शिक्षण आणि नोकरीत मराठा समाजाला १० टक्के आरक्षण

0
48

मुंबई, दि. २० (पीसीबी) – मराठा आरक्षणासाठी आज राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवलं आहे. या अधिवेशनात नेमकं काय काय होणार? याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. सगे-सोयऱ्यांचं काय होणार? तसंच किती टक्के आरक्षण मिळणार हे स्पष्ट होणार आहे. अशात आता छगन भुजबळ यांनी या सगळ्या अधिवेशनावर आणि मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

मराठा आरक्षण टिकण्यासाठीच विधेयक तयार करण्यात आलंय
मराठा आरक्षण टिकावं यासाठीच विधेयक तयार करण्यात आलं आहे. माजी न्यायमूर्तींनी यामध्ये लक्ष घातलेलं आहे. त्या सगळ्यांनी अभ्यास केला असेल. जे काही बिल तयार केलं गेलं आहे ते आमच्या हातात आलेलं नाही. सगे-सोयऱ्यांच्या संदर्भात साडेसहा लाख हरकती नोंदवण्यात आल्या आहेत. महात्मा फुले समता परिषद, ओबीसी समाजाचे नेते आणि कार्यकर्ते यांचं अभिनंदन करतो. कारण त्यांनी हरकती गोळा केल्या आहेत. त्याचा अभ्यास करावा लागेल. दोन दिवस सुट्टी असूनही अनेक कर्मचारी काम करत होते असंही समजलं आहे असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.

सगळं मनोज जरांगे पाटील यांचंच ऐकायचं असेल तर..
सगळं जर का मनोज जरांगे पाटील यांचंच ऐकायचं असेल तर आणि ५० टक्केंच्या आत आरक्षण द्यायचं असेल तर मग वेगळा कायदा करायची गरज काय? सरकार कायदा करतं आहे याचा अर्थच असा की सरकार मराठा समाजाला वेगळं आरक्षण देणार आहे. गायकवाड कमिशनने दिलेल्या अहवालावर जो कायदा करण्यात आला तो उच्च न्यायालयात टिकला. सर्वोच्च न्यायलयात काही त्रुटी आढळून आल्या त्या दूर करण्याचा प्रयत्न सगळ्या माजी न्यायाधीशांनी केला आहे. त्यामुळे आरक्षण टिकेल असं वाटतं असंही छगन भुजबळ म्हणाले.

जातनिहाय जनगणना करा
आम्ही कुठल्याच जनगणनेवर आम्ही विश्वास ठेवत नाही. आम्ही तो अहवाल नाकारतो आहे. कोण किती आहे हे ठरवायचं असेल तर जातनिहाय जनगणना करा. बाठिया समितीने सांगितलं होतं मुंबईत ओबीसीच नाहीत. त्यावेळी आम्हाला भांडावं लागलं आणि सांगावं लागलं की ओबीसी आहेत. धनगर, माळी यांच्यासह ओबीसी मुंबईत आहेतच. शुक्रे समिती असो किंवा बाठिया समिती असेल त्यांच्या अहवालावर आम्ही विश्वास ठेवणार नाही. मागासवर्गीय बैठकीचा काही अहवाल समोर आलेला नाही. कुठलाही कायदा मंजूर होताना बोलायची संधी दिली पाहिजे. फक्त गटनेत्यांनाच बोलायची संधी असेल तर ते देखील मी मान्य करणार नाही असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.