मागत आहेत पण प्रसंगी जिंकण्याची शक्यता म्हणून शेवटच्या क्षणी राष्ट्रवादीतून त्यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू आहेत.

माध्यमांशी बोलताना विलास लांडे म्हणाले, शिरूरची आगामी लोकसभा लढण्यास इच्छुक आहे. यासाठी अजित पवार यांच्याकडे उमेदवारीची मागणी केली आहे. शिरूर लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. गेली अनेक वर्षे अजित पवारांच्या नेतृत्वाखाली काम केलं असून अजित पवार यांच्यासोबत एकनिष्ठ आहे. शिरूर लोकसभेत कामाचा अभाव आहे. मी शंभर टक्के निवडून येणार असा विश्वास विलास लांडे यांनी व्यक्त केला आहे.

विलास लांडे हे पिंपरी चिंचवडचे माजी महापौर तसेच भोसरी विधानसभेचे माजी आमदार आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांच्या ते जवळचे असल्याचं सांगितलं जातं. २००९ पूर्वी ते हवेली चे आमदार होते आणि नवीन रचनेनंतर ते भोसरीतील आमदार झाले. २०१९ ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत विलास लांडे यांची निश्चित झालेली उमेदवारी ऐनवेळी अमोल कोल्हे यांना देण्यात आली होती. यामुळे आगामी शिरूर लोकसभेसाठी विलास लांडे हे तीव्र इच्छुक असून २०१९ ला हुकलेली संधी पुन्हा मिळवायची आहे.